shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त,बौद्धिक शैक्षणिक व्याख्यानमालेचे आयोजन..!


सातारा - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक  ९ मे २०२२ रोजी कर्मवीर समाधी परिसर करण्यात आलेले आहे. या  समारंभास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषिमंत्री मा.खासदार शरदरावजी पवार साहेब उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. 

कर्मवीर पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी बौद्धिक शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित केली जाते. गेले २ वर्षे कोविड -१९ मुळे ती घेता आली नाही. मात्र यावर्षी संस्थेने दरवर्षीप्रमाणे रयतमधील शाखाप्रमुख यांच्या ज्ञान विस्तारासाठी शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यातील उच्च शिक्षण व्याख्यानमालेचे उद्घाटन घनंजयराव गाडगीळ कॉलेजमध्ये शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.डॉ.अनिल पाटील यांचे हस्ते होणार आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षण’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.आर.के.कामत यांचे पहिलेच व्याख्यान होणार आहे. 

या दिवशी दुपारी ‘कौशल्य विकास व रोजगाराबाबत शासनाच्या विविध योजना’ या विषयावर कौशल्य,रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक, मा.सुनील पवार,सातारा यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी अडीच वाजता रुसाचे वरिष्ठ सल्लागार प्राचार्य डॉ.पी.एन.पाब्रेकर यांचे’ ‘ रुसाच्या विविध योजना व क्लस्टर विद्यापीठ‘ या विषयावर व्याख्यान होईल. तर दुपारी साडेतीन वाजता ‘जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर येथील व्यवस्थापक सौ.गंधाली दिंडे यांचे ‘उद्योजकता विकास व स्टार्टअप‘’ या विषयावर व्याख्यान होईल. ८ मे २०२२ रोजी सकाळी साडे आठ वाजता ‘नॅक बाबतच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा होणार असून प्राचार्य डॉ.आर टी.देशमुख औरंगाबाद हे मार्गदर्शन करणार आहेत.सकाळी दहा वाजता ‘विद्यापीठ अनुदान आयोग व उच्च शिक्षण’ या विषयावर यु.जी..सी.चे सहसचिव डॉ.आर.मनोजकुमार यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी अडीच वाजता‘औद्योगिक उपयोजनांसाठी संशोधन व पेटंट’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस .पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. 

       माध्यमिक विभागासाठी आयोजित केलेली  शैक्षणिक व्याख्यानमाला यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे  दिनांक ७ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून ‘मी आणि माझी शाळा ‘ या विषयावर कोल्हापूर विभागाचे उपसंचालक मा.महेश चोथे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ‘मुख्याध्यापकाची जबाबदारी आणि कर्तव्य’या विषयावर निवृत्त शिक्षण संचालक मा.नामदेवराव जरग यांचे व्याख्यान होणार आहे. याच दिवशी दुपार नंतरच्या सत्रात ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण‘या विषयावर प्राचार्या डॉ.वंदना जाधव नलावडे यांचे तर  ‘शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलूया ‘’या विषयावर प्राचार्य डॉ.आर.ए.कुंभार यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता ‘मॅनेज युवर लाइफ’ या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ.राजेंद्र मोरे यांचे व्याख्यान  होणार आहे .८ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता ‘’एकविसाव्या शतकात कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांची प्रस्तुतता ‘ या विषयावर निवृत्त शिक्षण संचालक मा. शिवाजी तांबे यांचे व्याख्यान तर दुपारी अडीच वाजता ‘’२१ व्या शतकातील शैक्षणिक आव्हाने ‘या विषयावर सहायक शिक्षण संचालक श्रीमती मीना शेंडकर यांचे व्याख्यान होणार आहे.८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रकाशन समारंभ यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे  आयोजित करण्यात आलेला आहे.रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.संजय नागपुरे,रयत शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. प्राचार्य शहाजी डोंगरे,संस्थेच्या मध्यविभागाचे इन्स्पेक्टर मा.राजेंद्र साळुंखे,संस्थेच्या विविध विभागाचे अधिकारी इत्यादींच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक व्याख्यानमाला व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ यांचे आयोजन केले असल्याचे कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर.के.शिंदे यांनी सांगितले.
------------------------------------------------------
वृत्त संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर.
close