shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमृतमहोत्सवी श्रीरामपूर 'विषयी लेख पाठविण्याचे आवाहन..!!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - भारतीय स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या वाटेवर गेल्या ७५ वर्षाचे अनेक अनुभव आपल्या हाती, माथी आहेत. श्रीरामपूर  नगरपालिका २३ सप्टेंबर १९४७ रोजी स्थापन झाली. 




त्याअगोदरपासून बेलापूर रोड नावाने उदयाला आलेल्या  श्रीरामपूर शहराची अनेक क्षेत्रात भरभराट झाली आहे. बेलापूर रेल्वेस्टेशन,गुळाची बाजारपेठपासून आजचे व्यापारी, व्यावसायिक प्रगती, लाभलेले नगराध्यक्ष,आमदार,विविध समाजसेवक, शिक्षणसंस्था, साहित्यिक, वृत्तपत्रीय, राजकीय, सामाजिक, धार्मिक,पंथीय, विविध घडामोडी, शासकीय,शेती, शेतकरी, कामगार, मार्केट कमिटी, विविध समाजसंस्था, जुने-नवे श्रीरामपूर, विविध घराणे, त्यांनी केलेले योगदान, साहित्य संस्था, नाट्यसंस्था, सांस्कृतिक उपक्रम आणि एकता,आम्ही जडलो -घडलो श्रीरामपूराशी, महिला संघटना, युवा संस्था, वैद्यकीय प्रगती, दवाखाने, न्यायालयीन प्रगती, विविध कारखाने, धर्मस्थळे, विविध संघटना, वाहतूक, रस्ते, टपाल, पाटपाणी, आजूबाजूला निर्माण झालेल्या वसाहती, इंजिनिअर, आर्किटेक्ट यांचे योगदान,तृतीय पंथीय नागरिक, विविध चित्रपट गृहे,वाचनालय,  लोकसंख्या आणि शहराचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिक, बँकव्यवस्था  कार्य याविषयी आपल्याजवळ अनेक अनुभव असतील ते शब्दरूपात आविष्कृत झाले तर श्रीरामपूरचा हा इतिहास नक्कीच पुढच्या पिढीला दिशादर्शक ठरणारा आहे. असे घडले श्रीरामपूर, माझ्या जडणघडणीत श्रीरामपूर, मी आणि श्रीरामपूर, मला आठवते ते दिवस आणि आजचे श्रीरामपूर अशा विविध अनुभवावर आधारित लेखसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस साहित्यिक बैठकीत व्यक्त करण्यात आला.कोणताही एकच विषय घेऊन त्यावर लेखन करावे म्हणजे तोच तो मजकूर येणार नाही,वर्ष, दिनांक, कालावधी यांचे अचूक संदर्भ हवेत आक्षेपात्मक  लेखन टाळावे ही विनंती आहे. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ही संकल्पना मांडली. यासंदर्भात पत्रकार प्रकाश कुलथे,प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य शन्करराव अनारसे,सुखदेव सुकळे, डॉ. शिवाजी काळे, लेविन भोसले, प्रा.शिवाजीराव बारगळ, आरोग्यमित्र भीमराज बागुल, फोटोग्राफर,पत्रकार बाबासाहेब चेडे, प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, कवयित्री संगीता फासाटे, डॉ. रामकृष्ण जगताप,कवी पोपटराव पटारे इत्यादींनी या चर्चेत भाग घेतला. या  उपक्रमास आपले आशीर्वाद हवेत, आपल्या  प्रेरणा आणि  सहकार्यातूनच  'आपलं श्रीरामपूर 'शब्दबद्ध होईल. 

या लेखसंग्रहासाठी लेख पाठवावे असे आवाहन करण्यात आले. ३१ मे २०२२ पर्यंत आपले लेख एक हजार शब्दापर्यंत अथवा आठ, नऊ फुलस्केप पानावर द्यावेत, लेख सकारात्मक विचारांनी लिहिलेले असावेत. चांगल्या घटना आणि सुसंकृत भाषाशैलीमध्ये लेख लिहिलेले असावेत.श्रीरामपूर शहर विषयीच लेख असावेत,अनावश्यक व्यक्तीस्तुतीऐवजी त्यांचे वास्तव योगदान शब्दबद्ध करावेत. संपादक मंडळास योग्य वाटतील त्या लेखांचाच  विचार करण्यात येईल.वादविवाद टाळून लेख सुसंवादी जाणिवेतून लिहिलेले असावेत. आपले लेख डॉ. बाबुराव उपाध्ये, इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहमदनगर, प्रकाश कुलथे, वर्ल्ड सामना कार्यालय, जिजामाता चौक, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर जि. अहमदनगर अथवा सौ.संगीता अशोकराव कटारे /फासाटे, इंदिरानगर, श्रीरामपूर जि.अहमदनगर  येथे वेळेत पाठवावेत, द्यावेत असे विनंतीवजा आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
close