shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील ; मा.खासदार शरदराव पवार

सातारा - ‘कर्मवीर अण्णांनी जे काम हातामध्ये घेतले त्यासाठी आपले आयुष्य सर्व खर्ची घातले.सर्व सामान्यांच्या मुलांमुलीना प्रोत्साहित करण्यासाठी ,ज्ञानाचा आधार देणे ही आपली जबाबदारी आहे हे मनात ठेवून उभे आयुष्य ज्ञानधारणेसाठी त्यांनी खर्ची घातले. त्याचा परिणाम म्हणून आज ही संस्था देशातली सर्वात महत्वाची संस्था झाली आहे. ७८९ शाळा, ४ लाख ४६ हजार विद्यार्थी,पंधरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  असा रयतेचा मोठा संसार उभा राहिला,अण्णांनी जे रोपटे लावले त्याचे खऱ्या अर्थाने वटवृक्षात रुपांतर झाले आहे.त्याला सेंद्रिय खतपाणी घालण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली त्यामुळे वृक्षाची वाढ झाली आणि त्याची फळे आज आपण चाखत आहोत. सर्वसामान्य वर्गातील शिक्षित वर्ग उभा करण्याचे काम अण्णांनी केले. आज रयतच्या वटवृक्षाची निरोगी वाढ होत असून यातून घडणारी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची पिढी देशाची प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान देत आहे. रयतच्या प्रगतीसाठी दानशूर व्यक्ती पुढे येऊ लागल्याने कर्मवीर अण्णांनी पाहिलेली स्वप्ने सत्यात साकार होऊ लागली आहेत.सर्वसामान्य वर्गास शिक्षण द्यावे तसेच ‘रयतने स्वतःचे विद्यापीठ काढावे’ ही इच्छा अण्णांची होती.आपल्याला राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे येत्या जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर समाधी परिसर येथे आयोजित केलेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी कर्मवीर कुटुंबीय ,खासदार श्रीनिवास पाटील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील,नामदार बाळासाहेब पाटील,नामदार विश्वजित कदम, मा.आमदार चेतन तुपे,मा. अरुण कडू पाटील,मा.जयश्री चौगुले, मा.खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार आशुतोष काळे,लोकनेते रामशेठ ठाकूर,ऍड.रविंद्र पवार,प्राचार्य आर.डी. गायकवाड,चंद्रकांत दळवी, मीनाताई जगधने,वैभव नायकवडी,प्रभाकर देशमुख, जयसिंगराव फाळके, आबासाहेब देशमुख,संजीव पाटील, माधवदादा मोहिते,प्रा.अजित पाटील ,संगीता प्रशांत पाटील, बीजमाता राहीबाई पोपेरे,श्रीमती रतनबाई देशमुख,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे,आमदार बाळाराम पाटील,ऍड..राम कांडगे ,इत्यादी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व जनरल बॉडी सदस्य व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,आजीव सभासद,आजीव सेवक उपस्थित होते.
ऑनलाईन एज्यूकेशन बाबत बोलताना ते पुढे म्हणाले,‘कोरोना काळात रयत शिक्षण संस्थेने ऑनलाईन एज्युकेशनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली.

