एकशे दोन कसोट्या, ८०७४ धावा, २७ शतके, १०२ झेल, ४ धावबाद. २६२ वनडे १२३४४ धावा, ४३ शतके, ४ बळी, १३८ झेल, २१ धावबाद. टि-२० मध्ये ९९ सामने ३३०८ धावा, ४ बळी, ४४ झेल, ७ धावबाद. अशी कामगिरी जर एखाद्या खेळाडूची असेल तर तो एक अतिशय यशस्वी खेळाडू गणला जाईल. परंतु सध्या वरील कामगिरीच्या अगदी उलट परिस्थिती असलेला एक खेळाडू जागतिक स्तरावर संघातल्या स्थानासाठी अगदी मोताज झाला आहे आणि तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेट मध्ये खोऱ्याने धावा काढणारा, कर्णधार म्हणून द्विपक्षीय मालिकात भारताचा सर्वात सफल कर्णधार ठरलेला चिकू उर्फ विराट कोहली हा आहे.
मराठी भाषेत एक म्हण आहे घराचा वासा फिरला की घरही फिरते. अगदी तसाच प्रकार सध्या विराट कोहलीच्या बाबत घडत आहे. एक वेळ अशी होती की तो हात लावेल त्या गोष्टीचं सोनं व्हायचं, तो म्हणेल तीच पूर्व दिशा असायची, त्याच्या म्हणण्या प्रमाणेच संघाचा कोच असायचा. त्याला पसंत नसलेले खेळाडू भारतीय संघाच्या आसपासही दिसायचे नाही. परंतु आता परिस्थिती बिलकुल याच्या विपरीत झाली आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे घडत नाही. एक एक करून तिनही प्रारूपातील भारतीय संघाचे कर्णधार पदं गेले. शतकांचा बादशहा असलेल्या कोहलीला २३ नोव्हेंबर २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय शतकही ठोकता आले नाही. त्यानंतर थोड्या फार ज्या धावा त्याच्या बॅटमधून निघायच्या त्याही आता त्याच्यावर रुसल्या आहेत. त्याची बॅट चालायची तेंव्हा जगभरातील नामांकित गोलंदाज त्याच्या नावानेच थरथर कापायचे. पण आता त्याला नेटमध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील आंतरराष्ट्रीय संघात दाखल होऊन त्याला बाद करू लागलेत. अगदी फडतूस गोलंदाजही त्याला बाद करून मोठा जल्लोष करतानाचे नको असलेले प्रसंग बघायला मिळतात.
पूर्वी मोठया रूबाबात प्रेक्षकांच्या जल्लोषात मैदानात यायचा व शतक ठोकून परतताना समस्त स्डेडियमच उभे राहून त्याला मानवंदना द्यायचे. हे दृश्य त्याच्या सुगीच्या दिवसात नित्याचेच होते. परंतु आता तो मैदानात भले जल्लोषात येतो. परंतु कधी पहिल्याच चेंडूवर बाद होतो, तरी कधी चांगली सुरुवात करतो तेंव्हा वाटतं आज तो नक्की शतक ठोकणार ? नेमका त्याच वेळी बाद होतो. बऱ्याचदा त्याचे आल्या पावलीच परतणे आता नित्याचेच झाले आहे. आता त्याला बाद व्हायला काही अफलातून चेंडूची गरज लागत नाही. कोणताही फालतू चेंडू देखील त्याला बाद व्हायला पुरेसा ठरतो. तो बाद होऊन परताना बॅट काखेत घालतो, मान खाली घालून निराश मनाने स्वत:शीच पुटपुटत जातो. तेव्हा संबंध स्टेडियममध्ये स्मशान शांतता असते. हे चित्र बघून त्याचे प्रशसंक दु:खी होत असतीलच परंतु त्याचे टिकाकारही नक्कीच नाराज झालेले असतात.
काळ कुणासाठीच थांबत नाही. तसा तो कोहलीसाठीही थांबणार नाही. एके काळी प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत असलेला कोहली सतत अपयशी ठरत असल्याने अनेकांना नकोसा झाला आहे. ज्यांची जराशीही लायकी नाही असे स्वयंघोषित विद्वान त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी करताना आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कधी काळी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारेही आज बिनधास्त त्याच्यावर टिका करत आहेत.
