प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
करमाळा : १६ / नगर परिषद निवडणूक स्थगित झाल्याने शहरातील सर्वच राजकीय गटांचे मनसुबे उधळले गेले असुन हा निर्णय झाल्याने राजकीय गटांत "कही खुशी कही गम" असे चित्र पहावयास मिळाले आहे मात्र या अनपेक्षित निर्णयाने कमालीचा सन्नाटा राजकीय गटांत निर्माण झाल्याचे दिसत आहे.
नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांसह राजकीय गटात लगीनघाईचे चित्र निर्माण झाले होते, तर कुठे राजकीय खलबते तर कुठे राजकीय युत्यांचे साटेलोटे ची बोलणी सुरू होती. अशी संपुर्ण तयारी सुरू असतानाच गाडी चढाला लागावी आणि 'अॅक्सीलेटर' खराब व्हावा तशी इच्छुकांची व पुढाऱ्यांची परिस्थिती झाली म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
करमाळा नगर परिषदेवर गेली २० वर्षापासून जयवंतराव जगताप गटाची सत्ता असुन जनतेतून त्यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते ,मात्र यावेळी नगराध्यक्षपदाची नगरसेवकांतून निवड होणार असल्याने अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व्यूव्हरचना आखली होती, मात्र नगराध्यक्षपद हे पुन्हा जनतेतून निवडले जाणार असल्याचा निर्णय करमाळा शहरात येवून धडकताच सर्वांचीच व्युव्हरचना फेल ठरल्यासारखी परिस्थीती दिसून आली, शहरातील जगताप गट, बागल गट,सावंत गट, नागरिक संघटना, भाजप, शिवसेना असे गट नगर परिषद निवडणूक करिता रिंगणात उतरतात. यापैकी नागरिक संघटना, बागल गट आणि सावंत गट यांच्यात युती करून निवडणुक होईल अशी चर्चा मतदारात होती तर जगताप गट आणि भाजप अशी युती होईल अशीही मतदारांत चर्चा होती, मात्र नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्याच्या निर्णयाने कोणाची युती कोणाबरोबर होईल हे अद्याप जरी स्पष्ट नसले तरी या निवडणुकीत युत्यांचे साटेलोटे होणारच हे आजपर्यंताचा इतिहास आहे.
करमाळा शहरात जगताप गटाला आजपर्यंत मतदारांनी मोठी साथ दिल्याने त्यांनी गेली २० वर्षांपासून करमाळा नगर परिषदेवर आपली पकड मजबूत ठेवली आहे पण त्यांच्या विरोधकांनी त्यांना 'दे धक्का 'करणसाठी सर्व विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरू केल्याच्या चर्चाही होत आहेत. विरोधकांची अशी कसरत सुरू असतानाच जनतेतून नगराध्यक्षपद निवडण्याचा निर्णय येवून थडकला आणि विरोधकांची सर्वच व्युव्हरचना आता फेल जाईल अशीही मत-मतांतरे जाणकारांतून व्यक्त होत आहेत.

