आयपीएलचे पंधरावे सत्र सुरू होऊन बघता बघता दोन महिने होत आले असून या ५९ दिवसात ७० सामने झाले असून विजेतेपद मिळविण्यासाठी शेवटचे चार संघही वर आले आहेत. यामध्ये गुजरात, राजस्थान, लखनौ व बंगलोर यांचा समावेश आहे. मंगळवार २४ मे पासून प्ले ऑफ फेरीला सुरुवात होईल. गुणतालिकेत अव्वल असलेले गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स हे संघ प्रथम आपसात भिडतील व यातील विजेता थेट अंतिम सामन्यात खेळण्यास पात्र ठरेल. या पहिल्या क्वॉलीफायर मध्ये पराभूत झालेल्या संघाला संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरीची पावती म्हणून अंतिम सामन्यात पोहोण्याची आणखी एक संधी उपलब्ध केली जाते.
त्यासाठी त्यांना बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लखनौ सुपर जायंटस व चौथ्या स्थानावरील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणाऱ्या एलिनिटेर सामन्यातील विजेत्याशी दुसरा क्वॉलिफायर खेळण्याची संधी शुकवारी २७ मे रोजी मिळेल. त्यानंतर अंतिम सामना जगातले सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोंदी स्टेडियमवर रविवार २९ मे रोजी होणार आहे.
आयपीएलमध्ये प्रथमच एक संघ म्हणून खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने सर्वांनाच प्रभावित करताना गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविताना प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचा मानही पहिल्यांदाच मिळविला आहे. गुजरातचा पहिल्या क्वॉलिफायरमध्ये राजस्थानशी सामना होणार असून या पूर्वी झालेल्या साखळी सामन्यात त्यांनी राजस्थानला ३७ धावांनी हरविले असून वरकरणी बघता त्यांचे पारडे राजस्थान पेक्षा जड दिसते. जर गुजरात तेथे पराभूत झाले तरी त्यांना फायनलमध्ये पोहचण्याची दुसरी संधी मिळेल.
प्ले ऑफ मध्ये पोहोचलेले दुसरे दोन संघ लखनौ व आरसीबी यांच्या सोबत नंतर गुजरातला खेळावे लागू शकते. साखळीत गुजरातने लखनौला दोन्ही सामन्यात हरविले आहे. तर आरसीबीसोबत एक विजय एक पराजय अशी त्यांची कामगिरी आहे. त्यामुळे जेंव्हा त्यांचा या अंतिम पर्वात सामना होईल तेथे गुजरातला दक्ष राहावे लागेल. कारण साखळीत अव्वल राहून दोन्ही क्वॉलीफायर गमावून स्पर्धेतून बाद होण्याची पाळी सन २०१६ मध्ये गुजरात लायन्सवर आली होती. म्हणून यावेळी गुजरात टायटन्सला डोळ्यात तेल घालून दक्षता घ्यावी लागेल. नाहीतर त्यावेळी सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सवर जी वेळ आली ती हार्दिक पांडयाच्या गुजरात टायटन्सवर यायची.
राजस्थान रॉयल्स हा दुसऱ्या क्रमांकाचा संघ असून अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी यांनाही दोन संधी उपलब्ध होणार आहे. गुजरात विरूध्द त्यांना पहिल्या क्वॉलीफायरमध्ये झुंजावे लागेल. या सत्रात साखळीत राजस्थानची कामगिरी गुजरातविरूध्द फारशी चांगली नाही. परंतु हा सामना वेगळा असल्याने प्रत्यक्ष सामन्यात परिस्थिती व दबाव यांना ते कसे हाताळतात यावरच त्यांचे पुढील मार्गक्रमण अवलंबून असेल.
गुजरात विरूध्द जरी त्यांची कामगिरी समाधानकारक नसली तरी आरसीबी व लखनौला ते सहज पेलू शकतात. साखळीत ते पहिल्या सामन्यात आरसीबी विरुध्द चार गड्यांनी पराभूत झाले असले तरी दुसऱ्या सामन्यात राजस्थान २९ धावांनी जिंकले होते. तर लखनौ विरूध्द झालेल्या दोन्ही सामन्यात राजस्थानने बाजी मारली असल्याने फारशी भिती बाळगण्याची गरज नाही. परंतु अतिआत्मविश्वास त्रासदायक ठरू शकतो.
प्ले ऑफ मध्ये पोहोचलेला तिसरा संघ आहे लखनौ सुपर जायंटस. साखळीत जोरदार खेळ करूनही सातत्याच्या अभावामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल. सद्य परिस्थिती बघितली तर विजेतेपद मिळविण्यासाठी लखनौला प्ले ऑफ मध्ये अतिउच्च दर्जाचा खेळ करावा लागेल कारण प्ले ऑफ मधील इतर तीनही संघ साखळीत लखनौपेक्षा वरचढ ठरले आहेत. साखळीत ते राजस्थान व गुजरात विरूद्ध खेळलेले चारही सामने हारले आहेत तर आरसीबी विरूद्ध खेळलेल्या एका सामन्यातही पराभवच त्यांच्या पदरी पडला होता. त्यामुळे या तिनही संघाविरुद्ध त्यांची गाठ पडल्यास त्यांना प्रथम निर्भय व्हावे लागेल. तसेच एलिमिनेटर मध्ये आरसीबीला हरवावेच लागेल तरच पुढचे स्वप्न रंगवता येईल .
प्ले ऑफ मध्ये मोठया कष्टाने पोहोचलेला चौथा संघ आहे आरसीबी. साखळीत अनेक चढउतार पाहिलेल्या आरसीबीला मिळेल तो सामना जिंकला तरच पहिल्यांंदाच विजेतेपदाचे स्वप्न साकारता येईल. परंतु त्यासाठी त्यांना प्रथम लखनौचा फडशा पाडावा लागेल. तेथे त्यांची परिस्थिती त्यांना अनुकूल असेल कारण साखळीत आरसीबीने लखनौला हरविले आहे. परंतु निर्णायक सामन्यात आरसीबी गचकते हा पूर्व इतिहास असल्याने त्यांच्या पुढील आव्हान खडतर वाटते. शिवाय राजस्थान व गुजरातला ते हलक्यात घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तिनही सामने जिंकण्याचे कठिण कार्य आरसीबी समोर दिसते.
चला तर आता आपणही आयपीएलची सांगता गोड व रंगतदार होण्याची वाट बघत चांगल्या खेळाचा आस्वाद घेऊ या...
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

