ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजचे उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ७ ऑगस्ट रोजी कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण महादेव आसबे, जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा प्रा. जयश्री गटकुळ यांच्या हस्ते अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.
कामधेनू संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणाचे महत्व सांगताना म्हंटले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सात मुलींच्या उपस्थितीत मुलींची पहिली शाळा सुरू केली.आज सर्व ग्रामीण भागात महिला शिक्षित होऊन सबल - सक्षम होऊन स्वाभिमानाने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत, सागर जाधव सारखा एक होतकरू तरुण जिद्दीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे तो खऱ्या अर्थाने राष्ट्राचे - देशाचे काम करीत आहे असे मत डॉ. लक्ष्मण आसबे यांनी व्यक्त केले.
शिक्षण हे जगातील सर्वश्रेष्ठ सामर्थ्यशाली भांडवल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी युवापिढी यांनी कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाने करिअर क्षेत्रात पाऊल टाकले तर नक्की आजचा तरुण पुढील पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल असे मत जिजाऊ इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा प्रा. डॉ.जयश्री भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले.
अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक सागर जाधव यांनी दहावी आणि बारावीनंतरच्या मुला मुलींनी व्यवसायिक शिक्षणअंतर्गत युवकांना रोजगार संधी असुन विद्यार्थांनी करिअर क्षेत्रात पाऊल टाकावे असे युवापिढीला आवाहन करून प्रमुख पाहुणे, मान्यवरांचे स्वागत केले.
उद्घाटन समारंभाप्रसंगी जिजाऊ इन्स्टिट्युटच्या प्राचार्या राजश्री जगताप, प्रा.सागर उंबरे , मराठा सेवा संघाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल घोगरे, तालुकाध्यक्ष महेश कोरटकर, शहराध्यक्ष राहुल गुंडेकर, प्रतिक झोळ, ॲड. सचिन चौधरी, संभाजी ब्रिगेडचे श्रीनिवास शेळके, तसेच इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिकेत वाघ उपस्थित होते.

