श्रीरामपूर (शौकत भाई शेख) : भंडारदरा व निळवंडे ही दोन्हीही धरणे भरली आहेत. तसेच धरणातून ओव्हरफ्लोचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. लाभक्षेञात माञ पावसाने ओढ दिल्याने कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर, सोयाबीन आदी खरीपाची पिके करपू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांव्दारे चाऱ्यांना सोडून खरीप पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी केली आहे.
यासंदर्भातील प्रसिध्दी पञकात श्री.धुमाळ यांनी म्हटले आहे की, यंदा धरणांच्या पाणलोट क्षेञात समाधानकारक पाऊस झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरण भरुन ओव्हरफ्लो झाली आहेत. जायकवाडी धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.असे असताना नदीपाञात पाणी सोडण्याचे काहीही प्रयोजन नाही.
धरणे भरली असली तरी लाभक्षेञात समाधानकारक पाऊस नाही. सध्या खरीपाच्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने सोयाबीनसह अन्य खरीप पिके करपण्याची शक्यता आहे, हे ध्यानात घेवून या पिकांना जीवदान देण्यासाठी ओव्हरफ्लोच्या पाण्यावर खरीपाचे आवर्तन त्वरीत घेण्यात यावे, अशी मागणी श्री.धुमाळ यांनी केली आहे.