रयत शिक्षण संस्था विविध औद्योगिक संस्थांशी करार करीत असल्याने विविध कंपन्या आता स्वतः ट्रेनिंग देणार आहेत आणि त्यामुळे संस्थेतील एक लाख विद्यार्थ्यांना आता नोकऱ्या मिळतील.बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याबद्दल गौरव करीत असताना ते म्हणाले की, ‘देशी बी-बियाणे सेंद्रिय शेतीचा आदर्श पोचवण्याचे त्या काम करतात.शिक्षणापासून बाजुला झालेली व्यक्ती आज जीवनमूल्यांचे शिक्षण देत आहे. आज अण्णा असते तर त्यांनी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिली असती’. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.नामदार दिलीप वळसे पाटील यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार देऊन संस्थेने त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एन.डी.पाटील हे आज आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आणि  त्यांनी  सर्वसामान्यासाठी आयुष्य झोकून देऊन काम केले, भाई गणपतराव देशमुख व शंकरराव कोल्हे यांनी अण्णांचा विचार सर्वत्र पोहचवला असेही ते म्हणाले. 
 या समारंभात  ज्यांना, ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात आला त्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे मनोगतात म्हणाल्या ‘आज मला  येथे पुरस्कार मिळाला अभिमानाची गोष्ट  आहे. या सारखे मी अनेक पुरस्कार घेतले ते माझे नसून मातीचे आहेत,मला अनेक पुरस्कार मिळाले  पद्मश्री पुरस्कार घेतला काही म्हणाले, ‘’तुला कसे वाटते ? मला  मातीचे ध्यान आले.काळ्या आईचे हे पुरस्कार आहेत, बियांचे आहेत, माझी मातीशी नाळ जोडली आहे .हे पुरस्कार शेतकरी बांधवांचे आहेत.हे काम करीत असताना जाणवते की, आपण खरोखर आपल्या आईला विसरलो आहोत.जुनं ते सोनं आणि खणखणीत नाणं आहे. आपण सगळे मनीच्या मागे लागलों आहोत. मी माझ्या घरी अनुभव घेतला .गावठी खाण्याचा,गावठी बेण्याचा अनुभव घेतला. मी शाळेची पायरी कधी चढले नाही. पण मला आता मोठमोठ्या कॉलेजवर जावे लागते. माझ्याकडे बी.एस्सी अॅग्रीची मुले शिकायला येतात. मला समाजात काहीतरी काम करायची इच्छा होती. आम्ही सात बहिणी होतो. खूप गरिबी होती. 

आमच्या वडिलांच्या बोटाला धरून आम्ही शेती केली. आमच्या वडिलांना शाळा शिकता आली नाही, वडिलांनी शेतीतले  ज्ञान शिकवले. आज  इथे प्रत्येक व्यक्ती कागद घेऊन बोलते, पण माझे वडिलांचा एकेक शब्द मी  डोक्यात ठेवला. मी शेतीचा, बांधाचा अभ्यास केला, पहिले आपण कोणते बी पेरायचो?, आता कोणते पेरतो?  याचा अभ्यास मी बांधावर केला. हाताची मेहनत आहे तेवढच मी सांगते. पूर्वी ताटात कोणते अन्न होते,आता कोणते आहे याचा बांधावर उभा राहून बारीक अभ्यास केला. मला घरात विरोध झाला .माझा नातू आजारी पडला. त्याला अकोले, संगमनेर, नाशिकला पार मुंबईला  नेले. त्यावेळी एक रुपया नसताना दीड लाख रुपये खर्च करावे लागले. माझ्या कुटुंबाला जुने ज्ञान शिकविले. हळू- हळू  लोकांना पटले. मी देशी वाण करायला लागले. देशी खायला लागले. औषधे वापरायचे बंद केले. मी रोपे तयार करायचे. बचत गट सुरु केले. बचत गटाला रोपे दिली. पाणी नसले  तर मी  माझ्या शेतात झाडे जगवून दाखवली. मी  बिसलरी बाटलीला सलाईन लावून झाडे जगवली. मी उसतोडी कामगार होते, मी  कडीपत्ता, पपई, शेवगा, पेरू ही झाडे उभी केली. त्यावेळी हळदी कुंकू समारंभ व्हायचे. मी वाण म्हणून मी रोपे दिली. माझे मार्गदर्शन घेऊन देशी बियाणांचे काम सुरु झाले. १०० सव्वाशे वाण मी घेतला. आज आपण आपली काळी माती संपवायच्या मागे लागलो. जी माता अन्न देते त्या आईचे आरोग्य राखा. पैसे कुणी खाऊ शकत नाही. चांगले अन्न खा. जुने पुढे आणले पाहिजे. देशी वापरले पाहिजे. देशी डाळी पुढे आणायला पाहजे. आपण पैसे देऊन विष घेत आहोत. म्हणूनच विषमुक्त अन्न यायचे असेल तर विषमुक्त शेती करा. आपण प्रत्येकाने शेतात परसबाग लावली पाहिजे. प्रत्येक गावात पैशाच्या बँका आहेत, पण आता प्रत्येक गावात देशी बियाची बँक तयार झाली पाहिजे. पैश्याच्या मागे लागून आपल्या मातीचे नुकसान करू नका. कोरोना काळात शेतकरी घरात बसला तर तुम्ही काय खाल्ले असते? जे  झाडाखाली राहिले ते चांगले राहिले, जे दवाखान्यात गेले ते मेले. आत्महत्या शेतकरयांनी करू नका. प्रत्येकाने जुन्याकडे वळले पाहिजे. जुन्यात खूप ताकद आहे. पूर्वी माणसे १०५ वर्षे जगत होती आता ६० वर्षातच मरायला लागतात. पूर्वी माणसे देशी खात होती. त्यामुळे त्यांच्यात ताकद होती. त्यावेळी  मुलींची डिलिव्हरी व्यवस्थित होत होती कारण त्यांना अन्नातून ताकद मिळत होती, आजच्या मुली पहिल्या महिन्यापासून दवाखान्यात जातात आणि सिझरीन करतात. म्हणूनच देशी अन्न खाल्ले पाहिजे’’ असे विचार त्यांनी मांडले .

 महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इस्माईल साहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार दिल्याबद्दल मनोगत व्यक्त करून संस्था व मुल्ला कुटुंबीय यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  दिलेल्या पुरस्कार रकमेत भर टाकून २५ लाख रुपये इतकी देणगी त्यांनी रयत शिक्षण संस्थेला देण्याचे जाहीर केले तसेच हा पुरस्कार मा.शरदरावजी पवार यांना अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचा  विविध औद्योगिक  संस्थांशी करार झाल्याने व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपयोजन होत असल्याने संस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीर पुण्यतिथी निमित्ताने माजी मंत्री, संस्थेचे उपाध्यक्ष भाई गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण कर्मवीर भाऊराव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांनी तो पुरस्कार स्वीकारला. शाश्वत शेतीच्या संवर्धनासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांना सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार याना देण्यात आला .या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रुपये अडीच लाख, मानपत्र, रयत वस्त्र असे आहे. तर रयत शिक्षण  संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसेपाटील यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव  संस्थेचे अध्यक्ष शरदरावजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे पायाभूत सुविधांसाठी देणगी देणारे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, बाबुराव विष्णू जवळेकर, श्रीम.सुशीला सुरगोंडा पाटील, अशोक शेंडूरे या थोर देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून सुजित भस्मे, अजितराव जंगम, संतोष चांगण, करण तिकटे, विनायक पाटील, उमेश व्हरकुटे, सतीश  नागरगोजे, आकाश ठाकरे, प्रशांत विधाते, अजित धोंडीराम पवार, प्रवीण बोडरे, प्रतिक जाधव, या नवनियुक्त अधिकारी तसेच विद्यापीठात गुणवत्ता यादीत आलेले देशपांडे नारायणी, नाईक सुमित्रा, मगर आरती, भिडे रेखा यांचा सत्कार घेण्यात आला. संस्थेच्या विविध विभागातील उपक्रमशील व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शाखांना कर्मवीर पारितोषिक प्रदान करण्यात आले.त्यात डी.पी.भोसले कॉलेज, कोरेगाव, श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय, सावळज, न्यू इंग्लिश स्कूल, मुलींचे, लोणंद, डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यामंदिर,कोपरगाव, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ पुणे,  यशवंत विद्यालय पंढरपूर, न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स मलकापूर, जनता इंग्लिश स्कूल संवत्सर अहमदनगर, श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालय मोरगाव , न्यू इंग्लिश स्कूल काळगाव सातारा ,महात्मा गांधी विद्यालय सरुड कोल्हापूर,माननीय शरदरावजी पवार माध्यमिक विद्यालय निगडोळ, नाशिक शिवाजी विद्यालय धामणी, पुणे माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर, रायगड नूतन माध्यमिक विद्यालयात  चांग्याचापाडा, ठाणे, बळवंत कॉलेज विटा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सातारा, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, सद्गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर सैदापूर कराड, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर, पालघर अशा उपक्रमशील शाखांना संस्थेचे अध्यक्ष  खासदार शरदरावजी पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.   

कार्यक्रमाचे प्रारंभी रयतगीत गायन प्रा.संभाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मानपत्रांचे वाचन संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.संजय नागपुरे यांनी आभार  मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

वृत संकलन : शौकतभाई शेख, श्रीरामपूर
close