शिर्डी । प्रतिनिधी :-
महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अति महत्त्वाचा असून देखील आज पर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आरक्षण कोर्टात टिकावे म्हणून कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचललेले नाही. जेव्हा जेव्हा ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न समोर येतो तेव्हा तेव्हा सरकार पळपुटेपणा ची भूमिका घेत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा ओबीसी मोर्चा ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे व आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
महा विकास आघाडी मधील ओबीसी मंत्र्यांनी आता आपल्या समाजाची फसवणूक थांबवून ओबीसी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे देऊन ओबीसी समाजा बरोबर आरक्षणाच्या लढ्यात उतरले पाहिजे.महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व आकडेवारी व चाचण्या पूर्ण करून पुन्हा आरक्षण मिळविले आहे.परंतु आजही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारला हे जमले नाही, तर त्यांना हे जमूनच घ्यायची नाही असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
ओबीसींना त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण परत मिळावे म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा सातत्याने रस्त्यावरती उतरत आहे वेळोवेळी मोर्चे, आंदोलने काढून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आ. योगेशजी आण्णा टिळेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण सोमवार दि. २३/०५/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.
तसेच येत्या बुधवार दि. २५/०५/२०२२ रोजी माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. योगेशजी टिळेकर साहेब यांच्या आदेशानुसार मध्यप्रदेश सरकारचे अनुकरण करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याकरीता भाजप ओबीसी मोर्चा आता थेट धडक मंत्रालयावर देणार आहे.

