shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आठवणींचा डोह ' मुळे मला लेखनाची दिशा मिळाली - डॉ.सौ.अलकाताई रायभोगे

श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - मला वाचन आणि संवाद यामध्ये अधिक आनंद मिळतो,माझे वडील प्राचार्य टी. ई. शेळके आणि आई स्व.वत्सलामाई शेळके यांच्यामुळे उत्तम वाचन, संवाद,जीवनमूल्ये, संस्कृतीविचार आणि सेवाभाव यांचे संस्कार झाले असून याच संस्कारामुळे नगर येथील सुनील गोसावी यांचे 'आठवणींचा डोह 'हे आत्मपर पुस्तक वाचून मलाही लेखनप्रेरणा मिळाली असे मत पुणे येथील डॉ. सौ.अलकाताई रायभोगे यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि साहित्य प्रबोधन मंचतर्फे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील राम गोसावी लिखित 'आठवणींचा डोह 'या आत्मपर पुस्तकावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. अलकाताई रायभोगे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी 'माळावरची माती :आत्मचरित्रकार माजी प्राचार्य शंकरराव अनारसे होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

यावेळी श्रीरामपूर सुवर्णकार संघटना अध्यक्षपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ प्राचार्य शेळके यांच्या हस्ते स्वामीराज कुलथे यांचा सत्कार करण्यात आला, संगीता फासाटे यांना राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार लाभल्याबद्दल डॉ.सौ. अलकाताई रायभोगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांची 'भारतीय कुंभार समाजातील संत'आणि 'लॉकडाऊनच्या कविता 'ही दोन पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल माजी प्राचार्य अनारसे यांनी सन्मान केला.प्रा.शिवाजीराव बारगळ, हिमांशु रायभोगे, अद्वैत शेळके यांनी सर्वांचे  अभिनंदन केले.

डॉ.सौ.अलकाताई रायभोगे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले, "आठवणींचा डोह 'हा अनुभवांच्या खोलीचा ओलावा देतो.छोट्या छोट्या प्रसंगामुळे वाचनाचा कंटाळा येत नाही, अगदी सामान्य वाचकालाही खिळवून ठेवणारे हे लेखन असल्यामुळे असेच अनुभव मी लिहिणार आहे,असे सांगून सुनील गोसावी यांचे अभिनंदन केले. प्राचार्य शेळके यांनी 'आठवणींचा डोह 'हा शांत, संयमी आणि जीवनसंदेश देणारा आहे, लेखकाच्या व्यक्तिगुणांचे पैलू त्यात दिसतात असे सांगून प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांची अचूक प्रस्तावना ही प्रभावी असल्याचे संदर्भ सांगितले.स्वामीराज कुलथे यांनी सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त करीत सुनील गोसावी यांचे पुस्तक वाचून आता आपणही लेखन करणार आहे, वडील पत्रकार प्रकाश कुलथे यांचे जीवनचरित्र संघर्षपूर्ण आहे, ते आपण लिहिणार आहे असे सांगून सुवर्णकार समाजाच्या समस्या आणि बोरावके कॉलेजमधील आठवणी त्यांनी सांगितल्या.संगीता फासाटे यांनी सुनील गोसावी, शर्मिला गोसावी यांच्या साहित्य चळवळीच्या आढावा घेतला, नगर जिल्ह्याला शब्दगंध हे साहित्यिक वरदान लाभले आहे, त्या चळवळीचा आविष्कार म्हणजे 'आठवणींचा डोह 'असल्याचे मत व्यक्त केले. 

प्राचार्य अनारसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुनील गोसावी हे कृतिशील लेखक आहेत,आधी केले मग प्रामाणिकपणे सांगितले, त्यामुळे हे लेखन हृदयातून पाझरले असल्याचे कौतुक केले.हिमांशु रायभोगे यांनी उपक्रमाचा संस्कार व्यक्त केला.अद्वैत शेळके यांनी नियोजन केले तर प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी अशा पुस्तकामुळं मी प्रभावीत झालो असून असे लेखन प्रत्येक कार्यकर्त्याने केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून आभार मानले.
close