क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखलं जातं. क्रिकेटच्या याच अदभूत किमयेमुळे क्रिकेटने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. क्रिकेटचा विचार केला तर मैदान सारखेच, कधी कधी तेच, खेळाडूही तेच, नियमही तेच परंतु दिवस बदलला की खेळातील आकडेवारी, निकाल सर्व काही बदलून जाते. या दरम्यान खेळाडूंना आपला खराब खेळ दुरुस्त करण्यास वावही मिळतो तर चांगलं खेळणाऱ्यात आणखी वृध्दी करण्यास उत्साह संचारतो. मात्र सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंच्या खेळात या पैकी काहीच दिसत नाही.
झालेल्या चुकांतून ते शिकताना दिसत नाहीत तर चांगल्या खेळाचा टेंपो ते पुढच्या सामन्यात टिकविताना दिसत नाही. याचाच अर्थ त्यांच्या खेळात सातत्य नाही. आता काही दिवसांवर टि-२० वर्ल्ड कप आला आहे, सन २०२३ मध्ये भारतात वनडेचा विश्वकप होणार आहे, तर सध्या कसोटीचा विश्वचषक सुरू आहे. या सर्वांचा विचार केला तर वनडे व टि- ट्वेंटी मध्ये अजून संघच तयार नाही. कधी एकाला संधी द्यायची, कधी चांगलं खेळून त्याला डावलायचं, मोठं नाव म्हणून भलत्यालाच खेळवायचं. हा प्रकार सध्या सुरू असल्याने ना खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो ना संघाची कामगिरी सातत्य पूर्ण होत आहे.
क्रिकेट, भूतकाळात कोणी काय चांगली कामगिरी केली, कोणते विश्व पराक्रम केले किंवा भविष्यात कोण काय करणार ? यावर खेळले जात नाही. तर क्रिकेट संबंधित खेळाडूच्या वर्तमान फॉर्मवर अवलंबून असतो. त्या खेळाडूने मागील काळखंडात काय कामगिरी केली याचा विचार न करता चालू कामगिरीच्या आधारे संघ निवडला पाहिजे. परंतु सध्या तरी भारतीय संघ निवडताना एकमेकांचे हितसंबंध जोपासण्यातच धन्यता मानले जात असल्याचेच दिसते.
इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर एकमेव कसोटीत संघ निवडताना परिस्थितीचा विचार न करता पुन्हा एकदा भारताचा आजमितीचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज रविचंद्रन आश्विनला डावलण्यात आले. त्याची गरज फलंदाजी करताना खास करून तिसऱ्या डावात व गोलंदाजी करताना चौथ्या डावात जाणवली. जडेजा फलंदाज म्हणून प्रभावी असला तरी गोलंदाज म्हणून आश्विनच्या तुलनेत तो कमी पडतो. मात्र आश्विनला न निवडल्याने संघाला चांगल्या गोलंदाजाची उणीव जाणवते.
त्याच कसोटीवर पहिले तीन दिवस वर्चस्व गाजविल्यावर पहिल्या डावात शेर ठरलेले गोलंदाज नंतर ढेर झालेले आपण बघितले आहेच. म्हणजेच गोलंदाजांच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव जाणवला.
त्यानंतर झालेल्या टि-२० मालिकेत भले भारत विजयी ठरला. परंतु त्या विजयामुळे बऱ्याचशा त्रुटी झाकल्या गेल्या. पहिल्या सामन्यात सुरेख फलंदाजी करणाऱ्या दिपक हुड्डाला सातत्याने फेल होणाऱ्या विराट कोहलीसाठी दळणातल्या खडयासारखे बाजूला केले. तर भारतकडे डावखुऱ्या व धारदार वेगवान गोलंदाजाची वाणवा असताना पदार्पणातच इंग्लिश फलंदाजांना सतावलेल्या अर्शदिप सिंगला नंतरच्या दोन टिट्वेंटी व दोन वनडेत संघात निवडलेच नाही. मग सांगा अशा गुणवान खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल का कमी होईल ?
