नेस्ले प्रणीत हिलदारी अभियानांतर्गत महाबळेश्वर मध्ये कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राहुरी । प्रतिनिधी:
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण खेळ तर राजभवन येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हेल्थ आयडी व ई- श्रम कार्ड चे वाटप.
शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचारी वर्गासाठी हा एक वेगळा दिवस असावा याच अनुषंगाने दि.०१ मे २०२२ रोजी अंतराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गिरीस्थान नगरपरिषद महाबळेश्वर येथे हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे शिक्षण देणाऱ्या बिन इट टू विन इट या अनोख्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक सुजित पेंडभाजे यांनी करत हिलदारी कडून सर्व सफाई कर्मचारी वर्गाला अंतराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शहराची स्वच्छता करताना सफाई कर्मचारी वर्गाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. संपूर्ण शहर सफाई कर्मचारी वर्गामुळे स्वच्छ व सुंदर दिसत असते. तुम्ही करत असलेले काम खूप महत्वाचे आहे. शहराच्या स्वच्छतेमध्ये तुमचे विशेष योगदान आहे असे सांगून त्यांचे कौतुक करण्यात आले.
त्यानंतर बिन इट टू विन इट हा खेळ कसा खेळायचा या विषयीची माहिती देण्यात आली . या खेळाचे विशेष महत्व म्हणजे सफाई कर्मचारी वर्ग हा घनकचरा व्यवस्थापनात काम करत असताना कचरा वर्गीकरणाचे महत्व विशेष आहे. म्हणुनच सफाई कर्मचारी वर्गाला या खेळाच्या माध्यमातून कचरा वर्गीकरणाचे प्रकार, कचरा वर्गीकरण महत्व सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली.
या खेळामध्ये एकूण ३० महिला सफाई कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला व या अनोख्या कचरा वर्गीकरण खेळाचा आनंद लुटला. ०४ विजेत्या महिलांना हिलदारी मार्फत पर्यावरण पूरक बक्षिसे देण्यात आली.
सफाई कर्मचारी महिला मंगल काळे प्रतिक्रिया देतांना म्हणाल्या या अनोख्या कचरा वर्गीकरण खेळामुळे आम्हाला कचऱ्याचे चार प्रकार खूप सहज पद्धतीने समजले तसेच ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती बायोमेडिकल कचरा यामध्ये कोणकोणते घटक येतात तसेच चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणाचे महत्व समजले. हा खेळ खेळून आमच्या माहितीत अधिक भर पडली. नक्कीच ही माहिती आमच्या उपयोगाची आहे. आज अंतराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हा कार्यक्रम आमच्यासाठी घेतला व आमचा सन्मान केला त्याबद्दल नगरपरिषद व हिलदारी टीमचे खूप खूप धन्यवाद.
या कार्यक्रमासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळाले.
राजभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हेल्थ आयडी व ई- श्रम कार्ड चे वाटप.
हिलदारी अभियानांतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रिसीटी नेटवर्क प्रा.ली.च्या सहकार्याने वेस्ट वर्कर प्रोफेशनलायझेशन स्वच्छतेसंदर्भात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार वन विभागांतर्गत काम करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांचे डिजिटल हेल्थ आय डी व केंद्र शासनाच्या ई – श्रम पोर्टल वर ४ कर्मचाऱ्यांची त्यांची नोंदणी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरुपात वन विभागातील सफाई कर्मचारी विद्या मोरे व राजेश्री शिर्के यांना हेल्थ आयडी व ई-श्रम कार्डचे वितरण राजभवन येथील एका कार्यक्रमात मुख्य वन सरंक्षक प्रा. कोल्हापूर श्री. आर.एम. रामानुजम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिलदारीचे डॉ मुकेश कुळकर्णी यांनी केले व उपस्थितांना हिलदारी अभियाना अंतर्गत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती थोडक्यात सांगितली. यावेळी श्री नानासाहेब लडकत (वन संरक्षक व क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प), रावसाहेब काळे (उपवनसंरक्षक, कोल्हापूर), श्री. महादेव मोहिते (उपवनसंरक्षक, सातारा), विजय माने (उपवनसंरक्षक, कोल्हापूर), उत्तम सावंत (उपसंचालक वन्यजीव कोयना), विशाल माळी ( विभागीय वन अधिकारी, चांदोली), श्री दीपक खाडे ( विभागीय वन अधिकारी, चिपळूण), सुधीर सोनवले (सहाय्यक वन संरक्षक), महेश झाजुरणे (सहाय्यक वन संरक्षक), श्री. श्रीकांत कुलकर्णी (वन क्षेत्रपाल, महाबळेश्वर) आदी मान्यवर उपस्थित होते.
हेल्थ कार्ड चे फायदे - हे कार्ड आधार कार्ड प्रमाणेच पूर्णता डिजिटल असून आधार क्रमांकाप्रमाणे या कार्डवर एक क्रमांक संबंधित कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. यामध्ये संबंधितांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्व माहितीची नोंद असेल. ज्यामुळे डॉक्टरांना कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबतचा रेकोर्ड समजेल. जेणेकरून त्यांनी यापूर्वी कोणत्या आजारावर काय उपचार केला, कोणत्या प्रकारचे उपचार घेतले कोणत्या शस्रक्रिया केल्या आहेत याची माहिती सहज उपलब्ध होईल.
ई- श्रम नोंदणीचे फायदे - श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांचे ई-श्रम कार्ड हे आधारासोबत लिंक करण्यात आलं आहे. या माध्यामातून असंघटीत क्षेत्रातील कामगारांपर्यंत रोजगार आणि सामजिक सुरक्षेच्या विविध योजना पोहचविण्याचा सरकारचा उद्देश आहे. जस की, संघटीत क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमच अपंगत्व असल्यास २ लाख रुपये आणि अंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचा लाभ दिला जातो. यासोबत बरेच इतर फायदे सुद्धा आहेत.
सदर उपक्रमासाठी हिलदारीचे मनीष राणे, सुजित पेंडभाजे, राम भोसले, प्रतिमा बोडरे, फैयाज वारुणकर, अभिषेक जाधव, खाकसारअली पटेल, यासीन नालबंद, गणेश माचुतरे, आकाश शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले.

