shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वेस्ट इंडिजमध्ये निर्भेळ यश मिळाले खरे ; परंतु त्याने हुरळून जाणे चुकीचे ठरेल..!



          विंडीजच्या त्रिनिदाद बेटावरील  क्विन्स पार्क, ओवलवर तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका यजमान विंडीज व पाहुण्या भारतीय संघात संपन्न झाली. या सामन्यात पाहुण्या संघाने चांगलाच पाहुणचार झोडला. गेल्या ३९ वर्षात एकाही भारतीय कर्णधाराला जमली नाही ती कामगिरी हंगामी कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखालील नवोदितांनी भरलेल्या टिम इंडियाने केली. मालिकेतील तीनही सामने भारताने जिंकून विंडीजला त्यांच्याच भूमित प्रथमच क्लीन स्वीप केले.

          पहिल्या दोन सामन्यात झालेला रंगतदार खेळ तिसऱ्या सामन्यात दिसला नाही. आधीचे दोन सामने अंतिम षटकात निकाली ठरले असल्याने प्रेक्षकांना तिसऱ्या सामन्यातही अशाच तुल्यबळ लढतीची अपेक्षा होती. मात्र प्रथम भारतीय फलंदाज, मध्यंतरी पाऊस व शेवटी भारतीय गोलंदाज विंडीजला रोखण्यात कारणीभूत ठरले.
          भारताकडून सलामीवीर कर्णधार शिखर धवन व शुभमन गिलने पहिल्या सामन्याप्रमाणे परत एकदा शतकी सलामी दिली. पहिल्या सामन्यात धवन (९७) चे शतक हुकले होते तर यावेळी शुभमनचे (नाबाद ९८ ) शतक होऊ शकले नाही. धवनचे अर्धशतक व श्रेयस अय्यरच्या नाबाद ४४ धावांच्या जोरावर भारताने ३५ षटकात ३ बाद २२५ धावा ठोकल्या. त्यानंतर पावसाने मोठा व्यत्यय आणल्याने भारताचा डाव तेथेच आटोपता घ्यावा लागला. पर्यायाने सामन्याचा निकाल लावण्याच्या दृष्टीने डकवर्थ - लुईस -स्टर्न (डिएलएस) या प्रणालीचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे विंडीजला ३५ षटकात २५७ धावांचे सुधारीत लक्ष मिळाले.
            विंडीजच्या डावाची सुरूवात दिपक हुड्डाच्या निर्धाव षटकाने झाली. त्यानंतर मोहम्मद सिराजने सलामीवीर काईल मेयर्स व तिसऱ्या क्रमांकावरील शेमराह ब्रुक्स यांना त्याच षटकात शुन्यावरच परतविले तेंव्हा विंडीजच्याही धावांचे खाते उघडले नव्हते. हाच खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. त्यानंतर कर्णधार निकोलस पुरन ४२ व ब्रेंडन किंग ४२ यांचे प्रयत्न तोकडे पडले. विंडीजचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू न शकल्याने विंडीजचा डाव २६ षटकात १३६ धावात लपेटला गेला. त्यामुळे भारताला ११९ धावांचा मोठा विजय मिळाला. भारताकडून यजुवेंद्र चहल चार, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर प्रत्येकी दोन तर दिपक हुड्डा व प्रसिध्द कृष्णाने एक - एक बळी मिळविला. सामनावीर व मालिकावीर शुभमन गिल ठरला.
           कर्णधार म्हणून शिखर धवन यशस्वी ठरला असला तरी त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगदी थोडे दिवस शिल्लक असल्याने तो भविष्यातला कर्णधार नसेल, परंतु या मालिकेतील दोन सामन्यातील त्याची चांगली फलंदाजी त्याला सन २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी टिम इंडियात दावेदारी करण्यास मदत नक्कीच करतील.
             तिनही सामन्यात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर चांगला खेळला. शेवटच्या सामन्यात तो नाबाद राहिला. पहिल्या दोन सामन्यात त्याने जम बसल्यावर विकेट फेकल्या, त्यामुळे त्याला आपल्या खेळात मोठा सुधार करावा लागणार आहे. संजू सॅमसन फलंदाजी व यष्टीरक्षणात उठून दिसला. दिपक हुड्डाने फलंदाजीत फार मोठे योगदान दिले नसले तर गोलंदाजीतील त्याची प्रभावी कामगिरी त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत देऊन गेली. अक्षर पटेल दुसऱ्या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार होता. त्याच्या फलंदाजीत सुधारणा दिसत असून गोलंदाजीत आणखी धार आणण्याची गरज आहे. गोलंदाजीत चहल, सिराज, ठाकूर प्रभावी ठरले. तर आवेश खान व प्रसिद्ध कृष्णाला आपल्या गोलंदाजीवर खूप काही मेहनत करावी लागणार आहे.
           या मालिकेत सर्वांच्या नजरेत खुपले असेल ते सुर्यकुमार यादवचे 
अपयश ! आयर्लंड - इंग्लंडमध्ये लक्षणीय कामगिरी केल्यानंतर विंडीजमध्ये त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तिनही सामन्यात त्याची बॅट अबोल राहीली. इतर फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याच्या अपयशाची मोठी चर्चा होणार नाही. परंतु सुर्याला वनडे व टि-२० च्या तंत्रातील फरक समजून घेण्याची वेळ आली आहे यावर कुणाचेही दुमत नसेल.
            विंडीज विरूध्द भारताच्या नवोदित व अननुभवी संघाने ३-० असा विजय मिळविला असला तरी त्याने फार काही हुरळून जाण्याची गरज नाही. कारण विंडीजचा संघ आयसीसी गुणांकनात खालच्या संघात गणला जातो. शिवाय मागच्याच महिन्यात विंडीजच्या याच संघाला बांगलादेशच्या कमजोर संघानेही तेथे जाऊन ३-० असे चिरडले होते. त्यामुळे भारताने फार मोठा तिर मारला नाही.
             या मालिका विजयाने केवळ एकच सकारात्मक गोष्ट घडली. ती म्हणजे खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे व तो त्यांना भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणादायक ठरेल !

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close