shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्ष स्थानावरील गुजरातला पंजाबचा दे धक्का !



         आयपीएल २०२२ च्या सत्रातील ४८ व्या सामन्यात मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर पंजाब किंग्ज व टेबल टॉपर गुजरात टायटन्स यांच्यात एक एकतर्फी सामना झाला. मात्र यावेळी गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यापूर्वी नऊ पैकी आठ सामन्यात विजय मिळविणाऱ्या गुजरातची ना फलंदाजी धड झाली ना गोलंदाजी, क्षेत्ररक्षणानेही त्यांना दगा दिला.


          एरव्ही प्रत्येक कर्णधार नाणेफेक जिंकून प्रतिपक्षाला प्रथम फलंदाजीस पाचारण करत असताना गुजरातचा कर्णधार हार्दिक पांंड्याने सर्वांना बुचकळ्यात टाकणारा निर्णय घेत स्वतः प्रथम फलंदाजी घेतली. ताज्या वातावरणाचा अचूक लाभ घेत पंजाबच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी गुजरातच्या तडाखेबाज फलंदाजांना जेरबंद केले व केवळ १४३ धावात रोखले व स्वतः चार षटके व आठ गडी राखून विजय मिळवत धावगती उंचावून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना बळकटी दिली.
           सामन्याच्या सुरुवातीलाच पॉवर प्लेमध्ये सहा वर्षानंतर आयपीएलमध्ये परतलेल्या ऋषी धवनने एका अचूक फेकीवर गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलला धावबाद करून गुजरातच्या डावाला घरघर लावली. त्यानंतर कागिसो रबाडाच्या धारदार गोलंदाजीने गुजरातच्या फलंदाजांची कत्तलच केली. मागच्या दोन सामन्यात सलामीवीर गिल व वृध्दीमान साहा यांनी चांगली केली होती, त्यामुळे गुजरातला मोठया धावसंख्या रचता आल्या होत्या अथवा चेस करायला सोपे गेले होते. मात्र यावेळी गिलला ऋषी धवनने धावबाद करून गुजरातला धक्का दिला.
           वृध्दीमान साहाला मागच्या सामन्याप्रमाणे विशेष सापडली नाही. संदिप शर्मा, रबाडा व अर्शदिपच्या गोलंदाजीपुढे तो हताश दिसला व धावा होत नसल्याच्या दबावात बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांडयाही एका धावेवर बाद झाला. मागच्या तिन सामन्यात त्याच्या धावाही होत नाही, गोलंदाजीही करत नाही व तंदुरूस्तीचा प्रश्नही पुन्हा उभा राहिला आहे. शिवाय संघ पहिल्याच प्रयत्नात टॉपला गेला असल्याने त्याच्या डोक्यात ग ची हवा गेल्याचे दिसत आहे.
           गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरत आलेले राहुल तेवातिया ११, मिलर ११ व राशिद खान शुन्यावर बाद झाल्याने त्यांचा प्रतिकार ताबडतोब मावळला. कागिसो रबाडाने तिखट मारा करत ३३ धावात साहा, तेवतीया,राशिद व फर्ग्युसन यांना बाद केले. तोच सामनावीर ठरला. तर पंजाबकडून शिखर धवन नाबाद ६२, भानुका राजपक्षे व ४० लिविंगस्टोन १० चेंडूत नाबाद ३० धावा करत विजयात महत्वाची भूमिका बजावली.
          कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या या सामन्यात सर्वच मोर्चावर नाकाम ठरला. तर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल क्षेत्ररक्षण लावण्यात व गोलंदाजीत योग्य ते बदल करण्यात शंभर यशस्वी ठरला. मात्र मागील काही सामन्यात त्याची बॅट म्हणावी अशी न , चालल्याने यावेळी त्याने सलामीला येणे टाळले व स्वतः ऐवजी जॉनी बॅरिअस्टोला प्रमोशन दिले. त्याच्या सुदैवाने त्याला फलंदाजीला जाण्याची वेळच आली नसल्याने झाकली मुठ सव्वा लाखाचीच ठरली.
         गुजरातची प्लेऑफ जवळ जवळ निश्चित असून पंजाबने सरस धावगतीसह पाचव्या स्थानावर उडी घेतल्याने त्यांच्या आशा वाढल्या आहेत, परंतु त्यांचा लौकीक सातत्याने विजय मिळविण्याचा नसल्याने पुढच्या चार सामन्यातील त्यांची कामगिरीच त्यांचे प्ले ऑफचे भवितव्य ठरविणार आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close