shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंजाबने दवडली सुवर्णसंधी तर दिल्लीचा प्लेऑफचा मार्ग खुला !

     पंधरावे आयपीएल सत्र निर्णायक वळणावर पोहोचले असून रंगतदारही ठरत आहे. याच धर्तीवर सोमवारी विद्यमान सत्राच्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्ज यांच्यात एक महत्वाचा सामना झाला. यामध्ये जो जिंकणार त्याचा प्लेऑफचा मार्ग सुकर होणार होता तर हारणाऱ्या संघाचे प्ले ऑफचे दार उघडणे दुसऱ्याच्या हातात जाणार होते. या सामन्याचा विचार केला तर नाणेफेकीचा महत्वाचा कौल पंजाबच्या बाजूने लागला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी दिल्लीला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले व पहिल्याच चेंडूवर स्फोटक फलंदाज डेव्हीड वॉर्नरला बाद करून सुरुवातही दमदार केली. तसेच दिल्लीला १५९ धावात रोखून विजयाच्या आशा वाढविल्या. मात्र दिल्लीच्या नियंत्रित माऱ्यासमोर एकाचढ एक दर्जेदार फलंदाज असलेल्या पंजाबच्या फलंदाजांची फरफट झाली व १७ धावांनी त्यांना सामना गमवावा लागला.

          दिल्लीकडून मिचेल मार्शचे दमदार अर्धशतक व शार्दूल ठाकूरची धारदार गोलंदाजी त्यांच्या विजयाचा आधार बनली. तर पंजाबकडून सगळे मातब्बर फलंदाज ढेपाळत असताना नवख्या जितेश शर्माने (४४ धावा ) दिलेली झुंज पंजाबचा पराभव वाचवू शकली नाही.
           पंजाबने या सत्रात सातत्यपूर्ण कामगिरी केली नाही. शिवाय कर्णधार मयंक अग्रवाल नेतृत्वात कमजोर सिद्ध झालाच परंतु फलंदाजीतही त्याच्या सारखा महत्वाचा फलंदाज बारा सामन्यात केवळ १९५ धावाच करू शकला. यावेळी तर तो शुन्यावरच परतला. मयंकच्या अपयशामागे टिम मॅनेजमेंटही जबाबदार असून त्यांनी त्याचा नियमीत सलामीवीर म्हणून उपयोग न करता मधल्या फळीत त्याला खेळविले. हा सौदा पंजाबसाठी घातक ठरला.
          या सामन्याला निर्णायक वळण देणाऱ्या घडलेल्या काही ठळक घटना अशा आहेत.
          डेव्हीड वॉर्नर गोल्डन डकचा
शिकार ठरल्यानंतर दिल्लीपुढे पेच निर्माण झाला होता. त्यानंतर सर्फराज खान व मिचेल मार्शने संघाला मजबूती दिली. सर्फराजने सोळा चेंडूत बत्तीस तर मार्शने त्रेसष्ठ धावा काढून दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. 
          पंजाबकडून लियाम लिव्हींगस्टोन व अर्शदिपने प्रत्येकी तीन बळी घेऊन पंजाबच्या तडाखेबाज फलंदाजांना जास्त उधळू न देता धावसंख्या नियंत्रणात ठेवली.
        शार्दूल ठाकूरने सामन्यात चार बळी घेऊन पंजाबचे कंबरडेच मोडले. पावर प्ले मध्ये त्याने भानुका राजपक्षे व शिखर धवनला स्वस्तात बाद केले तसेच अंतिम टप्प्यात एकाच षटकात दोन गडी टिपून पंजाबच्या आशेवर त्याने पाणी फेरले.
          फॉर्मात असलेला जॉनी बेअरस्टो ( २८ धावा ) जम बसल्यानंतर बाद होणे पंजाबसाठी घातक ठरले. तसेच कुलदिप यादवने फटकेबाज लिव्हींगस्टोनला चकवून यष्टीचीत करविताच सामना दिल्लीकडे झुकला.
          दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीचे अवलोकन केले तर फलंदाजीत दोघेही फेल झाले. परंतु पंतने निर्णायक क्षणी लावलेले क्षेत्ररक्षण व गोलंदाजीत केलेले बदल विजय मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरले.              
          आता सरस धावगतीसह चौदा गुण मिळवून दिल्ली गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आली असून चौदा गुण असलेली आरसीबी उणे धावगतीमुळे खाली सरकली असून त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जरा कठीण बनले आहे. परंतु अनिश्चिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते. त्यामुळे आपल्यालाही गुजरात, राजस्थान, लखनौ यांच्याशिवाय चौथा संघ कोण याची जरा प्रतिक्षाच करावी लागेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close