shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चित्रकारांची बौद्धिक संपदा..!

१४४) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता

या सृष्टीचा चित्रकार कधीच चुकत नाही हे वैश्विक सत्य आहे. मात्र आपण हव्यासापोटी सृष्टीचे चित्रच विकृत करून टाकले आहे त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

 सुदृढ पर्यावरण म्हणजे संतुलन. आणि जेव्हा रंगसंगती संतुलित होते तेव्हा जिवंत चित्र उभे राहते. त्यामुळे रंगाच्या कुंचल्यातून जिवंत कलाकृती निर्माण करणाऱ्या चित्रकारांकडे पर्यावरण प्रेमी या नजरेने पाहिले तर चित्राची रंगत अजूनच वाढते नि चित्राचा आशय मनाला ब्रह्मानंद देतो.

 पुणे येथे दिनांक १३ मे २०२२ रोजी शुभारंभ लॉनमध्ये आयोजित चित्रांचे प्रदर्शन पाहण्याचा योग मला आला.
 अनेक चित्रकारांनी या ठिकाणी आपली चित्रे प्रदर्शित केलेली दिसून आली. चित्रांचे विविध प्रकार समजून आले.
 पण यातही एक नवा प्रकार ज्यापासून मी पूर्णतः अलिप्त होतो त्याचे रहस्य समजून आले.
 एखाद्या चित्रकाराची कल्पनाशक्ती किती पराकोटीला पोहचू शकते याचे उदाहरण म्हणजे सौ. समिधा लाड यांनी  रेखांकन केलेली चित्रे. सौ. समिधा लाड या व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत त्यामुळे या रेखांकनाचे भावविश्व निश्चितच वेगळे आहे. या चित्रांच्या रंगीत रेखांकनातून सरळ सरळ अर्थबोध होईल असं काहीच नव्हतं. पण एखादा विचार डोक्यात घेऊन डोळे मिटल्यावर समोर काय जाणवते ते कल्पनाशक्तीच्या आधारे चित्रांकन करणे असा हा प्रकार आहे.
सौ. समिधा लाड सारखी चित्रकार जेव्हा चित्र रेखाटते तेव्हा प्रथमतः ती ते चित्र नजरेत सामावून घेते. ज्ञान केंद्रे त्यावर काम करतात. नंतर मज्जासंस्थेला आदेश जातो आणि मज्जासंस्था बोटांना आदेश करते. ही बोटे हातात कुंचला घेऊन विविधरंगी असे चित्र कागदावर रेखाटतात. असं सृष्टीकडून घेऊन पुन्हा सृष्टीला अर्पण करण्याची कला म्हणजे सौ.समीधा लाडची अगम्य चित्रे.

 चित्र पाहून डोळे मिटले आणि चिंतन केले तरी समोर चित्रातले रंग दिसत नाहीत ते कल्पनेतूनच साकारावे लागतात. चित्रकार हे अगम्य काम लिलया करतात.

 मी स्वतः या प्रदर्शनातील चित्रांकडे बघत डोळे स्थीर करत अवलोकन केले तेव्हा खरोखर मला जे जाणवले ते शब्दांच्या पलीकडले ! बौद्धिक वाढ करायची असेल तर अशी चित्रे काढण्याची कल्पकता मुलांमुलींमध्ये रुजविणे गरजेचे आहे. म्हणजे एखादे चित्र मुलांना दाखवावे आणि मग त्या चित्राबाबत मुलांनी डोळे मिटून चिंतन, मनन करावे आणि मग त्या चित्राचे, संकल्पनेचे रंगांच्या उभ्या-आडव्या फटकाऱ्यातून, भावार्थ साकारावेत असा हा प्रकार बौद्धिक सामर्थ्य वाढविणारा प्रकार आहे. 
खरोखर बौद्धिक संपदा कशाला म्हणायची ते अशा चित्रांतून समजते.

 अन्य अनेक निसर्ग चित्रे, रेखाचित्रे यातून आपल्याला सरळ सरळ अर्थबोध होतो. पण सौ. समिधा लाड यांनी रेखाटलेल्या चित्रांचा अर्थबोध होण्यासाठी बुद्धीची कसोटी लागते. मनाची एकाग्रता लागते. ज्यायोगे सुदृढ बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, संदर्भांची जाणीव, रंगांचे आविष्कार, रेखाटनातील भावार्थ यांचा मेळ घालताना जशी जशी बौद्धिक कसोटी लागते तसतसा  तितकाच अत्यानंद मनाला होतो. हाच आनंद माणसाला निरोगी ठेवण्यासाठी गरजेचा असतो.

येथील चित्रे पाहताना मनाला खटकले ते असे की, काही चित्ररसिक चित्रांचे फोटो मोबाईलवर काढत होते. वास्तविक पाहता हे चुकीचे आहे. कारण चित्रकाराने जीव ओतून निर्माण केलेली चित्रे, कलाकृती अशी उभ्या उभ्या आपल्या मोबाईलमध्ये घ्यावी  आणि त्या चित्राचे अवमूल्यन करावे हे चुकीचे आहे. वास्तविक पाहता हे कृत्य म्हणजे उघड उघड चित्रांची चोरीच म्हणायला हवे.
ह्यासाठी प्रत्येक चित्रकाराने दक्षता घेऊन आपली बौद्धिक संपदा जपण्याचा आटोकाट प्रयत्न  करावा. बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत चित्रांचे कॉपीराइट करून घ्यावे. असे करणे ही आजच्या मोबाईलच्या युगात अत्यंत गरजेची बाब आहे असेही सुचवावेसे वाटते.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या विद्यमाने चित्रांचे कॉपीराइट व कायदेविषयक मार्गदर्शन दिले जाते. चित्रकारांनी याबाबतचा लाभ घ्यावा.

पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, पुणे
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट,पुणेच्या  पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता मोहिमेंतर्गत प्रकाशित.
close