श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सन १९०३ साली तत्कालीन स्व.बिशप हेंरी डोरिंग यांनी ख्रिस्ती भाविकांची अध्यात्मिक वाढ व्हावी त्यांच्या श्रद्धेत अधिक बळकटी यावी म्हणून निरोप्या नावाचे मासिक सुरू केले होते.हे मासिक गेल्या १२० वर्षांपासून आजपावेतो अविरतपणे सुरु आहे. याच मासिकाच्या लेखक, वितरक आणि वाचकांचा सस्नेह मेळावा पुणे येथील पेपल सेमिनरीचे रेक्टर व निरोप्या मासिकाचे संपादक रेव्ह. फा. भाऊसाहेब संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २१मे २०२२ रोजी लोयोला दिव्यवाणी श्रीरामपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उद्घाटक म्हणून नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप लुर्डस डॅनियल हे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बिशप म्हणाले की, निरोप्या हे १२० वर्षापासून चालत आलेले दीर्घायुषी ख्रिस्ती मासिक आहे. अनेकांचे आयुष्य निरोप्याच्या प्रकाशात उजळून निघाले आहेत. या मासिका मुळे ख्रिस्ती श्रद्धा अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे निरोप्याला जिवापाड जपून त्याचे संवर्धन करणे आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.मेळाव्याचे आयोजक निरोप्याचे संपादक फा.भाऊसाहेब संसारे म्हणाले की, निरोप्या फक्त मासिक नसून एक मिशन आहे.आपण सर्वजण निरोप्याचे सहप्रवासी आहोत. निरोप्याचे लेखक,वितरक,वाचक व हितचिंतक हा एक परिवार आहे. आपल्या लेखणीतून कृतीयुक्त ख्रिस्त प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
निरोप्या मासिका मुळे अनेक लेखक व वाचक घडलेले आहेत. यातीलच एक लेखक लेविन भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये साहित्यिक म्हणून त्यांच्या आयुष्यात निरोप्या मासिकाचा वाटा किती मोलाचा आहे हे स्पष्ट केले. मेळाव्यात रेव्ह.फा.सुभाष त्रिभुवन,लेवीन भोसले, माधवराव खरात व एफ. एम. शिनगारे यांनी ही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सेंट झेवियर्स चे शिक्षक रवि त्रिभुवन यांनी केले.खुल्या चर्चे दरम्यान निरोप्या च्या पुढील वाटचाली संदर्भात आवश्यक बदल करण्यासाठी उपस्थितांनी अनेक सूचना मांडल्या. सदर सूचनांचे फा. संसारे यांनी स्वागत केले.
या मेळाव्यासाठी मुंबई,पुणे, नाशिक,औरंगाबाद व अहमदनगर या चार जिल्ह्यातील लेखक वितरक व वाचकांनी आपला सहभाग नोंदविला. सर्वांचे गुलाब पुष्प देऊन सुनील साळवे यांनी स्वागत केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी फा. सुभाष त्रिभुवन, इंजि. सुरेश कांबळे, कमलाकर पंडित,रवि त्रिभुवन, लेवीन भोसले सेंट झेवियर टेक्निकल चे सुनील साळवे, दिपक कदम,विजयराव पंडित यांच्यासह निरोप्या परिवारातील अनेकांनी परिश्रम घेतले.शेवटी रवि त्रिभुवन यांनी सर्वांचे आभार मानले.

