बांधकाम कामगार अधिका-यांचा मनमानी कारभार
अद्यापही बरेच कामगार नोंदणीपासून वंचित
लातूर । प्रतिनिधी -
लातूर जिल्ह्यात वडार समाज एवढ्या मोठ्या संख्येने असूनही अद्यापही बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात जाणीव पूर्वक दूरच ठेवण्यात आले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. बरेच कामगार ऑनलाईन नोंदणी करूनही कार्यालयातील अधिका-यांनी काही ना काही ञुटी काढून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेद्वारा सातत्याने अनेक वेळा निवेदने देऊन आणि वारंवार कार्यालयातील अधिका-यांना भेटून माहिती देऊन देखील यावर कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत, त्यामुळे अधिका-यांचे लक्ष वेधण्यासाठी या बांधकाम कामगार अधिका-यांच्या मनमानी कारभारा विरोधात दि.६ जुलै रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी केली आहे.
याबाबत श्रीकांत मुद्दे म्हणाले की, ब-याच बांधकाम कामगारांनी २०१९ साली नोंदणी असूनही आणि ५००० रूपयाचा फाॅर्म भरून देऊनही अद्यापही ५००० रूपये खात्यावर जमा झाले नाहीत. याविषयी मागील दोन वर्षापासून वारंवार माहिती आणि निवेदने देऊनही कसलीच अंमलबजावणी झाली नाही उलट अधिका-यांकडून वरच्या कार्यालयात भेटा नाही तर तिकडच्या कार्यालयात जाऊन भेटा अशा प्रकारचे दमछाक करून नाहक ञास देण्याचा प्रयत्न झाला. तसेच सद्यस्थितीत पेटी वाटप चालू आहे. मात्र या संदर्भातही मागील दीड महिन्यापासून अधिका-यांना व संबंधित गुत्तेदाराला याबाबत माहिती विचारण्यात येत आहे, माञ कसलीच दखल घेतली जात नाही. आपल्या ओळखीच्या दलालांमार्फत माञ पेटी वाटप करण्यात येत आहे. अशा अनेक योजनांचा लाभ वडार समाजातील बांधकाम कामगारांना मिळत नसल्याने हजारो बांधकाम कामगार हवालदिल झाले आहेत. या गंभीर समस्यांकडे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मुद्दे यांनी लक्ष वेधले आहे.
वडार जमातीचा मुख्य व्यवसाय दगड, मातीशी संबंधित असल्यामुळे पिढ्यानपिढ्यांपासून वडार समाज बांधकाम कामगार म्हणून काम करत असूनही अद्यापही बहुतांशी कामगारांची नोंदणी झालेली नाही आणि ज्यांची झाली आहे त्यापैकी ब-याच कामगारांची नोंदणी होऊन आणि कामगार पासबुक मिळूनही जाचक अटींमुळे ञुटी काढून लाभापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे बरेच कामगार नोंदणीच्या संदर्भात निराश होऊन याविषयी उत्सुक नाहीत. ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळे असे चित्र काही नाही. ग्रामीण भागातील बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात बरेच ग्रामसेवकांना वारंवार विनवणी करूनही सही आणि शिक्का देण्यास टाळटाळ करत आहेत यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश वडार समाजातील युवकांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकली नाही. एकूणच दलालांमार्फत नोंदणी असलेल्या कामगारानाच मदतीचा फायदा होणार असेल तर, अर्ध्यापेक्षा जास्त गरीब वडार समाजातील बांधकाम कामगार वंचित राहतील असेही यावेळी सांगितले.
पुढे जिल्हा-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगारांचे ञाचक अटींमुळे आणि नाहक ञासामुळे नोंदणींच होऊ शकली नाही या योजनेच्या संदर्भात उदासीनता वाढते आहे तसेच ज्यांच्यापर्यत या योजनेचा लाभ मिळायला हवा तेच अद्यापही बहुतांशी लाभार्थी या योजनेपासून विविध कारणांमुळे वंचित आहेत, हाच खरा प्रश्न आहे. यावर वारंवार निवेदने देऊनही कसलीच अंमलबजावणी झाली नाही म्हणून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगितले.
पुढे श्रीकांत मुद्दे म्हणाले की, मुळात वडार समाज हा अशिक्षीत त्यात या योजनांबाबत अनभिज्ञ आणि अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करूनही अधिका-यांमार्फत काही ना काही ञुटी काढून त्यांना या योजनेपासून दूर ठेवण्यात येते, त्यामुळे बांधकाम कामगार कार्यालयामार्फत मिळणारे लाभ मिळत नाहीत. हा गोरगरीब कामगारांवर अन्याय आहे, वारंवार याबाबत माहिती देऊन सुद्धा अद्यापही त्यांना कसलेच लाभ मिळत नाही. तसेच अधिका-यांकडून योग्य अशी माहिती मिळत नाही, मुळात ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही, ज्या उद्देशाने या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे तो उद्देश पूर्णत्वास जाताना दिसत नाही, म्हणून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन श्रीकांत मुद्दे यांच्या नेतृत्वाखाली ६ जुलै रोजी कार्यालयाच्या मुख्य द्वाराशेजारी सकाळी ११ ते १२: ३०या कालावधीत होणार आहे यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित व्हावे असेही यावेळी आवाहन सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रमुख मागण्या :
१. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी २०१९ साली झाली परंतु ज्यांनी ५००० रूपयाचा फाॅर्म भरूनही ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना लाभ मिळावा.
२. ज्या बांधकाम कामगारांना अद्याप पेटी मिळाली नाही त्यांना तात्काळ पेटी वाटप करण्यात यावे.
३. विशेषतः बांधकाम कामगारांमध्ये वडार समाजाचा मोठ्या प्रमाणात समावेश असूनही अत्यंत तुटपुंजी लाभ मिळाला, अजूनही बहुतांशी कामगार लाभापासून वंचित आहेत. याची चौकशी करून त्यांची नोंदणी व्हावी अन्यथा काहीही चौकशी न करता नोंदणी रद्द करू नये.
४.बरेच कामगारांचे नाहक ञुटी काढून लाभापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवण्यात आले आहेत. त्यांनाही लाभ मिळावा...
५. अधिका-यांमार्फत बांधकाम कामगार विषयी वेळोवेळी योग्य ती माहिती मिळावी.

