shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोंगा, ध्वनी आणि सामाजिक पर्यावरण..!


आली कुठूनही कानी। टाळ मृदुंगाची धून...। नाद विठ्ठल विठ्ठल। ऊठे रोमारोमातून...!

मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजासंदर्भात सद्याचे जे कवित्व चालू आहे आणि त्यासोबत हिंदूंच्या प्रार्थना संदर्भात आवाजाच्या/ध्वनी प्रदूषणामुळे उद्भवणार्‍या समस्यांकडे दुर्लक्ष करीत जी  एकांगी मते मांडली जात आहेत यातून केवळ राजकीय कुरघोडी आणि सर्वधर्म समभाव हिरीरीने मांडताना अनेकजण समोर येत आहेत.

सद्यस्थितीत उपलब्ध संपर्क साधनांचा आढावा घेतल्यास भोंगा/ लाऊडस्पीकर ही संकल्पना सर्वांसाठीच पूर्णतः कालबाह्य झालेली आहे ती कशी ते समजून घ्या.

उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झाले आणि खेड्यांची शहरे झाली व अनेक प्रांतांचे सर्व धर्माचे लोक गर्दी करून शहरात जागा मिळेल तेथे राहू लागले. अर्थात यातून प्रत्येकाची विचारसरणी, उपासनापद्धती, कामावर जाण्याची वेळ, अभ्यासाची वेळ वेगवेगळी. चोवीस तास शहरे जागीच असतात. त्यामुळे पूर्वी जे एकमार्गी जीवन होते, म्हणजे सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे ही पद्धती पूर्णतः विस्कटलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे वेळापत्रक देखील बदललेले आहे. 

त्यातून आहार पद्धती बोलायची तर अगदी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हमरस्त्यावर मटणाच्या बिर्याणीच्या/दारू दुकानांच्या पाट्या सरसकट दिसतात. आता यामुळे ज्याला जी अभिरुची आहे त्याला ते बरे वाटते,पटते. पण जो केवळ शाकाहारी आहे त्याला या पाट्या वाचतानादेखील संकोचल्याल्यासारखे होते. तरीदेखील पोटापाण्यासाठी प्रत्येकाची धावपळ चालूच असते. यांतून बोध होतो की एकमेकांनी आप-आपसात समजून घ्यावे व प्रत्येकाची सोय पाहावी.
 हेच तंत्र निकोप समाज यंत्रणेसाठी उपयुक्त ठरते.

आली कुठूनही कानी।
 टाळ-मृदुंगाची धून...
 नाद विठ्ठल विठ्ठल।
 ऊठे रोमारोमातून ।।

पूर्वी भोंगे- लाऊडस्पीकर नव्हते.
पहाटे पहाटे गावागावात मंदिरातून काकड्याचे, भूपाळीचे स्वर ऐकू येत असत. मशिदीतून दिलेल्या अजानाची लयबद्धता मनाला आनंद देणारी होती.
मात्र अलीकडच्या काळात अगदी समोर  २५ बाय २५च्या हॉलमध्ये पाच-पंचवीस श्रोते असले तरी माइकवरून बोलण्याची रूढी पडलेली आहे. अनेकदा मंदिरात कोणी नसते आणि पुजारी बटन दाबून प्रार्थना सुरू करतो.  स्पीकरमुळे आवाज दूरवर जातो आणि ध्वनी प्रदूषणाला खतपाणी घातले जाते. अनेक मशिदींवरील अजान एकाच वेळेला स्पीकरवरून ऐकविली जाते. यामुळे जे मोठे आवाज होतात त्याचा परिणाम आम जनतेला विविध पद्धतीने भोगावा लागतो. खरे पाहता आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत की स्पीकर वरून आम जनतेला काही संदेश देण्याची आवश्यकता देखील उरलेली  नाही. एकंदरीत स्पीकरचा अतिरिक्त वापर सर्वांनाच त्रासदायक ठरताना आपण पाहत आहोत. यात कोणत्या जाती-धर्माला दोष देण्यात अर्थ नाही.
अलीकडे दुपारी दोनच्या दरम्यान, सायंकाळी ७.००च्या दरम्यान कांदे-बटाटे फेरीवाले येऊन सोसायटीच्या खाली उभे राहतात. स्पीकर चालू करतात आणि ज्येष्ठ नागरिकांची पूर्ण झोपमोड करतात. घरामध्ये शांत निवांत बसलेल्यां/अभ्यासात मग्न असलेल्या सर्वांनाच यांचा त्रास होतो. हा आवाज एवढा मोठा असतो की अगदी सहाव्या सातव्या मजल्यापर्यंत घरामध्ये पोहोचतो. ज्याचा धंदा त्यांनी करावा. मात्र त्याचा त्रास इतरांना होऊ नये याची काळजी घेण्याचे तत्त्व पाळायला हवे की नको?  ते पाळले तर आरोप-प्रत्यारोपांची वेळच येणार नाही.
 सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तोही सर्वांना त्रास होईल अशा मोठ्या आवाजात स्पीकरचा वापर करणे केव्हाही त्रासदायकच ठरते. आपल्या कार्यक्रमातील मंडळींपर्यंत पोहोचेल एवढ्या लहान आवाजात स्पीकर लावला तर कोणालाही त्रास होत नाही. पण एकदा स्पीकर चालू झाला की एकमेकांशी बोलणे ही मुश्किल होऊन जाते. या वागण्याला काय बोलणार? यासाठी स्पीकरच्या वापराचे सामाजिक दुष्परिणाम या विषयावर साक्षरता होणे गरजेचे आहे. जेणेकरून स्पीकरच्या वापरासंदर्भात कोणाचाही अहंकार दुखावला जाणार नाही व सामाजिक स्वास्थ्य नांदेल.

लेखक : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने.
close