भविष्याचा विचार करा ...
असे आपण आजच्या छोट्या मुलांना म्हणजे उद्याच्या भावी नेतृत्वाला कोणत्या तोंडाने म्हणणार आहोत ? इंसाफ म्हणजे न्याय आणि आज च्या नेत्यात औषधाला तरी दिसतोय का ?, सगळे तसे आहेत असे माझे म्हणणे अजिबात नाही.पण ज्या प्रमाणे वाईट प्रवृत्ती आहेत तशी चांगल्या प्रवृत्ती ही आहेच की. आता आपण कोणत्या प्रकारचे आहोत हे ज्याने त्याने आपल्या अंतःकरणाला विचारून पाहा. अगदी खरं उत्तर येईल.
कारण पूर्ण जगाला तुम्ही फसवले तरी अंत:करणाला मात्र फसवू शकत नाही.आजची सामाजिक अवस्था जर पाहिली तर मन उद्विग्न झाल्या शिवाय राहणार नाही. भारतीय हा एकच धर्म महत्वाचा असूनही आपण मात्र वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्याच्या आहारी चाललो आहोत.मग माझे म्हणणे असे आहे की, ज्याला ज्या रंगाचा झेंडा म्हणजे तो धर्म आवडत नाही त्याने त्या रंगाची कोणतीच वस्तू उत्पादन वापरू नये.असे शक्य आहे का ? तर अजिबात नाही.निसर्ग सगळ्याला समान देतो.एखाद्या धर्माने प्रबळ असणाऱ्या भागात तो असा भेदभाव करतो का की आता हे गांव हिंदू धर्माचे आहे. मग इथं झाडे आणि पिके पण भगवीच उगवली पाहिजेत.आता हे गांव मुस्लिम धर्मियांचे आहे मग इथल्या माणसांचे रक्त हिरवंच असले पाहिजे.हिरवी शेते,निळे पाणी,शुभ्र आकाश,लालसर रक्त हे निसर्गात सगळी कडे सारखंच आहे.आपण माणसे मात्र आपला उत्पत्तीचा इतिहासच विसरून गेलो आहोत. अश्म युगात होते का हो जाती धर्म.हजारो वर्षाच्या उत्क्रांतीनंतर मानव जात निर्माण झाली आणि आम्ही मात्र तिला धर्मात विभागून मोकळे झालो. नुसतेच विभागून मोकळे झालो नाही तर एकमेकांचे जीव ही घ्यायला तयार झालो.
राजकारणी मग ते कोणीही असो त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी एखादा मुद्दा म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर पिल्लू काढून देतात आणि आम्ही बुध्दी गहाण ठेवल्यासारखी त्याच्या मागे पळतो.मग हे करताना समोरच्या धर्माचा माणूस आपला जिवलग मित्र आहे हे ही आपण बेमालूम विसरून जातो.सळसळणारी नवी पिढीच याला जास्त बळी पडते. आणि आपल्या आयुष्याचं वाटोळे करून घेते. उंच जाणारा दगड कधी कुणाची जात पाहतो का,तो सगळ्यांना सारखीच हाणी पोहचवणार.दगडाला डोकं नसलं तरी आपल्याला आहे की. राजकारणी किती धूर्त वागतात याचं बुद्धिनिष्ठपणे थोडा विचार करून पाहा.नुसताच झेंडा हातात धरून उरफुटेस्तोवर पळताय,पण कुणासाठी ?, सत्तेत असो अथवा विरोधात असो. प्रत्येक पक्ष आजपर्यंत सामान्य माणसाला वापरून घेत आला आहे.याचं भान ठेवावं लागेल.त्यांच्या त्यांच्यात लुटूपुटीची लढाई होते आणि आपण मात्र खरे मारले जातो.त्यांच्यात वितुष्ट्आले की ते ई डी ची चौकशी लावणार.यांच्या वाटे गेले कि हे मुंबईतील यांचे अनधिकृत बांधकाम पाडणार, कधी वितुष्ट आले तरच.नाही तर मग आहेच -
आपण दोघे भाऊ भाऊ
मिळून सारा देश खाऊ
जरा विचार करा. किती बड्या लोकांनी की ज्यांचे या राजकारणी लोकांशी जमते. त्यांनी बँकांची मोठमोठी कर्जे बुडवली आहेत आणि आजही ते दुसऱ्या देशात मज्जा करत फिरत आहेत.आपण सामान्य माणसं,एक पट कर्ज घेतलं तर त्याची दहा पट वसुली होते. तरी आपला कर्ज उतारा कधीच कोरा होत नाही. आपले कर्जही कधीच माफ होत नाही.
तुमच्या घरात आजारी असलेल्या व्यक्तीसाठी कोणते पुढारी येतात मदतीला ?, त्यांची जीवन शैली पाहा.दोनशे एकर शेती यांच्या एक एकाच्या नावे आणि इतर बरेच काही.यांच्या सात पिढ्या खपल्या तरी इतकी संपत्ती जमा होणार नाही. मग एकच निवडणूक जिंकली आणि कशी काय यांच्याकडे इतकी संपत्ती आली याचा विचार कधी आपण करतोय का ? राजकारणी फूट पाडून आपली तुंबडी भरण्यात मग्न तर मोठ्या पदावर असणारे काही अधिकारी भ्रष्टाचारात मग्न. आपण रात्र रात्र जागून अभ्यास करायचा आणि पैसे असणारे एका रात्रीत पेपर फोडून टॉपवर येणार.
पेपर फोडणारे हे त्या पदावर अधिकारी असतात, त्यांचे हे काम आहे का ? तरी ही ते करतातच ना.आपण प्रामाणिकपणे कर्ज फेडत राहायचं आणि यांनी अख्खी बँकच खायची.एक घर बांधता बांधता आयुष्य जाते आणि दंगलीतून आलेला एक रॉकेलचा बोला सगळी वस्ती पेटवून देतो. कुणाची घरं जळतात हो यात ? आपल्या सारख्या सामान्य माणसांचीच ना. कोण होरपळतं यात.आपणच ना.मग खरा विचार करायची गरज कोणाला आहे. आपल्यालाच आहे.आज झोपडीत जन्म झालेल्या मुलीचे नाव प्रगती आणि मुलाचे नाव विकास ठेवणे इतकाच संबंध आपला विकास आणि प्रगतिशी आहे.हे ध्यानात आलं तरी खूप झालं.
कोणाच्याही आहारी जाण्यापेक्षा स्वतः विचार करा. ज्ञानी व्हा. दुसऱ्या कोणाच्या हातचे बाहुले होण्याआधी आपले निर्णय आपणच घ्या.कारण राजकारणी लोकांवर अवलंबून राहणे म्हणजे आपला गळा आपण आपल्या हातांनी घोटणे आहे. कारण डोळे काढून घेणारेच जर चष्मे देण्याचा आव आणत असतील तर ती कळकळ नसते, तर फक्त सोपस्कार असतो हे लक्षात ठेवायला हवं. मुनव्वर राणा च्या शब्दात सांगायचं तर -
सियासत इस कदर अवामपे एहसान करती है
पहले आंखे छिन लेती है फिर चश्मे दान करती है
सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
M - 8421426337
--------------------------
संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर

