प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी महत्वाचा असलेला गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना जिंकून आरसीबीने तूर्त तरी चौथ्या स्थानावर झेप घेऊन दिल्लीला पाचव्या क्रमावर ढकलले, मात्र दिल्लीला आणखी एक सामना खेळायचा असून त्यांची धावगती आरसीबीपेक्षा उजवी आहे. मुंबई विरूध्द दिल्लीने साधा विजय मिळविला तरी ते प्लेऑफमध्ये जातील व आरसीबी पुन्हा पहिल्या चार संघातून बाहेर निघेल. पर्यायाने त्यांची बाद फेरी स्वप्नच राहून जाईल.
आरसीबीच्या गुजरातवरील विजयाने पंजाब व हैद्राबाद अधिकृतरित्या प्ले ऑफ शर्यतीतून बाद झाले आहे. आरसीबीसाठी हा सामना आणखी वैशिष्टयमय ठरला तो यासाठी की, त्यांचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली खराब फॉर्ममधून बाहेर येत एक चांगली खेळी खेळला. त्याने ५४ चेंडूत ७३ धावा ठोकताना या आयपीएल सत्रात प्रथमच सामनावीर पुरस्कार मिळवून आरसीबीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. शिवाय कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिस बरोबर त्याने शतकी भागीदारी करून संघाला मजबूत सुरुवातही करून दिली.
या सामन्यात घडलेल्या काही नाट्यमय घटना थोडक्यात अशा होत्या.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात १६८ धावा बनविल्या. या धावांचा बचाव करण्यासाठी गुजरातला झटपट बळी मिळवून आरसीबीवर दबाव वाढविणं गरजेचं होतं. मात्र चौथ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर उपलब्ध झालेल्या संधीचा लाभ राशिद खानला झेल घेवून घेता आला नाही. विशेष म्हणजे डावाच्या सुरुवातीलाच कोहलीला मिळालेल्या जीवदानाचा लाभ उठवत त्याने वैयक्तिक ७३ धावा ठोकल्याच शिवाय शतकी सलामी देत विजयाचा पायाही मजबूत रचून दिला.
दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर एक नजर फिरवली तर फलंदाजीत हार्दिक पांडया ड्यू फ्लेसिस पेक्षा सरस ठरला. डावाच्या सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर हार्दिकने डावाला स्थैर्य देत ४७ चेंडूत नाबाद ६२ धावा ठोकल्या. त्यामध्ये आक्रमकते बरोबर संंयमही चांगलाच होता. तर ड्यू फ्लेसिसनेही शानदार खेळ करत ३८ चेंडूत ४४ धावा ठोकताना विराटसह शतकी सलामी देऊन संघाचा विजय जवळ जवळ तेंव्हाच निश्चित केला होता.
गुजरातकडून हार्दिक, मिलर, साहा व राशिद फलंदाजीत चमकले. साई किशोर व राशिद खानने गोलंदाजीत प्रभाव दाखविला. मात्र फलंदाजीत शुभमन गिल, मैथ्यू वेड व राहुल तेवतियाचे अपयश गुजरातला मोठी धावसंख्या बनविण्यास अडथळा ठरले. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, फर्ग्युसन व हार्दिक पांडयाला चांगल्या पैकी चोप बसला. मागच्या काही सामन्यात निराशजनक खेळ करणाऱ्या गुजरातला प्लेऑफ मध्ये जोमाने खेळ करावा लागणार आहे.
आरसीबीसाठी गोलंदाजीत शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा व हर्षल पटेलने अप्रतिम कामगिरी केली. तर सिध्दार्थ कौल, जोश हेजलवूड व महिपाल लोमरोर महागडे ठरले. फलंदाजीत कोहली, ड्यू फ्लेसिस व मॅक्सवेल चमकले.
कर्मधर्म संयोगाने जर आरसीबी प्लेऑफ मध्ये पोहचली तर त्यांना खेळाच्या सर्वच क्षेत्रात जोरदार सुधारणा कराव्या लागतील. परंतु सध्याची परिस्थिती सांगते की दिल्लीच प्ले ऑफ मध्ये पोहचेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

