अलीकडे एकच चर्चा सर्वत्र ऐकू येते. मुले पालकांचे ऐकत नाहीत. मुलांवर पालकांचा वचक राहिलेला नाही. वस्तुतः यामध्ये तत्थ्य तर आहेच पण असे का घडले? याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.
यासाठी गेली पाच पन्नास वर्षे आपल्या आचरण पद्धतीत जो फरक पडलेला आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मला आठवते की मी पन्नास वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यां बरोबर त्याचे पालक, प्रामुख्याने वडील अथवा काका, बंधू असे कोणीतरी होते. काही विद्यार्थ्यांचे वडील परीक्षेच्या वेळेसही महाविद्यालयात आपल्या मुला मुलीला घेऊन येत असत.
मी ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला त्या महाविद्यालयात अगोदरच माझे तिन्ही बंधू शिकत होते त्यामुळे शहासने या नावाला एक वेगळे वलय होते. म्हणून मी एकटाच जाऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सांगायचा मुद्दा असा की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये पालक जातीने लक्ष घालत असायचे व शिक्षण संस्थेशी संपर्कात असायचे. अलीकडे शिक्षण संस्थेशी संपर्क करून आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती कशा पद्धतीने होत आहे हे जाणून घेण्याकडे पालक दुर्लक्ष करतात. केवळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरतात व त्याला कॉलेज व्यतिरिक्त अन्य क्लासेसमध्ये पाठवतात. केवळ आर्थिक नियोजन करतात. पण व्यक्तिशः मुलांच्या अभ्यासातील प्रगतीच्या चौकशीसाठी शिक्षकांना भेटत नाहीत.अशा प्रकारची खंत एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या संचालकाने माझ्याकडे व्यक्त केली.
त्यांनी म्हटले की विद्यार्थी विद्यार्थिनींचा दोष काहीच नाही. पालकच पाल्यांच्या शिक्षणासंदर्भात बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे मुलांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही. पालक केवळ शिक्षण संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी समोर येतात. शाळेत दाखल करताना क्वचित आलेला पालक नंतर शाळेचे तोंड देखील बघायला येत नाही. त्यामुळे पालक आणि शिक्षण संस्था यामध्ये जिव्हाळा राहिलेला नाही. ज्या शिक्षण पद्धतीमध्ये जिव्हाळा, वात्सल्य, आपुलकी, आदरभाव या संस्काराचा सहभाग नाही अशी शिक्षण पद्धती ही दिवसेंदिवस निकृष्ट होत जाते आहे. हे वास्तव आज दिसत आहे.
केवळ अर्थार्जन करणे, रोजच्या गरजांसाठी धावपळ करणे, सातत्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून स्वतःला व्यस्त ठेवणे या व अशा वाढत चाललेल्या जीवनपद्धतीमुळे घरात व घराबाहेर पालक आपल्या मुलांना, भावी पिढीला प्रेम, संस्कार, न्याय देत नाहीत. या अर्थाने पालक नापास आहेत असे मत एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी व्यक्त केले हे विचारात घेण्यासारखे आहे.नव्या पिढीतील पालकांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे.
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
मो. ९८८१३७३५८५

