आयपीएल २०२२ चे सत्र जस जसे पुढे सरकत आहे तस तशी त्यातील रंजकता वाढत चालली आहे. बुधवारी डि वाय पाटील स्टेडियमवर लखनौ सुपर जायंटस व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक उत्कंठावर्धक सामना भलताच रंगला. मोठया धावसंख्येच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर लखनौने चित्तथरारक विजय मिळवून प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित केले. या सामन्याचे वैशिष्टये म्हणजे लखनौने विक्रमी सलामी देत बिनबाद २१० धावा केल्या तर केकेआरने रडतखडत का होईना शेवटपर्यंत झुंज़ दिली. मात्र या पराभवाने त्यांचे यंदाच्या सत्रातील आव्हान पुर्णतः संपले आहे.
केकेआर १९.४ षटकापर्यंत जिंकणार असेच वाटत होते. मात्र एर्विन लुईसने रिंकू सिंगचा अवघड झेल टिपला व लखनौचा विजय सोपा झाला व शेवटच्या चेंडूवर मार्कस स्टोईनसने उमेश यादवचा त्रिफळा उडवून केकेआरचे आव्हानच संपुष्टात आणले.
प्रेक्षकांचे पैसे वसूल करून देणाऱ्या या सामन्यात अनेक टर्निंग पॉईंट आले. आता त्याच काही नाट्यमय प्रसंगांचा ऊहापोह घेऊया.
केकेआरने या सामन्यात जखमी अजिंक्य राहणेच्या ऐवजी अभिजित तोमरला संधी दिली परंतु लक्षाचा पाठलाग करताना त्याची बॅट चाललीच नाही. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याने उमेश यादवच्या गोलंदाजीवर क्विंटन डिकॉक झेल सोडला. याच डिकॉकने या सत्रातील सर्वात मोठी (नाबाद १४० धावांची ) खेळी करताना केएल राहुलसह विक्रमी २१० धावांची सलामी दिली. हा झेल केकेआरला इतका महागात पडला की त्यामुळेच त्यांच्या स्पर्धेतील आव्हानावर संक्रांत आली.
केकेआरने विजयासाठी असलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या तीन षटकातच अवघ्या नऊ धावात दोन्ही सलामीवीर गमावले असताना नितिश राणा व श्रेयस अय्यरच्या तडाखेबाज खेळाने केकेआरचे आव्हान जिवंत ठेवले. त्यांच्या पतनानंतर सॅम बिलिंग्ज,रिंकू सिंग व सुनिल नारायणने संघाला विजयांच्या उंबरठयावर आणून ठेवले. मात्र डावाच्या शेवटच्या दोन चेंडूत सामन्याचा निकालच बदलला.
शेवटच्या षटकात २१ धावांचे लक्ष पार करताना केकेआरच्या रिंकू सिंगने पहिल्या चार चेंडूत अठरा धावा ठोकून सामना केकेआरकडे वळविला. शेवटच्या दोन चेंडूत तीन धावांची गरज असताना रिंकूचा एक अप्रतिम झेल एर्विन लुईसने टिपला हाच या सामन्याचा महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर उमेश यादव शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
या सामन्यातील दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर लखनौच्या राहुलने फलंदाजीत ५१ चेंडूत नाबाद ६८ धावा काढताना डिकॉकसह बिनबाद २१० धावांची विक्रमी सलामी दिली. तर श्रेयस अय्यरने २९ चेंडूत ५० धावा काढून चांगली फलंदाजी केली. मात्र गोलंदाजी दरम्यान श्रेयसच्या चाली कुचकामी ठरल्या व त्याचा लाभ उठवत लखनौने मोठी धावसंख्या रचली व बळीही गमावले नाही. तर त्या उलट राहुलने मोहसिन खानच्या गोलंदाजीचा योग्य वापर करत केकेआरचे कंबरडेच मोडले. त्याने चार महत्वाचे गडी बाद केले.
आंद्रे रसेलच्या मुसक्या आवळून त्याला स्वतःत बाद करणे लखनौसाठी फायद्याचे झाले, यासाठी मोहसिन व आवेश यांचे मोठे योगदान होते. रसेल थोडा वेळ आणखी टिकला असता तर केकेआर आरामात जिंकू शकले असते.
लखनौचे प्लेऑफ सिट पक्के झाले असले तरी पहिल्या दोन संघात ते राहतील का नाही हे राजस्थानच्या सामन्यानंतर कळेल. जर त्यांनी पुढचा सामना सरस धावगतीसह जिंकला तर लखनौला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागेल व लखनौला अंतिम सामन्यासाठी दोनदा संधी मिळणार नाही. परंतु गुजरात व लखनौने आपल्या पहिल्याच प्रयत्नात जोरदार खेळ करून सर्वांनाच प्रभावित केले असले तरी यंदा नवा विजेता मिळतो का राजस्थान आपला दिवंगत विजेता कर्णधार शेन वॉर्नला श्रध्दांजली अर्पण करून पुन्हा विजेता बनतो ? हे पहाणे मनोरंजक ठरेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

