श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंधरवाडा अभियाना अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील ५२ गावांमध्ये पंचायत समिती श्रीरामपूर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी सर्वच गावातील बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,
यावेळी आरोग्य व आहाराविषयी मार्गदर्शन केले. रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा, संगित खुर्ची, चमचा लिंबू नृत्य व गायन स्पर्धा, इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सहभाग घेऊन मेळाव्याची शोभा वाढवली. स्पर्धेमध्ये सहभागी विजेत्यांना वृक्ष वाटप करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला गेला. या मेळाव्यामध्ये एकल महिलां मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.त्यांना येणाऱ्या अडचणींवर मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याचे विशेष म्हणजे एकल महिलांना व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले व त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व उद्घाटन करण्यात आले.
त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे त्या स्वतःला एकाकी समजतात व खूप सारे सुक्त गुण असताना देखील परिस्थितीमुळे व समाज काय म्हणेल या कारणांमुळे त्या समोर येऊ शकत नाही या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा मानाने प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता व स्वतःला तुमच्यात असलेल्या सुप्त गुणांचा वापर करून सिद्ध करू शकता हा मोलाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले.एकल महिलांना बचत गट स्थापन करुन त्यामाध्यमातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यासाठी मदत होईल असे श्रीमती शोभा शिंदे यांनी मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना सांगितले.महिला मेळाव्यामध्ये तालुक्यातील जवळजवळ ९ ते १० हजार महिलांनी सहभागी होऊन आनंद घेतला. प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सर्व स्तरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले. श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. मच्छिंद्रनाथ धस व महिला बालविकास विभागाच्या प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा शिंदे यांनी या मेळाव्यांचे आयोजन करून सर्व बीट पर्यवेक्षिका श्रीमती बडाख, श्रीमती राजळे, श्रीमती फासाटे, श्रीमती गव्हाणे, श्रीमती कासार, श्रीमती खेडकर, श्री.पवार ए.पी. यांनी मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

