शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित..!!
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उद्या (बुधवारी) पासून सुरू होणारा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सचिवांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
यासंदर्भातील पत्रकात निवडणुक आयोगाच्या सचिवांनी म्हटले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांना आयोगाच्यावतीने देण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष याचिकेमध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली. त्यात बांठिया आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची केलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठीची तयारी झाल्याचे म्हणणे राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणीच निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
इतर निवडणुका पुढे ढकलण्याचे सूतोवाच न्यायालयाने केले होते. त्यानुसार आयोगाने नियोजित आरक्षण सोडत स्थगित केली आहे. आता ओबीसींच्या आरक्षणासह नव्याने सोडत निघण्याची शक्यता आहे. आता आठवड्यानंतर दुसरी सुनावणी होणार आहे.
त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला जिल्हा परिषद व पंचायत समितीचा आरक्षण सोडतीच कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. सुधारित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाच्यावतीने यशावकाश देण्यात येईल, असे आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी म्हटले आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

