shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंगीचे औषध देऊन पळविलेल्या अंगठ्या केज पोलीसांनी दिल्या फिर्यादीच्या ताब्यात!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-

केज येथून एका ६६ वर्ष वयाच्या वृद्धाला थंड पेय आणि केळीतून गुंगी येणारे औषध खायला व प्यायला देऊन त्याच्या हाताच्या बोटातील ६० हजाराच्या रु. किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात इसमाने लांबविल्या होत्या. त्या प्रकरणी केज पोलिसांनी तपास करून मा. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीला परत देण्यात आल्या.



या घटनेची माहिती अशी की, दि. ५ एप्रिल मंगळवार रोजी केज तालुक्यातील धर्मराज थोरात हे कानडी रोड लगतच्या विजय भन्साळी यांच्या विजय कृषी सेवा केंद्राच्या समोर थांबले असता सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० चा. च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीच्या मुलीची सोयरीक जुळवायची आहे; अशी बतावणी केली. पाहुणे येई पर्यंत चहापाणी पिण्याचा बहाना केला होता. थोरात याना तो अनोळखी व्यक्तीने  स्प्राईट या थंड पेयाच्या बाटलीत गुंगी येणारे औषध मिसळून ते प्यायला दिले. तसेच त्यांनी केळी मध्ये पण गुंगी येणारे औषध खायला दिले. नंतर ते दोघे कानडी रोड वरुन क्रांती नगर जवळच्या केजडी नदी मधुन पाटलाचे शेतात गेले. तेथे गेल्या नंतर धर्मराज थोरात यांना गुंगी येताच त्याचा गैरफायदा घेऊन त्या अनोळखी ठगाने धर्मराज थोरात यांच्या उजव्या हाताच्या बोटातील प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या जुन्या दोन अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला होता.  

दि. १ मे रोजी एका गुप्त खबऱ्याने नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना एका संशयित इसमाची माहिती दिली. त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव आणि तपासी अधिकारी राम यादव यांनी राजेंद्र बिरू लांडगे आणि त्याचा भाचा अमोल गोविंद सोनटक्के ताब्यात घेतले होते. 

दि. ७ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस अंमलदार राम यादव आणि पोलीस नाईक अमोल गायकवाड आणि रामदास तांदळे यांनी अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहिती आधारे अधिक तपास करून औसा येथील एका रोहिणी अलंकार मध्ये त्यांनी अंगठ्या विकल्या असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस अंमलदार राम यादव आणि पोलीस नाईक अमोल गायकवाड, तांदळे यांनी औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्या मदतीने सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

दरम्यान मा. न्यायालयाच्या आदेशाने दि. १६ जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी फिर्यादी धर्मराज थोरात यांना केज पोलीस ठाण्यात बोलावून पंचा समक्ष दोन्ही अंगठ्या त्यांना परत दिल्या. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, तपासी अंमलदार राम यादव, रामदास तांदळे, शेख मतीन आणि पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते.

close