shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुजरात सोडल्यास इतर संघाची प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच सुरू !


         आयपीएलचे पंधरावे सत्र सुरू होऊन एक्कावन्न दिवस लोटले असून सर्वाधिक वेळा विजेते ठरलेले मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांचे सलगच्या पराभवाने स्पर्धेतील आव्हान सुरुवातीलाच संपले आहे. तर यंदाच्या सत्राद्वारे आयपीएल मध्ये आगमन करणाऱ्या गुजरात टायटन्सने प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित केले असून सध्याची परिस्थिती बघता ते पहिल्या
क्रमांकानेच क्वॉलीफायर होणार असेच दिसते. गुजरातने खेळलेल्या तेरापैकी दहा सामने जिंकले असून इतर कोणताही संघ त्यांना ओलांडणे सोडाच साधे जवळही जाऊ शकणार नाही. 

गुजरातला एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी लागेल की, साखळी आणि प्लेऑफ मध्ये जमीन आस्मानाचं अंतर असतं. कारण तेथील तणाव वेगळा असतो तो साखळीत अव्वल राहीलेल्या संघांनाही पेलवता आलेला नसल्याचा इतिहास असून सन २०१६ मध्ये साखळीत अव्वल राहीलेल्या गुजरात लायन्सला चांगलेच ठाऊक आहे. गुजरात लायन्स त्यावेळी दोन्ही क्वॉलीफायर हारले व अंतिम सामना खेळू शकले नव्हते. तशी वेळ गुजरात टायटन्सवर येऊ नये यासाठी त्यांना डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागणार आहे. तसे बघाल तर गुजरातची फलंदाजी चांगली असून गोलंदाजीही भक्कम आहे. तरीही त्यांना भूतकाळात नाही तर वर्तमानात राहून खेळ करावा लागेल, तरच पहिल्याच प्रयत्न विजेतेपद मिळविण्याची राजस्थान सारखी कामगिरी करता येईल.

              गुणतालिकेवर एक नजर टाकली तर गुजरात वीस, राजस्थान सोळा गुण व सरस धावगतीसह दुसऱ्या तर केवळ सोळा गुणांसह लखनौ तिसऱ्या स्थानावर आहेत. चौदा गुणांसह आरसीबी चौथ्या स्थानावर असले तरी त्यांचा फॉर्म व राहीलेला एक सामना यांच्यातील समन्वय कसा साधला जातो यावरच त्यांचे प्लेऑफचे गणित अवलंबून असेल. शिवाय दिल्ली, केकेआर व पंजाब बारा गुणांसह त्यांच्या पाठोपाठ आहेत. मात्र दिल्ली या दोघांच्या तुलनेत एक सामना कमी खेळला असल्याने त्यांना संधी जरा जास्त उपलब्ध आहे. तसेच आठव्या स्थानावरील हैद्राबादचे बारा सामन्यात दहा गुण आहेत. आता केवळ बलवत्तर नशिबच या संघांना प्ले ऑफची सिट देऊ शकते. शिवाय प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या सीएसकेचे तेरा सामन्यात आठ तर मुंबईचे बारा सामन्यात सहा गुण असून शेवटचे दहावे स्थान टाळण्याचे दोन्ही संघाचे प्रयत्न असतील. पण येथे नियतीच्या अजब खेळीचा गजब नमुनाच दिसतो. एके काळी हे संघ पहिल्या दुसऱ्या स्थानासाठी झुंजायचे तर आता तळ सोडण्यासाठी !

          राजस्थानचा जोश बटलर ६२७, लखनौचा केएल राहुल ४६९, दिल्लीचा डेव्हीड वॉर्नर ४२७ व लखनौचा दिपक हुड्डा ४०६ धावा यांच्यात ऑरेंज कॅपसाठी लढाई सुरू आहे, तर पर्पल कॅपसाठी राजस्थानचा यजुवेंद्र चहल २४, आरसीबीचा हसरंगा २३, दिल्लीचा कागिसो रबाडा २१,  मोहम्मद शमी व हर्षल पटेल प्रत्येकी १८ बळी मिळवून झुंजत आहेत.

           स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रेसमध्ये असलेले प्रत्येक संघ आपले सर्वस्व ओतून खेळ करणार यात कोणतेही दुमत नाही. मात्र या दरम्यान प्रेक्षकांना नेत्रदिपक खेळाची मेजवानी मिळणार हे मात्र नक्की !

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close