मागील काही दिवसांपासून श्रीलंकेतील राजकीय व आर्थिक स्थिती अस्थिर आहे. त्यामुळे विद्यमान आशिया चषकाच्या आयोजनावरही त्यांना पाणी सोडावे लागले. या सर्व घटनांचा त्यांच्या खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होणार हे उघड होते, आणि झालेही तसेच ! युएईत ऐनवेळी आयोजित केलेल्या पंधराव्या आशिया चषक स्पर्धेच्या उदघाटनाचा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात दुबईच्या शेख जायेद स्टेडियमवर संपन्न झाला.
श्रीलंका संघात धडाकेबाज फलंदाज व अष्टपैलू खेळाडूंचा तसेच निष्णात फिरकी गोलंदाजांचा भरणा होता मात्र प्रत्यक्ष सामन्यात त्यांच्या कलागुणांचा कोणताही प्रभाव मैदानात दिसला नाही. याचा परिणाम त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने मोठे होत असलेल्या अफगाणिस्तानकडून टि२० क्रिकेटमधला पहिला पराभव स्विकारावा लागला. हा पराभव इतका विषारी होता की त्यामुळे श्रीलंकेच्या चालू स्पर्धेतील अस्तित्वालाच हादरा बसला. आठ गडी व ५९ चेंडू राखून अफगाणिस्तानने विजय मिळविल्याने त्यांची धावगती उंचावली तर एका लाजिरवाण्या पराभवाने श्रीलंकेची धावगती कोलमडली. श्रीलंकेला जर या स्पर्धेतील आव्हान टिकवायचे असेल तर बांगलादेशवर मोuठा विजय मिळवावा लागेल.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात अतिशय गचाळ झाली. डावाच्या पहिल्याच षटकात फजलहक फारूकीचा याने भेदक मारा करताना
दोन गडी बाद केले तर नवीन उल हकने पुढच्या षटकात आणखी एक धक्का देत लंकेची ३ बाद पाच अशी दाणादाण उडविली. भानुका राजपक्षे (३८ धावा ) याने एक बाजू लावून धरत डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र चुकीच्या पद्धतीने धावबाद झाल्याने श्रीलंकेला मोठा हादरा बसला. त्याच्या बाद होण्याने एक वेळ श्रीलंका शंभरीही गाठणार नाही असे वाटत असताना शेवटी करुणारत्नेने ३१ धावा केल्याने कशाबशा १०५ धावा फलकावर लावल्या. मात्र वीस षटके पूर्ण खेळण्यात त्यांना अपयश आले. श्रीलंकेचे आठ फलंदाज दुहेरी धावसंख्या शकले नाहीत यावरून त्यांच्या बेजबाबदार फलंदाजीचे दर्शन झाले.
फारूकीने घातक गोलंदाजी करताना ३.४ षटकात ११ धावात ३ बळी घेत लंकेचे कंबरडेच मोडले. त्याला कर्णधार मोहम्मद नबी, मुजीब उर रहेमान यांनी प्रत्येकी दोन बळी तर नवीनने एक गडी बाद करून चांगली साथ दिली. मात्र फिरकीचा जादूगर राशिद खानची बळींची पाटी कोरीच राहिली. दहाव्या बळीसाठी करुणारत्ने व दिलशान मधुशंका यांच्या तीस धावांच्या भागीदारीने श्रीलंकेची शंभरी फलकावर लागली. त्यामुळे अफगाणिस्तान समोर थोडेफार आव्हान उभे राहिले. मात्र त्यांचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज व हजरतुल्लाह जजई यांनी पावर प्लेचा जोरदार लाभ उठवत ८३ धावा कुटल्या. शेवटी १०.१ षटकातच दोन गडी गमावून त्यांनी लक्ष साध्य केले.गुरबाजने १८ चेंडूत ४० तर जजईने २८ चेंडूत नाबाद ३७ धावा फटकावून श्रीलंकेला चारीमुंडया चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी खेळपट्टी व परिस्थितीचा कोणतेही संतुलन न साधल्याने त्यांचावर बिकट प्रसंग गुदरला. आता मात्र त्यांना चमत्कारीक खेळ करावा लागेल अन्यथा सुपर फोर पुर्वीच त्यांना गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

