shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडियाच्या मागे लागली "सात" ची साडेसाती ; खलनायक ठरतेय राहुल द्रविडची रणनिती !



          कोणताही खेळ म्हंटलं की त्यामध्ये हार-जित असतेच. तसं बघाल तर एकाच संघाने कायम जिंकलंच पाहिजे असंही नाही. तर दुसरा संघ सतत हरावा असेही नाही. प्रेक्षकांना खेळात जोरदार संघर्ष झाला तर त्याचा मोठा आनंद मिळतो. परंतु जर एखादा संघ सुरूवातीला खेळावर वर्चस्व राखतो व निर्णायक क्षणी आपले हत्यारं सफसेल खाली ठेवतो आणि त्यांच्या पराभवाचे कारण व अंतर प्रत्येक वेळी तेच असते तेंव्हा त्यामागचे कारणं शोधण्याची वेळ येते.

          नेमका हाच दुर्वेवी प्रकार क्रिकेट विश्वतील एक मातब्बर संघ भारताच्या पुरुष संघाच्या बाबत घडत आहे आणि तेही नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात ! राहुल द्रविडने एक खेळाडू, कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले असल्याने त्याच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे (एनसीए) प्रमुख केले. तेथे त्याची कामगिरी अतिशय नेत्रदिपक ठरली. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहीत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास मजबूत व सक्षम बनविले. हे बघून त्याचा टिम इंडियातील सहकारी व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याची थेट टिम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करून टाकली. परंतु द्रविडला मागील आठ महिन्यात आठ कर्णधारांसह काम करावे लागल्याने त्याला पाहिजे तो सूर सापडला नाही. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ज्या उंचीवर संघाला नेऊन ठेवले त्याच्या आसपासही द्रविड अद्याप तरी संघाला घेऊन जाऊ शकला नाही. शास्त्रीने टिम इंडियाला परदेशात जिंकण्याची जी सवय लावली होती ती द्रविडच्या कार्यकाळात खंडीत झाली असून त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशांना सुरूंग लागण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे द्रविड जवळ त्याच्या पसंतीची सहाय्यक प्रशिक्षकांची फौज असूनही त्याला संघाला विजयी करण्यात अपयश येत आहे.
         सन २०२१ च्या टि२० विश्वचषकानंतर कानपूरला न्यूझिलंड विरूध्द झालेल्या कसोटीत पुरेसा वेळ मिळूनही भारतीय गोलंदाज न्यूझिलंडचा शेवटचा फलंदाज बाद करू न शकल्याने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला होता. यामध्ये द्रविडच्या रणनितीचाही मोठा हिस्सा होता. परंतु हि द्रविडची प्रशिक्षक म्हणून पहिलीच कसोटी असल्याने त्याचा मोठा डांगोरा पिटला गेला नव्हता. मात्र यामुळे टिम इंडियाला विजयाचे हक्काचे गुण गमावण्याची वेळ आली व विनींग पर्सेंसेंटेज मध्येही घसरण झाली.              
            खास करून सन २०२२ या वर्षात टिम इंडियाचा परदेशात कसोटीत पराभवाचा आलेख अगदी रसातळाला गेला असून या दरम्यान द्रविडच्या कार्यकाळात विदेशात झालेल्या तीनही कसोटयात भारत सारख्याच फरकाने हरले असून तिनही वेळा धावांचा बचाव करताना व विशेष म्हणजे संघात जगातला सर्वोत्तम गोलंदाजांचा फौजफाटा असताना. राहुल द्रविड इतर प्रशिक्षकांप्रमाणे परिस्थितीनुसार काय रणनिती वापरायची या बाबत खास संदेश राखीव खेळाडूंमार्फत कर्णधारास पाठविताना दिसत नाही. एकदा ठरविलेल्या प्लॅनवरच त्याचा जोर असल्याने संघाच्या पराभवांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अननुभवी कर्णधारही कमी पडत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माचे आजारपणही याला जबाबदार आहे. कारण रोहितने याच द्रविडच्या कार्यकाळात संघाचे नेतृत्व करताना तेरापैकी सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे सर्व दोष द्रविडलाच देऊन चालणार नाही. यामध्ये सतत कर्णधार बदलण्याच्या बीसीसीआयच्या चुकीच्या धोरणांचाही भाग आहे.
         सन २०२२ या वर्षात भारताने परदेशात तीन कसोटी सामने खेळले असून तीनही सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे तिनही सामने विरोधी संघाने लक्षाचा पाठलाग करताना जिंकले असून भारताच्या पराभवाचे अंतर प्रत्येक वेळी "सात गडी" इतकेच होते. यात आणखी एक लक्ष वेधक बाब म्हणजे भारताने वनडे व टि-२० मिळून आठ सामने परदेशात खेळले आहेत, त्यातील पाच सामने भारताने "सात गड्यांच्या" फरकानेच गमावले असल्याने टिम इंडियाच्या मागे "सात" ची साडेसाती लागल्याची भावनीक शंका घेण्यात येऊ लागली आहे.
         तीन जानेवारी २०२२ रोजी जोहान्सबर्ग येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटीत भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिका २२९ धावात बाद झाले. मग भारताने दुसऱ्या डावात २६६ धावा बनविल्या. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीचा इतिहास बघता २४० धावांचे लक्षही कधी कोणत्याच संघाला साध्य झाले नव्हते. परंतु येथेही विश्वविख्यात भारतीय गोलंदाज कमी पडले व आफ्रिकेने सात गडी राखून आरामात विजय मिळविला.
         त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील शेवटचा सामना ११ जानेवारीला सुरू झाला. तेथेही प्रथम फलंदाजी करताना भारत २२३ धावाच करू शकले. मात्र भारताने आफ्रिकेला २१० धावातच गुंडाळल्याने १३ धावांचा पुढावा संघाला मिळाला. परंतु दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज ढेपाळले व केवळ १९८ धावाच करू शकले. विजयाचे २१२ धावांचे लक्ष आफ्रिकेने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ करीत सात गडी राखून साध्य केले.
           एक जुलै रोजी सुरू झालेल्या इंग्लंडविरूध्दचा सामनाही गत इतिहासाला उजाळा देणाराच ठरला. परत एकदा भारताच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली. सुरुवातीच्या पडझडीनंतर भारताने ४१६ अशी सन्मानजनक धावसंख्या उभी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला २८४ धावात गुंडाळून १३२ धावांची आघाडी मिळविली. मात्र नेहमी प्रमाणे दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज पचकले आणि २४५ धावाच करू शकले. तरीही ३७८ धावांचे अवघड लक्ष इंग्लंड समोर ठेवले. यापूर्वी एवढया मोठया धावसंख्येचा पाठलाग चौथ्या डावात निव्वळ एजबॅस्टनलाच नाही तर संपूर्ण इंग्लंडमध्ये कोणताच संघ करू शकला नव्हता. परंतु भारताच्या गोलंदाजांनी येथेही खिरापत वाटल्यागत धावा इंग्लंडला बहाल केल्या व एक लाजिरवाणा पराभव पत्करला. विशेष म्हणजे येथेही पराभवाचे अंतर होते "सात गडी "
          टिम इंडिया यावर्षी परदेशात एकाच प्रकारे हारत असून सुरूवातीला भारत सामन्यावर वर्चस्व राखतो व शेवटच्या डावात गोलंदाज प्रभावहिन ठरल्याने पराभव पत्करावा लागतो. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री प्रमाणे परदेशात भारताला जिंकायचे असेल तर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडला आपल्या धोरणात बदल करावा लागेल. हि मात्र काळ्या दगडावरची रेष आहे.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close