टिव्ही चॅनेल्स, युट्यूब चॅनेल्स, वृत्तपत्रे, सोशल मिडियाला त्यांचा टिआरपी वाढविण्याचे जणू आयते खाद्यच मिळाले आहे. सन २०२१ विश्चषकानंतर त्याच्या सोनेरी कारकिर्दीला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. सुरुवातीला त्या महत्वाच्या स्पर्धेपूर्वीच त्याने टि२०चे नेतृत्व सोडण्याची घोषणा करून वादाला आग लावली. त्यानंतर बीसीसीआयने त्याला वनडे नेतृत्वावरून हलविले. त्यामुळे तो जास्तच दुखावला. परंतु बीसीसीआयच्या धोरणानुसार सफेद चेंडूच्या खेळात एकच कर्णधार असणार होता. परंतु कोहलीला वनडेचे नेतृत्व सोडायचे नव्हते. त्यानंतरच कोहलीच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
एकंदर नेतृत्वात त्याची आकडेवारी सरस असली तरी आयसीसी स्पर्धात त्याला मिळणारे अपयश यामुळे त्याला बीसीसीआयच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाय वनडे नेतृत्व काढून घेण्यावरून त्याने दस्तुरखुद्द बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात ओढल्याने वातावरण चिकदळले. त्यानंतर तो द. आफ्रिका दौऱ्यावर गेला. परंतु कसोटी मालिका आघाडीवरून हरला. त्याचा परिपाक त्यानेच स्वतःहून नेतृत्व त्यागण्यात झाला.
या अचानक घडलेल्या घटनांनंतर तो पूर्णपणे बावरला. एकेकाळी संपूर्ण भारतीय क्रिकेटवर राज्य करणारा हा राजा अचनाक रंक बनला. त्याच्या अस्तित्वालाच धक्का बसल्याने त्याची मनस्थिती विचलीत झाली. या गोष्टीचा मोठा फटका त्याच्या फलंदाजीवर झाला. आधीच शतकांचा दुष्काळ पडलेला असताना धावांचा ओघही एकाएकी आटला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीतील तंत्रातच दोष असल्याचे काही तज्ञांचे मत बनले. काहींनी त्याला क्रिकेट मधून ब्रेक घ्यायचे सल्ले दिले. त्यानंतर त्यानेही मागील काही दौऱ्यांसाठी बीसीसीआयकडे आरामाची मागणी करताच त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता ती मान्य केली. परंतु कोहली येथे गोष्ट साफ विसरला की, ज्या मैदानात धावा ठोकून तो नावारूपाला आला. आता त्याच धावा त्याच्यावर रुसल्या असताना त्याने ब्रेक अथवा आराम न घेता पुन्हा मैदानात खेळूनच धावा काढाव्या लागतात.
त्याच्या या आरामाच्या काळात संघाचे दौरे सुरूच असून त्याच्या ऐवजी काही नवोदित खेळाडूंना संधी मिळाली तिचे त्यांनी सोने केले. त्यामुळे त्यांचा आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी दावा मजबूत झाला आहे. शिवाय नुकताच झिंबाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून त्यामध्ये कोहलीला संधी मिळाली नसल्याने दोन महिन्यानंतर होऊ घातलेल्या टि२० विश्वचषक स्पर्धेत त्याला टिम इंडियात संधी मिळण्याबद्दल शंका घेऊ लागली आहे. वास्तविक कमकुवत झिंबाब्वे विरुद्ध धावा काढून गेलेला फॉर्म व आत्मविश्वास परत मिळविण्याची कोहलीला संधी होती. मात्र ती त्याला मिळाली नाही का त्याने ती डावलली ?हा प्रश्न गुलदस्त्यातच राहीला आहे. आगामी आशिया चषकामध्ये त्याची संघात परतण्याची शक्यता आहे. मात्र तेथे जर त्याला अपयश आले तर तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टि-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात खेळताना दिसणार नाही.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

