मोफत आणि दर्जेदार शिक्षणामुळे जि. प. प्रा. शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा वाढता कल - शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणीभाई मुलानी.
वडापुरी जि. प. प्रा. शाळा येथे पहिली मध्ये प्रवेश पात्र विद्यार्थी व पालक यांचा शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.
मेळाव्यात एकूण १८ विद्यार्थी यांनी घेतला प्रवेश.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी शासनाच्या धोरणानुसार जून २०२२ मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थी व पालक यांचा शाळापूर्व तयारी मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे घेण्यात आला. सर्वप्रथम दाखल पात्र विद्यार्थी व पालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर्व अंगणवाडीसेविका मुख्याध्यापक शिक्षक शाळेतील विद्यार्थी यांनी ढोल वाजवत शाळेपर्यंत फेरी काढली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणीभाई मुलांनी यांच्या हस्ते फित कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नवीन प्रवेश पात्र मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मांडलेल्या सात स्टॉलवर दाखल पात्र विद्यार्थ्यांची नोंद करून विकास पत्र बनवण्यात आले. पालकांना अध्ययन पुस्तिका कार्ड देऊन पालकांनी काय करायचे आहे .याचे मार्गदर्शन करण्यात आले .आज एकूण अठरा विद्यार्थी व पालक यांनी मेळाव्यात सहभागी होऊन प्रवेश निश्चित केला.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणीभाई मुलानी, सदस्य रणजीत चंदनशिवे, आदमभाई पठाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे, मुख्याध्यापिका रजिया शेख, मनीषा मोरे ,प्रतिभा गरकळ, शिक्षक शामसुंदर माने, तसेच अंगणवाडी शिक्षिका सीमा खामगळ ,माधुरी कदम ,लक्ष्मी गायकवाड हे उपस्थित होते.
यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुलानी म्हणाले की, गेल्यावर्षी एकूण ५० विद्यार्थी यांनी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतला असून तसाच प्रतिसाद याहीवर्षी मिळेल कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने पालकांचा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दिवसेंदिवस कल वाढत आहे आज या मेळाव्याच्या दरम्यान पहिल्याच दिवशी १८ विद्यार्थ्यांचा प्रवेश इयत्ता पहिली मध्ये नोंदवला त्यासाठी पालक वर्गाची उपस्थिती दर्शनी होती असे मत त्यांनी व्यक्त केले.

