श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय'असा गौतम बुद्धाचा संदेश जपत ज्ञानदीप गरिबांच्या झोपडीत लावला, हा चरित्रपट थक्क करणारा आहे, म्हणूनच कर्मवीर म्हणजे परमेश्वराला पडलेले एक कल्याणकारी स्वप्नच म्हणावे लागेल असे विचार माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने शेळके हॉलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अनारसे बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते, प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, सुखदेव सुकळे,प्रा.शिवाजीराव बारगळ, आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर अण्णा आणि आपले शिक्षण यांचे अनुभव सांगितले. शब्दगंध साहित्यिक परिषद, श्रीरामपूर शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्राचार्य शेळके यांनी शाल, पुस्तके देऊन लेविन भोसले यांचा सत्कार केला.
प्राचार्य अनारसे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, कर्मवीरांनी नगर जिल्ह्यात वणवण फिरून शिक्षण खेड्यापर्यंत नेले १९४८ साली नगरला भापकर यांच्या घरी कर्मवीरांनी केलेले भाषण ऐकून,कर्मवीर दादा पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्जतला बरोबर नेले आणि सोमवारच्या भर बाजारात सभा घेतली, त्यातूनच लोकांचा पाठींबा मिळाला आणि कर्जतला महात्मा गांधी विद्यालय सुरु झाले, कर्मवीर अण्णा आणि कर्मवीर दादा पाटील यांनी माझ्या पाठीवर,डोक्यावर हात ठेवला,माळावरच्या माझ्यासारख्या पोराला आधार दिला म्हणूनच आम्ही शिकलो नि जीवनात सुखी झालो, कर्मवीर नसते तर मी गुराखीच राहिलो असतो, अशा आठवणी सांगितल्या.कर्मवीर विचारांचा आदर्श जपणारे साहित्यिक लेविन भोसले (सर) यांची शब्दगंधच्या शाखा अध्यक्षपदी निवड होणे हा पुरोगामी विचाराचा प्रत्यय आहे. लेविन भोसले आपल्या मनोगतात म्हणाले, माझे बोरावके कॉलेजमध्ये शिक्षण झाले, त्यामुळे रयत आणि कर्मवीर अण्णा हे माझ्या श्रद्धेचे विषय आहेत.मी विज्ञानाचा विद्यार्थी असलो तरी ऍड.रावसाहेब शिंदे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या विचार, कार्य आणि लेखनामुळे मी साहित्यिक झालो, डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या संपर्कात लेखन केले, त्यामुळेच सुनील गोसावी, भगवान राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माझी शब्दगंधच्या अध्यक्षपदी निवड झाली.प्राचार्य शेळके साहेब यांनी केलेला हा पहिला सत्कार मला प्रेरणादायी असल्याचे भोसले यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णा हे नवप्रवर्तक होते, कर्मवीर म्हणजे अफलातून सामाजिक बुद्धिमत्ता असणारे शिक्षणमहर्षी होते.हाती काही नसताना विविध योजना राबवत आणि गोरगरिबांना बरोबर घेऊन त्यांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था हा जगातला आगळा वेगळा प्रयोग आहे, अनेक अडचणीवर त्यांनी मात केली,श्रीमंतांकडून,परदेशाकडून मदत न घेता, मुष्ठीफ़ंड योजना,कमवा आणि शिका योजना ,श्रमाशिवाय शिक्षण नाही असे वेगळे उपक्रम राबविले, ही संस्था सर्वसामान्य रयत ची आहे ही जाणीव त्यांनी निर्माण केली.
कर्मवीरांचे कार्य विश्वविख्यात आहे असे सांगून भोसलेसरांसारखे व्यक्तिमत्वे ही याच विचारातून घडली म्हणून त्यांची निवड सार्थ असल्याचे सांगितले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.

