shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय हनुमान..!

भक्त वत्सला ..

यंदा नवशामारूतीला
तैलाभिषेक ना  केला
तेल तेचं  झोपडपट्टीत
वाटून  येई  गृहिणीला

नैवेद्य दाखवून केवळ
कवळ देई भुकेल्याला
महाप्रसाद  वाटत राहे
रे आलेल्या गेलेल्याला

नारळांचे  पाणी  गोड 
पाजले  पिपासिताला
आधार दे निराधाराला
शब्द गोड दुःखीताला

दक्षिण पेटी भरली ना
दानदिव्यांग गरीबाला
वस्त्रदान  किती जणां
औषधे दिली ‌रुग्णाला

हात जोडी हनुमंताला
तेल थोडेसे  पणतीला
जरा वेगळा  वागे यंदा
या  हनुमान जयंतीला

एक मागणे करी तुला
दानत द्या या  हाताला
पुन्हा मागे अजून एक
कळू नये त्या हाताला

2)
विरक्त देव ..

शेंदूर फासा अंगाला
हवे  काय मारुतीला
हट्ट असा ना कुठला
तोंड हवे  ते   पूर्वेला

दागिने नको तयाला
रूईचे हार गळ्याला
रेशीम वस्त्र कशाला
लंगोट हवी कमरेला

नको तैलाभिषेक तो
तेल घाला पणतीला
बसवायचे  गरिबाला
महाप्रसाद  पंगतीला

न आवडे हनुमंताला
छप्पनभोग नैवेद्याला
म्हणतो तो  भुकेल्या
पोट भर  जेवू  घाला

हनुमान चालीसा गा
स्पिकर हवे कशाला
मनातून उच्चारा नाव
ताण नको रे घशाला

साद  घाला  रामाला
ऐकू जाय हनुमंताला
लाडका माझा  राया
धावून येतो मदतीला


3)
मारुती देवा..

मारूतीराया बलभीमा 
तू  असता  काय  तमा 
माझ्या पापा नसे सिमा 
पुण्य  नावा नाही जमा

षडरिपु    रोमा   रोमा
अपराधा  द्यावी  क्षमा 
लालसेची    परिक्रमा 
भयभित मी  परिश्रमा 

उच्चारता   तव  नामा
हाक जाई  सितारामा 
मारूतीराया बलभीमा 
तू  असता  नाही  तमा 

- हेमंत मुसरीफ पुणे .
  9730306996.
 www.kavyakusum.com

4)
वायू सुत ..

कुठे न मारूती सांग
व्यापला असे सर्वत्र
आजुबाजुला  तोचि
दिवस असो वा रात्र

स्मरण करावे  त्याचे
शहारेल   गात्र  गात्र
मनातून यावी  ओढ
नियम  एकचि  मात्र

जिवंत जे करी सेवा
संतुष्ट  होतीलं  पित्र
नको पाप सरे  ताप
तोड शत्रू जोड मित्र

सद्विचार मनी  राहो
निष्कलंक हो चरित्र 
अंतरंगा   पहा  जरा
जाणवे  त्याचे  चित्र 

कष्टवू  नका  शरीरां
नको क्लिष्ट मंत्रतंत्र 
गाळ घाम दिसे राम
रे हेचि  एकमेव यंत्र

- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996.
  www.kavyakusum.com


close