शिर्डी / तुषार महाजन:
महाराष्ट्र पत्रकार संघाचे 18 वे अधिवेशन साईबाबाच्या शिर्डी नगरीत रविवारी ( 29 मे ) रोजी पार पडले, यावेळी डिजिटल मीडियावर पुणे लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांचे प्रमुख मार्गदर्शन आयोजित केले होते. या अधिवेशनास राज्यभरातून 500 हुन अधिक पत्रकार, पुरस्कार प्राप्त मान्यवर, त्यांचे मित्र, नातेवाईक असे जवळपास एक हजार लोक उपस्थित होते. श्री ढेपे यांनी आजवर आपली वाटचाल, पूर्वीची पत्रकारिता, आताची पत्रकारिता आणि भविष्यात होणारे बदल याविषयी पत्रकारांना संबोधित केले. हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहेत, पत्रकारांनी काळाबरोबर बदलले पाहिजे, येणारा काळ मोठा कठीण असून 5 G सुरू झाल्यावर पत्रकारांनी नेमकं काय केलं पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, पत्रकार पुरुषोत्तम सांगळे, आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आपल्या भाषणात ढेपे यांचे व या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रिंट मिडीयाचे पत्रकार, संपादक, डिजिटल मिडीयाचे पत्रकार, संपादक, इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकार उपस्थित होते.

