आयपीएलच्या पंधराव्या सत्राच्या ४८ व्या सामन्यात साऊथ इंडियन डार्बी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झालेली लढत आरसीबीच्या झोळीत पडली. याबरोबरच चौथ्या स्थानावर विराजमान होत आरसीबीने स्वतःचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न जिवंत ठेवले तर दहा सामन्यात सात पराभव स्विकारणाऱ्या गतविजेत्या सीएसकेचे रंगलेले स्वप्न उध्वस्त केले. चेन्नईचे अजून चार सामने शिल्लक असून ते सर्व जिंकले तरी त्यांचे चौदाच गुण होतील त्यामुळे त्यांना स्वतःच्या नव्हे त इतर संघांच्या कामगिरी बरोबरच नशिबावरही अवलंबून राहावे लागेल. सीएसके, आरसीबीला हरवून आपले अभियान सुरू ठेवेल अशा आशा होती.
कारण या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात सीएसकेने आरसीबीला हरविले असल्याने या सामन्यातही तसेच होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे होणे नव्हते. शेवटी आरसीबीने तेरा धावांनी विजय मिळवून सीएसकेचे बाह्यगमन पक्के केले. आता आपण सीएसकेच्या कोणत्या चुका त्यांच्या पराभवाचे कारण ठरल्या यावर एक नजर टाकूया.
कोहली व ड्यू फ्लेसिस यांना जमू देणे. या दोघांनी ६२ धावांची सलामी दिली. त्यानंतर हे दोघे व मॅक्सवेल १७ धावात बाद झाल्यानंतर आरसीबीच्या नवोदित फलंदाजांना रोखण्यात चेन्नईचे गोलंदाज कमी पडले. महिपाल लोमरोर २७ चेंडूत ४२, पाटीदार २१, दिनेश कार्तिक १७ चेंडूत नाबाद २६ यांच्यामुळे आरसीबीने सामना जिंकू शकणारी १७३ अशी मजबूत धावसंख्या उभी केली व तिचे रक्षणही करून दाखविले.
पुण्याच्या एमसीए मैदानावर १७४ धावांचे लक्ष साध्य करणे फारसे अवघड नव्हते. चेन्नईचे सलामीवीर ऋतूराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांनी ५४ धावांची सलामी देत पाया तर चांगला भरला. परंतु आरसीबी प्रमाणेच त्यांचीही घसरगुंडी उडून ३ बाद ७५ अशी अवस्था झाली आणि तेथेच चेन्नईचे गणित बिघडले.
चांगले खेळणाऱ्या मोईन अली पाठोपाठ रविंद्र जडेजाही बाद झाल्याने सीएसकेे अडचणीत आली. शेवटच्या दोन षटकात ३९ धावांची गरज असताना धोनी मैदानात होता परंतु १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला आणि तेथेच चेन्नई हरणार हे पक्के झाले.
दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या कामगिरीकडे बघितले तर क्षेत्ररक्षणा दरम्यान दोघांचीही कामगिरी चांगली झाली. प्रथम धोनीने मोईन अलीचा चांगला उपयोग केला. तर १९ वे षटक महेश तिक्षणाला देऊन धोनी मास्टर स्ट्रोकच खेळला. महेशने त्या षटकात तीन बळी घेतले व केवळ दोनच धावा दिल्या. यामुळे १९० च्या घरात जाऊ पाहणारी आरसीबीची धावसंख्या १७३ वर रोखली गेली. तर फलंदाज म्हणून धोनी सफसेल ठरल्याने सीएसकेच्या पदरी पराभव ठरला.
फाफ ड्यू फ्लेसिसने फलंदाजीत २२ चेंडूत चमकदार ३८ धावा केल्या तर क्षेत्ररक्षणा दरम्यान गोलंदाजीत शिताफीने बदल केले. मोहम्मद सिराज महागडा ठरतोय हे बघून त्याने कामचलाऊ गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा पूर्ण उपयोग केला. मॅक्सवेलने रायडू व उथप्पाला बाद करून आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
या सामन्यात आरसीबीच्या सकारात्मक बाबी बघितल्या तर कोहली, फाफ, लोमरोर, कार्तिक व पाटीदार यांची फलंदाजी उपयुक्त ठरली. तर हर्षल पटेल, मॅक्सवेल, शाहबाज, हेजलवूड यांनी चांगली गोलंदाजी केली. मॅक्सवेलचे फलंदाजीतील व मोहम्मद सिराजचे गोलंदाजीतील अपयश या गोष्टी आरसीबीसाठी निगेटिव्ह ठरल्या.
ऋतूराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे मोईन अली यांची फलंदाजी व महेश तिक्षणा यांची गोलंदाजी सीएसकेसाठी समाधानाची बाब ठरली तर मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरीस गोलंदाजीत महाग ठरले. शिवाय धोनी, रायडू, उथप्पा जडेजा यांचे फलंदाजीत ऐनवेळी कच खाणे सीएसकेसाठी या सत्राचे पॅक अप करणारे ठरले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

