शिवसेनेचे दक्षिणेतील संपर्कप्रमुख मा. भाऊ कोरगावकर यांची गेल्या 25 वर्षाहुन अधिक काळ अखंड अहमदनगर जिल्हा शिवसेनेशी नाळ जुळलेली असून आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वामुळेच अटीतटीच्या वेळी जिल्ह्यातील महानगरपालिकेत दोनदा भगवा फडकला व शिवसेनेचा महापौर झाला असून वैयक्तिक स्वार्थासाठी अंतर्गत वाद नको, असे परखड मत शिवसेनेचे युवा नेते मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले आहे.
नुकताच शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेबांचा शिर्डी दौरा झाला असून यावेळी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्रकारांशी बोलताना सिनगर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अनेक बाबींचा खुलासा केला आहे. सद्य परिस्थिती पाहता शिवसेना मोठ्या राजकीय संकटातून जात असताना नुकतेच युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम भैय्यानी संपर्कप्रमुख यांच्याबद्दल जाहीर केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनिल भैय्या आमचे राजकीय मार्गदर्शक असून आम्ही नेहमीच त्यांच्या विचाराचा आदर करत आलो आहे, परंतु सन्माननीय विक्रम भैय्याना याचा विसर पडला की काय, असा प्रश्न आता सामान्य शिवसैनिक विचारतो आहे. जे मतभेद एकत्र बसून सुटू शकतात, त्याबाबत जाहीर मत व्यक्त करताना आपल्याकडून शिवसेना पक्षाची हानी होता कामा नये, इतकीच माफक अपेक्षा आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांची आहे. आजवर शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून आदरणीय भाऊंनी संपूर्ण जिल्ह्यात आपला ठसा उमठवलेला असून आजपर्यंत पुराव्यानिशी त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही. त्यांच्या कामाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसून कधीही अर्थकारणाला थारा न देता प्रामाणिकपणे शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहून ताकद देणाऱ्या मातोश्रीच्या विश्वासू शिलेदाराला बदनाम करू नये, असे परखड मत सिनगर यांनी व्यक्त केले.
शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी फार मोठी चूक केली असून पक्षप्रमुखांच्या विश्वासाला ठेच पोहचवली आहे. ते आता परत कधीच खासदार होऊ शकणार नाहीत कारण ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्षाशी प्रतारणा केली, त्यांना त्याची खुप मोठी किंमत मोजावी लागली असल्याचा या मतदार संघाचा इतिहास आहे. येणाऱ्या काळात सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना परत भक्कमपणे उभी राहणार असून आमचा आमच्या पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व अढळ श्रद्धा आहे. उत्तर नगर जिल्ह्यात यापुढे शिवसेनेचे भगवे वादळ येणार असून प्रत्येक शिवसैनिक सामान्य जनतेच्या प्रश्नावर झटून काम करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. आपण नेहमीच शिवसैनिकांना जपलं पाहिजे या भूमिकेत शेवटी "शिवसेना" या चार अक्षरावर प्रेम करणाऱ्यांनी आपापसात वाद निर्माण करू नये, कारण त्याचे भांडवल करून शेवटी विरोधक फायदा उचलतात, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे ऍड. राहुल नवले, सुधाकर वादे, अशोक पवार, सुनिल गिते, रविंद्र सोनवणे, संजय नायडू, जयराम कदम आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

