shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रिटनमध्ये विद्यार्थ्यांना दयेचे शिक्षण....!

१४७) पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता

जगद्गुरु तुकाराम महाराजांनी  म्हटले आहे की, 

दया हेची नाम। भूतांसी पालन।
आणिक निर्दालन। कंटकांचे।।

कंटक म्हणजे दुष्ट प्रवृत्ती.
निर्दालन म्हणजे नाश करणे. 
दया म्हणजे सदप्रवृत्तीचे आचरण.
भूतांचे पालन म्हणजे पंचमहाभूतांचे संतुलन साधणे. जोपासना करणे. याचेच नाव दया. 

संपूर्ण विश्व हे पंचमहाभूतांचे भरलेले आहे नि त्याचे संतुलन साधण्यासाठी आपल्याला सात्विक आचार, विचार,उच्चार आणि प्रचार ही चतु:सुत्री आचरणांत रूजवावी लागते. असे केल्यानेच पंचमहाभूतांनी भरलेल्या या विश्वाचे पर्यावरणीय संतुलन साधले जाईल.

आपला मानवी देह हे देखील एक स्वतंत्र ब्रह्मांड/विश्व आहे. अशी अनंत कोटी ब्रह्मांडे परस्पर विश्वासाने एकत्र नांदतात तिथे रामराज्य नांदते. या रामराज्याचा मूलमंत्र आहे भूतदया.

ब्रिटनमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दयाळूपणा  शिकवण्याचा उपक्रम/ अभ्यासक्रम शाळांमधून  राबविला जात आहे. 
ब्रिटनमधील लॉनशिल अकॅडमी शिक्षक मॅकेंटॉस असे म्हणतात की हा एक चांगला नवीन उपक्रम आहे. यासाठी शाळेमध्ये दयाळूपणा सप्ताह साजरा केला जातो व मुलांच्या अभ्यासाच्या वेळापत्रकात देखील त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी बाल दया समिती स्थापन करण्यात आलेली आहे. प्रत्येक दयाळू गट स्वतःच्या संसाधनाचा वापर करून निधी उभारतो. मुलांना दर आठवड्याला दयाळपणा संस्कारित करण्याच्या उद्देशाने पाच कामे दिली जातात.

 ससेक्स विद्यापीठाने ६०,००० लोकांवर दयाळूपणाचा अभ्यास केला. या विभागाचे प्राध्यापक रॉबिन बॅनर्जी यांच्या मते महिला अधिक दयाळू असतात. उत्पन्न, संपत्ती यावर  दयाळूपणा गुण फारसा अवलंबून नसतो असे आढळून आलेले आहे.

ब्रिटनमध्ये ३०,००० शाळांमधून हा अभ्यासक्रम राबविला जात आहे व भारताने याकामी पुढाकार घ्यावा अशी ब्रिटनची इच्छा आहे.

 आपल्या भारतात भूतदया, सर्व प्राणिमात्रांवर दया करा, थोरांचा आदर करा, सर्वांभूती परमेश्वर अशाप्रकारे जे संस्कार तत्त्व बालपणापासून संस्कारित केले जाते त्याची शिकवणूक ब्रिटनमध्ये दिली जात आहे. आज सुखी समाजरचनेसाठी भारतीय संस्कृती शिकविण्याची गरज ब्रिटीशांना वाटावी हे सामाजिक पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ संकेत आहेत. अर्थात यामुळे भारतीय संस्कृती व संस्कार शिकवणाऱ्यांना कदाचित इंग्लंडमध्ये जाऊन भूतदयेचे धडे इंग्रजांना शिकविण्यासाठी   आमंत्रित केले जाऊ शकते. भविष्यात या विषयीचे ब्रिटिश अभ्यासक विद्यार्थी-विद्यार्थिनी भारतात भूतदयेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी येतील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट,पुणेच्या पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता मोहिमेंतर्गत प्रकाशित.

लेखक :
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने.
मोबाईल :९८८१३७३५८५
close