सावित्रीबाई फुले आश्रमशाळेत रंगली पालक सभा.
इंदापूर प्रतिनिधी ( दि.२०) :- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे ही पालक सभेची उद्दिष्टे असून त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा त्रिवेणी संगम साधला गेला पाहिजे असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी व्यक्त केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पालक सभेचे आयोजन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच (दि.२०) सोमवारी रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पालक सभेवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.तदनंतर पालक सभेला सुरुवात झाली.
यावेळी उप-प्राचार्या सविता गोफणे म्हणाल्या की, शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. बहुजन महापुरुष / महामाता यांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम, संत, शास्त्रज्ञ,क्रांतिकारक व विचारवंतांचा आदर्श घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवर वक्तृत्व,निबंध, रांगोळी,हस्ताक्षर,लेखन आदी स्पर्धा घेतल्या जातात.यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा मुळ उद्देश असल्याचे उपप्राचार्या गोफणेंनी सांगितले.
प्राचार्या अनिता साळवे यांनी यावेळी शाळेत राबविले जाणार विविध उपक्रम,शाळेत झालेल्या सुधारणा,सुविधा,शैक्षणिक बाबी, विद्यार्थ्यांची विद्यमान गुणवत्ता. तसेच अधिकच्या गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न,याचा आढावा यावेळी घेतला. तसेच पालकांनी सतर्क राहून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक बाबीसाठी शिक्षक व अधीक्षकांशी संपर्कात रहा. व वेळोवेळी शाळेत येऊन आपल्या पाल्यासंबंधी विचारपुस करत जा. असा मौलिक सल्ला यावेळी पालक सभेत प्राचार्या साळवेंनी पालकांना दिला.
यावेळी सोनाली वाघमारे , राजेंद्र पिसे ह्या पालकांनी देखील आपली मतं पालक सभेत व्यक्त केली.त्यांनी शाळेच्या उपक्रमाचे,गुणवत्ता वाढीचे , सुंदर शालेय परिसराचे, सामाजिक उपक्रमांचे व शाळेत मिळणाऱ्या सुविधांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले. तर आभार प्रा.जावेद शेख यांनी मानले.

