श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील अल्पवयिन मुलीचे बळजबरीने धर्मांतर करुन तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला. या गंभीर प्रकरणातील आरोपीस पाठीशी घालून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंकज गोसावी यास निलंबित करण्यात आले आहे. तथापि, गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता आरोपींना साह्य करुन संबधित कर्मचाऱ्यांने पोलिस विभागाशी व समाजाशी गद्दारी केली आहे. असे कर्मचारी पोलिस विभागासाठी कलंक असल्याने निलंबनाची कारवाई पुरेशी नसून सदर कर्मचाऱ्यावर भा.दं.वि. कलम ३४ अन्वये आरोपीशी संगनमत केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, 'आप' चे तालुकाध्यक्ष तिलक डूंगरवाल आदींनी पत्रकाद्वारे केली आहे.
संबंधितांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरात नुकतेच एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. इम्रान कुरेशी नामक व्यक्तीने एका अल्पवयीन शालेय मुलीचे जबदस्तीने धर्मांतर करुन तिच्याशी विवाह केला. या प्ररकरणी आरोपीवर अपहरण, अल्पवयिन मुलीचे लैंगिक शोषण तसेच अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासह आणखी एका गुन्ह्यात शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंकज गोसावी याने आरोपीस मदत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सबब गोसावी याचेवर जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. वास्तविक पोलिस हे समाजाचे रक्षक मानले जातात. 'खलनिग्रहणाय' असे ब्रिद घेवून पोलीस विभाग काम करते. असे असताना पंकज गोसावी याने खलप्रवृत्तीला मदत करुन व त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करुन पोलिस दल आणि समाजाशी गद्दारी केली आहे. तूर्त दोन गुन्ह्याबाबत हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात अनेक प्रताप आणि उद्योग करणाऱ्या आरोपींना सदर कर्मचा-याने मदत केल्याची शक्यता आहे. समाजाचे रक्षकच गुन्हेगारांचे रक्षक बनत असतील तर त्यांना धडा शिकवून वठणीवर आणणे आवश्यक आहे जेणेकरून आरोपीस पाठीशी घालण्यास कोणीही पोलिस कर्मचारी धजावणार नाही. यासाठी केवळ निलंबन न करता गोसावी याचेवर आरोपीस मदत केल्याप्रकरणी भा.दं.वि.कलम ३४ अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी श्री.चित्ते, श्री.मुथा, श्री.बडदे, श्री.शिंदे व श्री.डूंगरवाल यांनी केली आहे.

