प्रतिनिधी :सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १६ / करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचेकडे शौचालय नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा माजी तालुका अध्यक्ष सतीश नीळ यांनी तक्रार दाखल केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तक्रार अर्जानुसार सखोल चौकशी केली आहे.
सदरील प्रकरणी निमगाव हवेली येथील सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचेकडे शौचालय नाही म्हणून ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ चे पोट कलम खंड २१ (५ ज) प्रमाणे पुढील कारवाई होणे बाबतचा अहवाल दि.४/३/२०२२ रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत विभाग यांच्या स्तरावरून सुनावणी तारीख देऊनही सुनावणी प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर रद्द झालेल्या त्याच प्रकरणाची सुनावणी तारीख देण्याऐवजी इतर प्रकरणांची सुनावणी तारीख निश्चित करण्यात येत आहेत. आणि सुनावण्या घेण्यात येत आहेत मात्र या प्रकरणाची सुनावणी न घेता तारीख पे तारीख देण्याचे काम केले जात असल्याचे श्री. सतीश नीळ यांनी जनसंवादशी बोलताना सांगितले.
ग्रामपंचायत अधिनिय १९५८ चे कलम १४ मधील पोट कलम खंड २१ (५ ज) या तरतुदी प्रमाणे सदरील पदाधिकारी हे अपात्र होतात. त्यांच्याविरूद्ध तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असताना अपात्र लोकांना काम करण्यास संधी मिळत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाहीसाठी घातक आहे. अपात्र व्यक्तींवर कारवाई न होता पदावर कायम राहिल्यास पदाचा गैरवापर होऊन गावाच्या विकासामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पुढे बोलताना श्री.नीळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी लक्ष द्यावे व तात्काळ सुनावणी तारीख निश्चित करून योग्य ती कारवाई करावी व तात्काळ न्याय निवडा द्यावा अशी मागणी मुळ तक्रारदार सतीश नीळ यांनी केली आहे.

