शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२२
वाढवलेले पालिका प्रभाग, झेडपीचे गट रद्द होणार
पंचायत समितींच्या वाढीव गणाबाबतही शिंदे सरकारचा निर्णय || निवडणुका लांबणीवर पडणार
वाढवलेले पालिका प्रभाग, झेडपीचे गट रद्द होणार..!!
अहमदनगर : निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाली, आता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचीच प्रतीक्षा होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने 2017 च्या वॉर्ड रचनेप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय काल बैठकीत घेतल्याने अहमदनगर झेडपी आणि सर्व पंचायत समित्या तसेच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड या 9 नगर परिषदा तर नेवाशाच्या नगर पंचायतीच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलणार आहे. प्रभाग रचनेपासून ते मतदार यादी तयार करणे, आरक्षणाची सोडत घेणे त्यासाठी हरकती सूचना घेणे यासाठी निवडणुकीची तयारी पुन्हा शुन्यातून करावी लागणार आहे. या प्रक्रियेसाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमक्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
अहमदनगर झेडपी, सर्व पंचायत समित्या तसेच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड या 9 नगर परिषदा तर नेवाशाच्या नगर पंचायतीच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणूक वेळेत न होऊ शकल्याने सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. ही प्रशासकांची मुदत 15 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार त्यापूर्वी झेडपी, पालिका निवडणूक होऊन नवे नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणाचा निकाल देताना ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची प्रक्रिया जेथे थांबली आहे, तेथून पुढे प्रक्रिया सुरू करा, दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे सांगितले होते. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील असा अंदाज वर्तविला जात होता. पण कालच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा निवडणूका कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने 2017 प्रमाणे प्रभाग रचना असेल असे जाहीर केले तरी. याची अधिसूचना निघाल्यानंतर त्याबाबत निवडणुका आयोगाकडून पुन्हा प्रक्रिया राबविण्याचे आदेश महापालिकांना दिले जातील. कायद्यानुसार पुन्हा प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, त्यावर हरकती सूचना मागवून सुनावणी घेणे, सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवणे त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. तसेच त्याचसोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला यांचे आरक्षण काढले जाईल.
नगर जिल्ह्यात पूर्वी 73 गट होते. तर गण 146 होते. पण मविकास आघाडी सत्तेत असताना या सरकारने गट आणि गण वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक झेडपींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे या सरकारच्या निर्णयानुसार झेडपी गट आणि पंचायत समित्यांची गणसंख्या वाढविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार प्रभाग आराखडा तयार करण्यात आला. आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. या नव्या रचनेनुसार गट संख्येत 12 ने वाढ होत 85 गट झाले तर 24 ने वाढ होत 170 गण झाले. संगमनेरात 10 गट तर 20 गण झाले. अकोले, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि पारनेरात प्रत्येकी 6 गट, 12 गण झाले. श्रीरामपूर, शेवगाव-5 गट 10 गण, नेवासा 8 गट, 16 गण, शेवगाव, पाथर्डी आणि कर्जतमध्ये प्रत्येकी 5 गट तर 10 गणांची संख्या झाली. श्रीगोंद्यात 7 गट, 14 गण तर नगरमध्ये 7 गट आणि 14 गणसंख्या झाली. यावर आरक्षण सोडतही जाहीर झाली. अनेक ठिकाणी मातब्बरांना झटका बसला. काही ठिकाणी महिलाराज येणार होते. पुढे हरकतींची मुदत असल्याने हरकतींचा पाऊस पडला. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडेही गेले. पण काल हे वाढीव गट, गण रद्दचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहे. आता ते वाढवलेले नवीन वॉर्डही रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ही प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

