श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : अशोक कारखाना व्यवस्थापनाने सन २०२१-२२ च्या गळित हंगामात १६ एप्रिल ते १३ जून २०२२ या कालावधित गळितास आलेल्या ऊसाच्या 'ऊस उत्पादन घट' अनुदानापोटी २ कोटी ३८ लाख ४९ हजार इतकी रक्कम संबंधित ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खाती आज मंगळवार (ता.३०) रोजी वर्ग केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना श्री.मुरकुटे यांनी सांगितले की, गेल्या सन २०२१-२२ च्या गळित हंगामात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऊसाच्या तोडी लांबल्या. त्यामुळे हंगाम जून महिन्यापर्यंत चालला. यात सभासद, ऊस उत्पादकांना ऊस तोडणीचा त्रास झाला. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ या कालावधित गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये ५०, १ मे ते ३१ मे २०२२ या कालावधित गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये १०० तर १ जून ते १३ जून २०२२ या कालावधित गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये २०० याप्रमाणे उस उत्पादन घट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सदरची २ कोटी ३८ लाख ४९ हजार रक्कम संबंधित ऊस उत्पादक यांचे बँक खात्यात आज वर्ग केली जाणार आहे. याशिवाय शासनानेही मे व जून २०२२ महिन्यात गाळपास आलेल्या ऊसास सरसकट प्रतिटन रुपये २०० ऊस उत्पादन घट अनुदान देण्याचे जाहिर केले आहे. तथापि, सदरच्या अनुदानाची रक्कम अद्याप अप्राप्त आहे. याबाबतची योग्य ती माहिती कारखान्याने साखर आयुक्त कार्यालयास पाठविली आहे. त्यावर शासनाकडून निर्णय होताच सदरची रक्कमही संबंधीत ऊस उत्पादकांना मिळेल, अशी माहिती श्री.मुरकुटे यांनी दिली.