नंतरच्या दोन टि२० मध्ये कोहलीला संधी दिली. तेथेही त्याची बॅट निस्तेज ठरली. शेवटच्या टि२०त संघात बदल करायचे म्हणून केले. त्यामुळे संघाचे संतुलन बिलकुल साधले नाही. संघात निवडलेले सर्वच गोलंदाज नवखे होते त्याचा फायदा इंग्लंडने उचलून २१५ धावा कुटल्या. त्यावेळी सध्या फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणाऱ्या हुड्डा व हार्दीकला संधी देणे गरजेचे होते. त्यांची उणीव गोलंदाजीत जाणवलीच पण फलंदाजीत सारेच फलंदाज फेल गेल्यावर त्यांची गरज समजली. नशिब समजा सुर्यकुमार यादवने ११७ धावांची वादळी खेळी करून विजयाच्या आशा जागविल्या, मात्र त्याला इतर फलंदाजांनी काडीचेही सहकार्य न केल्याने हातातोंडातला विजय निसटला.
टि-२० मालिकेनंतर तिन सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली. तेंव्हा कागदोपत्री इंग्लिश संघ अतिशय ताकदवान वाटत होता. तेंव्हा वाटले होते की ते कमीत कमी पहिल्या सामन्यात टिम इंडियाचं भरीत करेल. परंतु झालं उलटंच भारताच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजी अक्षरशः ठेचून काढून केवळ ११० धावांतच खुर्दा उडविला. त्या डावात बुमराहाने आपली सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली. तर मोहम्मद शमी व प्रसिध्द कृष्णाने धारदार मारा केला. तेंव्हा भारताची ही गोलंदाजी जगातली सर्वोत्तम गोलंदाजी आहे असे वाटू लागले. हे कमी की काय ? म्हणून भारताचे सलामीवीर कर्णधार रोहीत शर्मा ७६ व शिखर धवन ३१ यांनी नाबाद राहात ११४ धावांची सलामी देत दहा गडी राखून संघाला विजयी केले तेंव्हा वाटले की टिम इंडिया आता जगातला सर्वोत्तम संघ बनला आहे.
मात्र त्यानंतर एक दिवसातच सर्वांच्या भ्रमाचा भोपळा फुटला भारताचे तारे - सितारे जमिनीवर कोसळलेच नाही तर अक्षरशः आळदले. इंग्लिश फलंदाजांनी सावध सुरुवात केली खरी परंतु त्यांचे गडी ठराविक अंतराने बाद होत गेले, त्यावेळी पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती होते का काय असे वाटले असताना तळाच्या फाळीतील डेव्हीड विली व मोईन अली यांनी मोलाची भागीदारी करत इंग्लंडला सन्मानजनक स्थितीत आणले.
विली व अलीच्या फलंदाजी नंतर रिसे टॉपली भारताचा कर्दनकाळ ठरला. पहिल्या सामन्यात जागतिक दर्जाचे फलंदाज असलेले रोहीत व धवन गल्लीत खेळल्यासारखे बाद झाले. तर रिषभ पंतला अजून सफेद चेंडूच्या खेळात स्वतःला सिद्धच करता आले नाही. शुन्यावरच तो फुलटॉसचा बळी ठरला. विराट कोहलीचा खेळ दिवसेंदिवस रसातळाला जात असल्याचे दिसत असून त्याचे सगळे कमकुवत दुवे विरोधी संघाने अभ्यासले असून त्याला शिकारी जाळ्यात ओढून आरामात बाद केले जात आहे.
कर्णधार रोहितच्या खेळातही सातत्य नसल्याने फलंदाजीत संघांची कुचंबणा होत आहे. ४ बाद ३१ अशी स्थिती असतान हार्दिक २९, जडेजा २९, सुर्यकुमार २७ व शमी २३ यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि ५० षटकात केवळ २४७ धावांचा पाठलाग करताना भारत १४६ धावांत गारद झाले व शंभर धावांचा नामुष्कीजन्य पराभव पदरी पडला.
या पराभवांतून एक गोष्ट सिद्ध होते की, मुळात संघच परिस्थिती व फॉर्मनुसार खेळाडू निवडला जात नाही. निवडलेले खेळाडू संघाची गरज ओळखून खेळत नाहीत. कोणत्याही खेळाडूच्या खेळात सातत्य नाही. एक दिवस आकाशात तर दुसऱ्या दिवशी जमिनीवर हा प्रकार सध्या सुरू आहे. तो थांबविणे गरजेचे अन्यथा विश्वकप जिंकणे सोडा या मालिकेतला तिसरा व निर्णायक सामना जिंकणेही अवघड जाईल. त्यासाठी प्रत्येकाने संघहित समोर ठेवून खेळणेच अति गरजेचे आहे.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

