shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहितला कर्णधारपद चांगलंच भावलं ; मालिका विजयासह विंडीजलाही नमवलं !

      भारत आणि विंडीज यांच्यात सुरू असलेल्या मालिकेचा अंतिम पाडाव अमेरिकेतील फ्लोरीडा येथे सुरू आहे. विंडीजमध्ये ३ वनडेची मालिका शिखर धवनच्या नेतृत्वात जिंकल्यानंतर टिम इंडियाने नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातही पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर उर्वरीत दोन सामने अमेरिकेत होत आहेत. त्यातील सुरुवातीचा सामना टिम इंडियाने आरामात जिंकून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतल्याने शेवटचा सामना केेवळ औपचारीकता म्हणूनच राहीला आहे.

           रोहित शर्माने नियमित कर्णधार म्हणून संघाची धुरा स्विकारल्या पासून भारताने टि २०ची एकही मालिका अजून गमावली नाही. रोहितने जिंकलेली हि सलग आठवी टि २० मालिका होय. इतकंच नाहीतर कर्णधार म्हणून सुरूवातीच्या ३५ पैकी सर्वाधिक सामन्यात विजय मिळविण्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदच्या पराक्रमाशी रोहितने बरोबरी साधली आहे.

           पाकच्या सर्फराज नेतृत्व केलेल्या ३५ पैकी २९ सामने जिंकले असून रोहितनेही इतकेच सामने जिंकले असून विंडीजविरूध्द शेवटचा सामना जिंकला तर रोहितच्या नावे आणखी एक विक्रम नोंदला जाईल. रोहितच्या नेतृत्वात भारताने केवळ तीन सामने गमावले आहेत. त्यापैकी प्रत्येकी एक सामना इंग्लंड विरूद्ध वनडे व टि२० चा तर विंडीज विरूध्द एक टि२० सामना गमावला आहे. त्याच्या विजयाची सरासरी ८२.८५ इतकी आहे.

        फ्लोरीडा स्थित लॉडरहिल स्टेडियमवर झालेल्या चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने लागला व त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. हिच बाब काहीशी विंडीजच्या अंगलट आली. सामना जसजसा पुढे सरकत गेला तसतशी खेळपट्टी संथ होत गेली. त्यामुळे विंडीजला नंतर धावांचा पाठलाग करणे मुश्किल बनले. भारताने २० षटकात ५ बाद १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात विंडीज संघ पूर्ण वीस षटकेही खेळू शकला नाही. विंडीजचा डाव १९.१ षटकात १३२ धावात आटोपल्याने त्यांना ५९ धावांचा मोठा पराभव पत्करावा लागला. परिणामतः मालिकाही त्यांच्या हातून निसटली. संपूर्ण मालिकेत दणकूण मार खाल्लेल्या आवेश खानने धारदार मारा करत ४ षटकात १७ धावा देत विंडीजला डावाच्या सुरूवातीलाच दोन मोठे धक्के दिल्याने विंडीजचा डाव सावरलाच नाही.

परिणामत: त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला तर आवेशला सामना वीराचा ईनाम मिळाला.
           भारताच्या डावाची सुरुवात पाठदुखीतून सावरलेला कर्णधार रोहित शर्मा व सुर्यकुमार यादव यांनी तडाखेबाज केली. रोहीत ३३ व सुर्या २४ पाठोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव काहीसा संथ झाला. त्यानंतर दिपक हुड्डा २१ व रिषभ पंत ४४ यांनी डाव सावरला असे वाटत असतानाच ते तो दोघेही लागोपाठ परतले व पुन्हा एकदा भारताच्या धावगतीला ब्रेक लागले. मात्र त्यानंतर संजू सॅमसन २३ चेंडूत तीस व अक्षर पटेल आठ चेंडूत २० धावा यांच्या आतिषबाजीमुळे भारताला १९१ धावांचा भोजा गाठता आला. मात्र या दरम्यान स्पेशल केस म्हणून संघात आलेला दिनेश कार्तिक ( ६ धावा ) अपयशी ठरला. वास्तविक कार्तिकची संघासाठी विशेष गरज नाही. त्याच्यामुळे एका चांगल्या खेळाडूची जागा अडवली जाते. शिवाय ३७ वर्षीय कार्तिकच्या खेळात सातत्यही नाही व भविष्यात तो लंबी रेस का घोडाही नाही. त्यामुळे टिम मॅनेजमेंट त्याला पाठीशी का घालते हे समजण्या पलिकडचे बनले आहे.

           विंडीजला दुसऱ्या टि २० मध्ये विजय मिळवून देणारा ओबेड मकाय यावेळी खलनायक ठरला. त्याला दोन बळी मिळाले खरे परंतु त्याच्या चार षटकात तब्बल ६६ धावा निघाल्या. यामुळे त्याच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम लागला. विंडीजकडून टि२० मध्ये १७ धावात ६ बळी अशी सर्वोत्तम कामगिरी व या सामन्यात ६६ धावा अशी महागडी कामगिरी या दोन विरोधाभासी पराक्रमामुळे त्याचे नाव विक्रमांच्या पुस्तकात नोंदले गेले. विंडीजच्या डावात कर्णधार निकोलस पुरन व रोवमन पॉवेल यांच्या प्रत्येकी २४ धावांशिवाय इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.
भारताकडून अर्शदिप सिंग ३, आवेश, बिश्नोई व अक्षर पटेलने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर पूरन विचित्ररित्या धावबाद झाला.

           हर्षल पटेल हा वेगवान गोलंदाज जखमी असल्याने आगामी आशिया चषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता असून सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंग भारतीय संघात समाविष्ठ होऊ शकतो. त्याच्यामुळे भारतीय आक्रमणात वैविध्य व धार येईल.
          सुर्यकुमार यादवने या सामन्यात भले २४ धावाच काढल्या परंतु त्यामुळे तो आयसीसीच्या टि२० क्रमवारीत बाबर आझमला हटवून प्रथम क्रमाकांवर पोहोचला आहे.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
close