महाराष्ट्रदिनी `महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’चे केंद्रीय लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंच्या हस्ते उदघाटन
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई- ‘उद्योजक व्हा, रोजगार वाढवा’, असे समस्त महाराष्ट्रीयजनांना आवाहन करत केंद्रीय लघू मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे `महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२’ या तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शनाचे उदघाटन केले. यावेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री, कार्यकारी संचालिका रूपा नाईक, एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार, दुबईस्थित पेशवा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जोशी, झेप उद्योगिनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, "झेप उद्योगिनी" आणि "वी एमएसएमई" च्या सहकार्याने १ मे ते ३ मे दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
“भारताच्या एकूण आर्थिक उलाढालीत मुंबईचा वाटा ३४ टक्के आहे. अन्य राज्यातील तसेच परदेशी उद्योजकांचा यामध्ये महत्वाचा वाटा आहे. मुंबई तुमचीच आहे, मात्र मुंबईत तुम्ही कुठे आहात असा सवाल करत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रीयजनांना ‘उद्योजक व्हा, रोजगार वाढवा’ असे आवाहन केले. मी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री होतो. त्यावेळी महाराष्ट्रात उद्योग-व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात लघु- मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देताना सांगितले होते की आपल्या देशात रोजगार निर्मितीवर भर द्या. भारताला आत्मनिर्भर बनविणे हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे, असे नारायण राणे म्हणाले.
यावेळी एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार यांनी एमएसएमई एक्स्पो - २०२२ आयोजित करण्य़ामागची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, विविध शासकीय योजना उद्योजकांना कळाव्यात. महिलांनी उद्योजिका म्हणून सक्षम व्हावं यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्य़ात आले आहे. भारत सरकार हे महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटींग करणार आहे. बीकेसी येथे प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्र तयार करण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावाधीन आहे.
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालिका रूपा नाईक यांनी महिला सक्षमीकरणावर भर देताना सांगितले की, मुलीने शिक्षण घेऊन सक्षम होणं आवश्यक आहे. पुरुषांनी उद्योजक स्त्रिच्यापाठी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे. एमएसएमई विभागाने त्यांच्या विविध समित्यांवर महिला उद्योजिका सदस्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती रुपा नाईक यांनी यावेळी उद्योगमंत्र्यांना केली.
एक हजार महिला उद्योजिका आतापर्यंत झेप उद्योगिनीच्या माध्यमातून घडल्या भविष्यात हा आकडा आणखी वाढेल, असा शब्द केंद्रीय उद्योगमंत्र्यांना देत कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन झेप उद्योगिनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र एमएसएमई अचिव्हर्स’ या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक संधी, सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. लघु-मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन देखील मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून अनेक उद्योजक आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन करणार आहेत. थेट उत्पादकांसोबत संवाद साधण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या पंढरीच्या वारीने झाली. संय़ुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या शाहिरीने गाजविणारे शाहीर अमरशेख यांचे नातू निशांत जैनू शेख यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड सादर केली. पैठणी नेसून केला जाणारा रॅम्प वॉक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य़ ठरले. यावेळी काही यशस्वी उद्योजकांचा सन्मान देखील करण्यात आला.
या प्रदर्शनास भेट देऊन आपल्या उद्योजक बांधवांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन झेप उद्योगिनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर यांनी केले आहे.

