shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजस्थानचा अपेक्षाभंग करत गुजरातने केली इच्छापूर्ती..!

पंधराव्या आयपीएलचा चमचमता करंडक पटकावून मागील पासष्ठ दिवस चाललेला महासंग्राम आपल्या नावे करत पहिल्यांदाच एक संघ म्हणून खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने मोसमाची यशस्वी सांगता केली. रविवारी, २९ मे २०२२ रोजी जगातल्या सर्वात मोठया नरेंद्र मोदी  स्टेडियमवर अहमदाबाद मध्ये एका रंगारंग कार्यक्रमानंतर अंतिम सामना खेळविण्यात आला. साखळीत व प्लेऑफ मध्ये प्रथम दोन क्रमांकावर असलेले गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यांनी अंतिम सामन्यानंतरही हा क्रम कायम राखला.
           सन २००८ मध्ये आयपीएल स्पर्धा सुरू झाली आणि या उदघाटनाच्या वर्षी पहिले विजेतेपद मिळविण्याचा मान शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सला मिळाला. योगायोगाची गोष्ट बघा ना यंदा म्हणजे सन २०२२ मध्ये आयपीएल पदार्पणातच गुजरात टायटन्सने स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आणि तोही साक्षात राजस्थान रॉयल्सला हरवूनच !
          राजस्थान रॉयल्सने या सत्रात अतिशय झकास खेळ करत प्रत्येक संकटांवर मात करून अंतिम फेरी गाठली. तेंव्हा वाटले होते की हा जिगरबाज संघ आपला दिवंगत कर्णधार शेन वॉर्नला विजेतेपद मिळवून श्रध्दांजली वाहील. मात्र झाले उलटेच गुजरातनेच विजेतेपद मिळवून पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवून अशीच कामगिरी करणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नला अभिनव श्रध्दांजली अर्पण केली.
          पहिले पंधरा सामने नाणेफेकीचा कौल न मिळालेल्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला दुसऱ्या क्वॉलिफायर पाठोपाठ अंतिम सामन्यातही नाणेफेकीचा कौल मिळाला. मात्र धावांचा पाठलाग करण्यात तरबेज असलेल्या गुजरातला त्यांच्या मनाप्रमाणे लक्षाचा पाठलाग करण्याची संधी उपलब्ध करून दिली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात अडखळत पण बरी झाली. यशस्वी जयस्वाल शांत सुरुवातीनंतर रंगात येतोय असे वाटत असतानाच उतावळा फटका मारून बाद झाला. मग त्यानंतर जोश बटलर ( ३९ धावा ) याचा अपवाद वगळता कोणीही प्रतिकार केला नाही. त्यामुळे राजस्थानच्या खात्यात जेमतेम १३० धावाच जमा झाल्या.
            दमदार व धडाकेबाज फलंदाजांची फळी असलेल्या गुजरातसाठी हे लक्ष काहीसं किरकोळच होतं. पण असे कमी धावांचे लक्ष फसवे असते. अगदी त्याचा प्रत्यय गुजरातलाही आला. सुरुवातीला वृद्धीमान साहा व मॅथ्यू वेड हे यष्टीरक्षक फलंदाज झटपट बाद झाले व राजस्थानच्या गोलंदाजांनी धावांना ब्रेक लावल्याने सामना रंगतदार होईल असे वाटत होते. परंतु नशिबाची साथ मिळालेल्या सलामीवीर शुभमन गिलने प्रथम कर्णधार हार्दिक पांङ्यासह संघाचा डाव सावरला व हार्दिकच्या पतनानंतर जबाबदारीने खेळत षटकार मारून विजेतेपद  मिळविणारा आयपीएल मधला पहिला खेळाडू बनला. या बरोबरच पाच वर्षानंतर आयपीएलला नवा विजेता मिळाला. गुजरात आयपीएल जिंकणारा सातवा संघ ठरला. शिवाय हार्दीकही सातवाच कर्णधार बनला. 
           हार्दिक पांड्यासाठी हि स्पर्धा त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. फिटनेस व खराब फॉर्मच्या रडगाण्यात फसलेला हार्दिक भारतीय संघातून दूर गेला होता. परंतु या स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करत त्याने निव्वळ गुजरातलाच विजेतेपद मिळवून दिले नाही तर त्याचे भारतीय संघातून गेलेले स्थानही परत मिळविले. शिवाय या स्पर्धेत केलेल्या यशस्वी नेतृत्वामुळे रोहित शर्मानंतर मोकळ्या होणाऱ्या जागेवर कर्णधार म्हणूनही आपला हक्क ठसक्यात सांगितला व आपली दावेदारी निवड समितीसमोर सादर केली.
            या सामन्याचा विचार केला तर गोलंदाजीत फॉर्मात असलेल्या बटलरसह तीन महत्वाचे बळी घेतलेच शिवाय संकटसमयी एकतीस धावांचे मोलाचे योगदान देत विजयात मोठे योगदान दिले. याचे फळ त्याला सामनावीर पुरस्कार व विजेतेपदाच्या रुपात मिळाले. यामुळे एका अर्थाने हार्दिक व गुजरात टायटन्सची ईच्छापूर्तीच झाली.
           अगदी याच्या उलट राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची परिस्थिती होती. त्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला खरा. परंतु त्यामध्ये त्याच्या बॅटचा विशेष वाटा नव्हताच. शिवाय या सामन्यात तो फलंदाज व कर्णधार म्हणून दबावाचा सामना करण्यात साफ अपयशी ठरल्याने पायाजवळ असलेले विजेतेपद मिळविण्यात तो कमी पडला परिणामत: त्याचा स्वतःचा व राजस्थान रॉयल्सचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्याचबरोबर भारतीय संघात आगामी मालिकांसाठी निवड न झाल्याने त्याच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close