shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रविचंद्रन आश्विन क्रिकेटच्या नियमांचा उपयोग करण्यात माहिर !

         रविचंद्रन अश्विन भारतीय क्रिकेटमधील एक शागीर्द खेळाडू. आपल्या ऑफस्पिन गोलंदाजी बरोबरच वेगवेगळे प्रकारचे चेंडू टाकून फलंदाजांना अचंबित करून बाद करण्यात वाकबगार !  तर फलंदाजीतही दोन हात करण्यात तरबेज !! आणि हो त्याही पेक्षा क्रिकेटच्या नियमांचा किस काढण्यात पटाईत !!!  पेशाने इंजिनियर असलेला अश्विन एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे आयसीसीच्या मानांकनात आजही विराजमान आहे. अश्विन मैदानात फलंदाज, गोलंदाज अथवा क्षेत्ररक्षक म्हणून उपस्थित असतो तेंव्हा आपल्या सुपिक डोक्यातून काही तरी अजब शक्कल लढविणार हे उघड.

           मैदानात आपण अनेकदा बघत असतो की,अश्विन कधी विरोधी फलंदाजाची नाही तर कधी पंचाची काहीतरी चुक काढून त्यांना नियमांच्या चक्रव्यूव्हात घेरीत असतो. आयपीएलमध्ये त्याने सन २०१९ मध्ये एका सामन्यात पंजांबकडून खेळताना राजस्थानचा फलंदाज जोश बटलरला नियमांच्या चौकटीत राहून वादग्रस्त मांकडींग नियमाद्वारे बाद केले होते. भले त्यावेळी ते प्रकरण वादग्रस्त ठरले तरी अश्विन आपल्या कृतीचे नेहमी समर्थन करत राहीला. शेवटी फार मोठया विचार विमर्शानंतर आयसीसीने मांकडिंग हा प्रकारच रद्द करून गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज क्रिझच्या बाहेर असताना गोलंदाजांने त्याचे स्टंप्स अथवा बेल्स विखुरल्या तर तो धावबाद समजला जाईल असा नवा नियमच केला आहे.  विशेष म्हणजे तो याच आयपीएल सत्रापासून अमलातही आणला आहे.
           रविवार दिनांक -१० एप्रिल २०२२ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर आयपीएलमध्ये याच रविचंद्रन अश्विनने क्रिकेट जगताला क्रिकेटच्या आणखी एका जुन्या नियमाची नव्याने ओळख करून दिली. या वेळी मात्र तो राजस्थान रॉयल्सकडून लखनौ सुपर जायंटस विरूद्ध खेळत होता.
          या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचे प्रमुख फलंदाज जोश बटलर, संंजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल व रासी वान डर ड्यूसेन हे अवघ्या ६७ धावांवर झाले होते. तर शिमरॉन हेटमायर हा एकमेव निव्वळ अनुभवी फलंदाज मैदानात खेळत होता. षटकेही बरेचसे बाकी होते. अशा वेळी टिम मॅनेजमेंटने अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला मैदानात पाठविले व अननुभवी फलंदाज रियान परागला मागे ठेवले. संघ प्रबंधनाचा हा निर्णय योग्य ठरवित अश्विनने हेटमायरसह ६८ धावांची भागीदारी केली. शिवाय स्वतः २३ चेंडूत दोन षटकार व एका चौकारासह जलदरित्या २८ धावाही जमविल्या. तेंव्हा अठरा षटकांचा खेळ संपला होता व धावा होत्या ४ बाद १३५ ! अशा वेळी अश्विनने संघाच्या आणखी जलद धावा वाढण्याच्या उद्देशाने डगआऊटमध्ये बसलेल्या तरण्याबांड रियान परागसाठी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने विरोधी कर्णधार केएल राहुल किंवा मैदानातील कोणत्याही पंचाला पूर्व सुचना न देता मैदान सोडले. त्यावेळी समस्त क्रिकेट जगताला " रिटायर्ड आऊट " या नियमाची माहीती झाली. कारण याच नियमाद्वारे आयपीएलमध्ये बाद होणारा पहिला खेळाडू रविचंद्रन अश्विन हा ठरला.
            क्रिकेटमध्ये फलंदाज अकरा प्रकारे आऊट होऊ शकतो. मात्र झेल (कॅच), त्रिफळा (बोल्ड ), पायचित ( एलबीडब्ल्यू ) यष्टीचित( स्टंपिंग ), धावबाद ( रन आऊट ) हेच ठळक प्रकार लोकांना माहिती आहेत. परंतु या व्यतिरिक्त टाईम आऊट ( नवा फलंदाज उशिरा मैदानात येण्यामुळे ), दोनदा चेंडू फटकविणे ( हिट द बॉल ट्वॉईस), स्वयंचित ( हिट विकेट ), क्षेत्ररक्षणास अडथळा आणणे ( ऑबस्ट्रक्ट टू फिल्ड ), स्टंप्सवर जाणारा चेंडू हाताळणे ( हँडलिंग द बॉल ) आणि निवृत्त बाद ( रिटायर्ड आऊट ). आश्विनमुळे रिटायर्ड आऊट हा बाद होण्याचा प्रकार नव्याने प्रकाशझोतात आला आहे. प्रस्तुत लेखात आपण रिटायर्ड आऊट या नियमा विषयीच समजून घेऊया.
           फलंदाज विपक्षी कर्णधार अथवा पंच यापैकी कोणालाही न सांगता परस्पर मैदान सोडून गेला तर त्या फलंदाजाची रिटायर्ड आऊट अशी नोंद होते. यासाठी एमसीसीच्या नियम क्रमांक २५.४ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. ज्यावेळी चेंडू मृत 
(डेड बॉल) असतो, म्हणजे दोन चेंडू दरम्यान खेळ थांबलेला असतो अशा वेळी फलंदाज निवृत्त होऊ शकतो. त्यासाठी नियम क्रमांक २५.४.१ मध्ये माहीती उपलब्ध आहे. फलंदाज कसा बाद झाला याची माहिती पंचाना स्कोअररला देणे गरजेचे असते. नियम क्रमांक २५.४.२ नुसार फलंदाज फलंदाजी करण्यास असमर्थ असेल उदा. जखमी, दुखणे, किंवा काही गंभीर कारण असेल व त्याला विरोधी कर्णधार सहमत असेल तर तो पॅव्हेलियनमध्ये गेल्यास त्याची स्कोअर बुकात " रिटायर्ट हर्ट ( जखमी नाबाद निवृत्त ) '' अशी नोंद होते व त्याच्या संघाला गरज पडल्यास तो पुन्हा फलंदाजीस येऊ शकतो.
           रिटायर्ड हर्ट व रिटायर्ड आऊट यामध्ये खूप फरक आहे. रिटायर्ड हर्टमध्ये फलंदाज पुन्हा फलंदाजीस येऊ शकतो तर रिटायर्ड आऊट झालेला फलंदाज पुन्हा फलंदाजीस येऊ शकत नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close