shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशासकीय गतिमानता अभियानात नगर अव्वलपोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह राहाता पंचायत समिती ठरली पुरस्कारांची मानकरी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                        मंगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ 

प्रशासकीय गतिमानता अभियानात नगर अव्वल
पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह राहाता पंचायत समिती ठरली पुरस्कारांची मानकरी..!!

अहमदनगर : शासनाच्या 2021-22 या वर्षाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा या अभियानात नगर जिल्ह्याने तीन पुरस्कार मिळवत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. नगर पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (शासकीय अधिकारी गट) व राहाता पंचायत समिती यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो.ना.बागुल यांच्या स्वाक्षरीने याबाबतच्या शासन निर्णय सोमवार (दि.18) रोजी प्रसिध्द झाला आहे. प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट उपक्रम सुचविणार्‍या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला आहे. रोख 10 लाख रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यापासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत दैंनदिन टपालाचे वितरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने विकसित केलेल्या ‘ई-टपाल प्रणाली’ या उपक्रमास हा पुरस्कार देण्यात आला. या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत विभागीय स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीला मिळाला आहे.


रोख 4 लाख रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली राहाता पंचायत समितीने नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्यांचे थेट निराकरण करणे, करोना कालावधीत मदत, बचत गट विक्री व प्रदर्शन कार्यक्रम, घरकुल प्रकल्प सक्षमपणे राबविणे या कामासाठी हा पुरस्कार राहाता पंचायत समितीला देण्यात आला आहे. या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत शासकीय अधिकारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना मिळाला आहे. रोख 50 हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेतकरी व नागरिकांचे दैंनदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याकरिता जिल्ह्यात ‘महसूल विजय सप्तपदी अभियान’ राबविण्यात आले.

या उपक्रमांसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भोसले व राहाता पंचायत समिती गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close