shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांचं क्रिकेटही किती थरारक असतं हे अंतिम सामन्याने दाखवून दिले !

पुरूषांच्या क्रिकेटच्या तुलनेत महिला क्रिकेटला अजूनही दुय्यम दर्जाच दिला जातो. पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेट आजही कमी प्रमाणातच खेळलं जातं. महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, मानधन पुरुषांच्या तुलनेत आजही नगण्य अशाच आहेत. मात्र महिलांनी आपला खेळाचा दर्जा आता पूर्वीपेक्षा किती तरी पट उंचावला असल्याने पहिल्या तुलनेत महिलांचं क्रिकेट जास्त प्रमाणात बघितलंही जात आहे आणि महिलाही पुरुषांच्या तोडीस तोड खेळून प्रेक्षकांना आपल्या खेळाकडे आकर्षित करताना दिसतात.

            याचं बोलकं उदाहरण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयद्वारे संचलित " महिला टी-२० चॅलेंज २०२२ " ही स्पर्धा होय. या स्पर्धेत सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स व व्हेलॉसिटी या तीन संघानी भाग घेतला. हे तिनही संघ आपसात प्रत्येकाशी एक एक सामना खेळले. विशेष म्हणजे तीनही संघाच्या खात्यात एकेका विजयाची नोंद झाली. पहिल्या सामन्यात सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सचा मोठा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात व्हेलॉसिटीने सुपरनोवाजला हरविले. तर तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने व्हेलॉसिटीला हरविले. मात्र सरस धावगतीच्या आधारे सुपरनोवाज व व्हेलॉसिटी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.

    आता याच अंतिम सामन्या विषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया.

        आतापर्यंत महिलांच्या या चार स्पर्धा झाल्या असून आपले तिसरे विजेतेपद मिळविताना सुपरनोवाजाने प्रथम फलंदाजी करून १६५ धावा जमविल्या. या स्पर्धेच्या इतिहासात अजूनपर्यंत कोणीही एवढी मोठी धावसंख्या गाठून विजेतेपद मिळविले नसल्याने सुपरनोवाजचा विजय प्रत्येकाने ग्राह्य धरला होता आणि झालेही तसेच. मात्र व्हेलॉसिटीच्या तळाच्या फलंदाजांनी दिलेली जिगरबाज लढत अंतिम सामन्याला वेगळीच झळाळी देऊन गेली. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सुपरनोवाजने चार धावांनी विजय मिळवून या स्पर्धेवरील आपले प्रभुत्व सिद्ध केले.
          सुपरनोवाजने दिलेल्या १६६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीच्या शेफाली वर्मा व यास्तिका भाटियाने वेगवान सुरूवात केली खरी मात्र शेफाली वर्मा तिसऱ्याच षटकात आठ चेंडूत पंधरा धावा काढून बाद झाली आणि त्यांनतर पुढच्याच षटकात यास्तिका भाटियाही तेरा धावा काढून माघारी परतली. त्यानंतर किरण नवगिरे तेरा चेंडू खेळली परंतु शुन्यावरच बाद झाली. त्यामुळे व्हेलॉसिटी संकटात सापडली. हे कमी की काय म्हणून नटकान चंथाम ही सहा धावांवर बाद झाली. त्यानंतर संघाची पूर्ण जबाबदारी खांद्यावर पडलेली कर्णधार दिप्ती शर्माही दबाव पेलण्यात कमी पडली व केवळ दोन धावांवरच माघारी फिरली.
           त्यानंतर स्नेह राणा व लॉरा वुलफ़ार्ट यांनी संघाची बुडती नौका सावरण्याचा प्रयत्न करत सहाव्या बळीसाठी २६ चेंडूत ४० धावा जोडल्या खऱ्या तोच स्नेह राणा व राधा यादव सलग दोन चेंडूवर बाद झाल्याने व्हेलॉसिटी एका लाजिरवाण्या पराभवाच्या दारात उभी होती. त्यातच केट क्रॉस जलद धावा वाढविण्याच्या प्रयत्न सात चेंडूत तेरा धावा काढून बाद झाली.
          अशा वेळी नामुष्कीजन्य पराभव व्हेलॉसिटीच्या दारात बस्तान मांडून बसला होता. मात्र त्याच वेळी एक बाजू लावून धरलेल्या वुलफ़ार्टने तेहतीस चेंडूत अर्धशतक पूर्ण करून आपले इरादे स्पष्ट केले. नेमकी तिला त्याच वेळी सिमरन दिल बहादूरची साथ मिळाली.आठ गडी बाद झाले, समोरचा संघ चढलेला असला तरी दोघींनी कशाचीही पर्वा न करता अशी काही फटकेबाजी केली की, सामना पहाणाऱ्यांच्या नेत्रांचे अक्षरशः पारणे फेडले. दुर्देवाने शेवटच्या बारा चेंडूत चौतीस धावांची गरज असताना त्यांचे प्रयत्न केवळ चार धावांनी कमी पडले. शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती परंतु जगातील नंबर एक गोलंदाज एक्लस्टोनने सिमरनला मोठा फटका मारण्याची संधीच दिली नाही. परंतु प्रेक्षकांना एक चित्तथरारक सामना पहायला मिळाला. यापेक्षा दुसरे सुख असूच शकत नाही. सिमरन १० चेंडूत २० तर वुलफ़ार्ट ४० चेंडूत ६५ धावा काढून नाबाद राहिल्या. संघ पराभूत झाला परंतु त्यांच्या जिगरीने सर्वांची वाहवा मिळविली.   
          तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना प्रिया पुनिया ( २८ ) व डिएंड्रा डॉटीन ( ६२ ) यांनी वेगवान अर्धशतकी सलामी देत चांगल्या पैकी पाया भरणी केली. कर्णधार हरमन प्रितनेही ४३ धावा करून मोलाची कामगिरी केली.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close