मागच्या वर्षी सुरू झालेली कसोटी मालिका या चालू दौऱ्यात पूर्ण झाली. मालिकेचा निकाल दोन = दोन असा लागला. प्रत्यक्षात या सत्राचा विचार केला तर भारत कसोटी सामन्यात पराभूत झाला. म्हणजे इंग्लंड भारतापेक्षा सरस ठरले हे स्पष्ट झाले. त्यानंतर झालेल्या तिन सामन्यांच्या टि ट्वेंटी मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली. म्हणजे या दोन संघात चार सामने झाले त्यात दोन्ही संघ प्रत्येकी दोन विजय व दोन पराजय असे बरोबरीत आहेत.
आता याच दोन संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मंगळवार पासून सुरू होईल यामध्ये या दौऱ्यातील सरस संघ कोण हे क्रिकेट जगताला समजेल.
टि२० चा विश्वचषक अगदी तोंडावर आला असला तरी या वनडे मालिकेचा उपयोग टिम इंडियाला सराव व तयारीच्या दृष्टीने करून घेण्यात मदत होईल.
भारताने आतापर्यत इंग्लंडविरूध्द दहा वनडे मालिका जिंकल्या असून इंग्लंडच्या धर्तीवर फक्त मालिका जिंकण्यात भारताला यश मिळाले आहे. त्यापैकी सन १९८६ मध्ये मालिका १-१ अशी बरोबरीत राहीली होती, तरीही भारताला विजेते घोषीत करण्यात आले होते. त्याच कारण म्हणजे भारत कसोटी मालिका तेंव्हा २-० असे विजयी झाले होते. सन २०१४ मध्ये भारताने इंग्लंडला इंग्लंडमध्ये ३=१ असे हरविले होते. तो भारताचा वनडेत इंग्लंड मधील शेवटचा मालिका विजय असून आठ वर्षानंतर भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत व इंग्लंड या दोन संंघात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर भारताचे पारडे वरचढ दिसते. एकूण १०३ पैकी ५५ सामने भारताने तर ४३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिलेत तर दोन सामने समान धावसंख्या झाल्यामुळे टाय झाले आहेत.
इंग्लंडच्या जमीनीवर भारत एकूण ४२ वनडे सामने खेळले असून त्यात १६ विजय मिळाले आहेत. तर २२ सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. तीन सामने अनिर्णित राहीले तर एक सामना टाय झाला.
सन २०१५ च्या वनडे विश्वचषकातील दारूण पराभवानंतर इंग्लंडने खास करून सफेद चेंडूच्या खेळात अमूलाग्र बदल केले. त्याचे फळ त्यांना सन २०१९ च्या विश्वचषक विजेतेपदाच्या रुपाने मिळाले. अगदी त्याच धर्तीवर भारतही आपल्या खेळात बदल करत असून विशेष करून फलंदाजांमध्ये आक्रमक मानसिकता जोपासण्याचे काम सुरू आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या टि२० मालिकेत आपण बघितलेच आहे. टि२० इतकी प्रखर आक्रमकता वनडेत दिसणार नाही, परंतु सकारात्मक खेळ भारतीय संघ नक्कीच करताना दिसेल.
केवळ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर धवनसाठी हि मालिका महत्वाची ठरणार असून मागील काही दिवसात त्याला भारताकडून खेळण्याची मर्यादित संधी मिळाली असली तरी त्याचा अनुभव मोठा असून सन २०२३ च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने त्याला मुख्य प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न म्हणून इंग्लंडविरूध्दच्या या मालिकेनंतर वेस्ट इंडिज विरूध्द होणाऱ्या तीन वनडे सामन्यात त्याच्याकडे भारताचं नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचाही आत्मविश्वास वाढेल व खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोनही सकारात्मक राहील.
या मालिकेत सर्वात जास्त लक्ष जर कोणाच्या कामगिरी असेल तर ते विराट कोहलीच्या. मागील तीन वर्षांपासून शतक त्याच्यावर रुसले आहे. तर सध्या धावांचा ओघही आटल्याचे दिसत असून आजमितीला कोहली त्याच्या संघातील स्थानासाठी अक्षरशः अस्तित्वाची लढाई लढाई लढत आहे. सध्या त्याच्या ग्रोईन इंज्युरीसंदर्भात माहिती प्रकाशात आल्याने त्याचे या मालिकेत खेळणे काहीसे संदिग्ध झाले आहे.
त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माची कामगिरी कशी होते हे देखील बघावे लागेल. कारण मागील काही दिवसांपासून त्याच्याही धावा होत नाहीत. तर श्रेयस अय्यरचे आखूड टप्प्याच्या चेंडूवर अडखळणे भारत व श्रेयस यांच्यासाठी अडचणीचे ठरत असल्याने त्याची कामगिरी कशी होते यावरही बरंच काही अवलंबून असेल. त्याचबरोबर सध्या फॉर्मात असलेल्या दिपक हुड्डा व टि२० मध्ये पदार्पणाच्या सामन्यात प्रभावी ठरलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंग यांना किती संधी मिळते या कडेही सर्वांच्या नजरा असतीलच.
कसोटी मालिकेत सरस कामगिरी केलेले व टिट्वेंटी मालिकेत न खेळलेले जॉनी बॅरिअस्टो, ज्यो रूट, बेन स्टोक्स हे प्रमुख खेळाडू इंग्लंड संघात परतल्याने त्यांची बाजू आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे मालिका अतिशय चुरशीची व रंगतदार होईल व प्रेक्षकांना शानदार खेळ बघता येईल. तर चला, घोडा मैदान जवळच आहे काय होते ते स्वतःच बघूया.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com.

