क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा आज ४९ वा वाढदिवस ! सर्वप्रथम आपण सचिनचे वाढदिनानिमित विशेष अभिष्ठचिंतन करूया. सचिनने भारतीय क्रिकेटसाठी काय केले व सचिनचे जागतिक क्रिकेटमधील स्थान किती उंच आहे हे समस्त क्रिकेट जगताला चांगलंच ठाऊक असल्याने सचिनच्या विक्रम - पराक्रमावर आपण काथ्याकूट करत बसणार नाही. परंतु आज सचिनच्या वाढदिनाच्या दिवशी सचिन ज्या मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे त्या मुंबईचा आज चालू सत्रातील आठवा सामना असून आयपीएलमध्ये विक्रमी पाच वेळा अजिंक्य ठरलेल्या मुंबई इंडियन्सला अजून आपले विजयाचे खाते उघडायचे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुणतालिकेत नेहमी वरच्या स्थानी असणारी मुंबई यावेळी अगदी तळाला आहे व त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळ जवळ संपल्यासारखेच आहे.
तरीही प्रत्येक जण मुंबईच्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. रविवारी लखनौ सुपर जायंटस विरूध्द तो बहुप्रतिक्षित विजय मिळेल व सचिनचा वाढदिवस मुंबई इंडियन्स मोठया आनंदात साजरा करेल व असेच व्हावे अशी सर्वांचीच अपेक्षा असणार !
विशेष म्हणजे सचिनचा सुपूत्र अर्जुन तेंडुलकरला आयपीएल पदार्पण करण्याचा दुग्धशर्करा योग या विशेष दिनी जुळून आल्यास तो तेंडुलकर कुटुंबासाठीही आनंदाचा क्षण ठरेल.
या सत्रात मुंबईने खेळलेल्या सात सामन्यात मुंबईचा खेळ त्यांच्या पूर्व लौकिकाच्या विपरीत झाला. नव्याने बनविलेल्या संघाची घडी अजूनही बसली नसल्याचे दृश्य आहे. फलंदाज व गोलंदाज आपल्या पूर्ण क्षमतेने खेळत नसल्याने जवळ आलेले विजय हातातून निसटले आहे. त्यामुळे मागच्या चुकांतून बोध घेऊन झाले गेले विसरून जाऊन भविष्याचा विचार करून संघ बांधणी करायला आता हिच योग्य वेळ असून प्रत्यक्ष सामन्यातील प्रयोगच मुंबईला उद्याचा रस्ता सुकर करून देईल.
शनिवारी दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात गुजरात सुपर जायंटसने आपला सात सामन्यातील सहावा विजय मिळवून बारा गुणांसह तूर्त तरी अव्वल क्रमांक मिळविला आहे. केकेआरचा सलग चौथा पराभव त्यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण करून गेला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने आपला सलग पाचवा विजय मिळविताना सरस धावगतीसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकविले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या आरसीबीला हैद्राबादच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी जराही उसंत दिली नाही. फलंदाजांनी चुक केली की ते बाद होत गेले. यावेळी हैद्राबादच्या क्षेत्ररक्षकांनीही अतिदक्षता बाळगत आरसीबीला जराही सवलत न दिल्याने त्यांचा संपूर्ण संघ फक्त ६८ धावात गडगडला. २३ एप्रिल हा दिवस आरसीबीसाठी आयपीएलमध्ये दुर्देवी दिवस असल्याचे आज सिद्ध झाले, कारण याच दिवशी सन २०१७ मध्ये केकेआर विरुध्द ते ४९ धावात सर्वबाद झाले होते.
या कमी धावांचा हैद्राबादने शिताफीने पाठलाग करून आपली उणे असलेली धावगती सुधारून घेत प्ले ऑफ साठी आपली दावेदारी मजबूत केली. या सामन्यात दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर नजर टाकली तर सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनची क्षेत्ररक्षणादरम्यान कामगिरी उत्कृष्ठ झाली. त्यानेच सर्वच गोलंदाजांचा हुशारीने उपयोग केला. तर फलंदाजीत नाबाद सोळा धावा करून चांगली कामगिरी केली. त्या उलट आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिसची कामगिरी झाली. त्याने धावा मात्र पाचच केल्या व क्षेत्ररक्षणा दरम्यान विशेष असे काही करण्यास त्याच्या पाठीशी मोठया धावाच नव्हत्या. विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला. कोहलीचे अपयश केवळ आरसीबीसाठीच नसून टिम इंडियासाठीही धोक्याची घंटाच आहे.
केकेआर विरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळवून गुजरातने आपल्या विजिगुषी वृत्तीचे दर्शन घडविताना या सत्रात चौथा सामना शेवटच्या षटकात जिंकला.पंजाबविरूध्य्द शेवटच्या चेंडूवर, चेन्नईविरूध्द एक चेंडू बाकी ठेवून तर लखनौ विरूध्द दोन चेंडू राखून विजय मिळविला होता. तर या सामन्यात चार बळी घेणारा व ४८ धावा काढणाऱ्या आंद्रे रसेलची कामगिरी निष्काम ठरवत गुजरातने निर्णायक क्षणी रसेललाच बाद करून केकेआरचा हातातील विजय हिसकावला.
हार्दिक पांडया कर्णधार व फलंदाज म्हणून प्रभावी ठरला. तर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने क्षेत्ररक्षणा दरम्यान नेतृत्व सुरेख करून गुजरातचा डाव उधळू दिला नाही. मात्र फलंदाजीतील त्याचे अपयश केकेआरला पुन्हा एकदा भोवले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

