shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाकिस्तानवरील विजयानंतरही टिम इंडियात गंभीर तृटी ; हार्दिकची लक्षवेधक कामगिरी...!


            युएईत सुरू असलेल्या आशिया चषक टि२० स्पर्धेच्या दुबईत झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात टिम इंडियाने पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून दहा महिन्यांपूर्वी याच मैदानावर झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.

          यावेळी नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि त्यानंतर बरंच काही भारताच्या बाजूने अनुकूल असंच घडत गेलं आणि शेवटी सामन्याचा गोड निकालही टिम इंडियाच्या पारडयात पडला.
            खेळपट्टीचा अभ्यास करून भारताने तीन जलदगती व दोन फिरकी गोलंदाज खेळविले. खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. स्विंगपेक्षा आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना पाकचे फलंदाज गडबड करत असल्याचे बघून भुवनेश्वर कुमार, अर्शदिप सिंग, आवेशखान व हार्दिक पांड्याने त्यांच्या कामकुवत दुव्यांवर बोट ठेवून शॉर्टपिच चेंडूूंचा अचूक उपयोग करून त्यांच्या प्रमुख फलंदाजांना सतावले. विशेष म्हणजे पाकचा संपूर्ण संघ या चौघांनीच डगआऊटमध्ये धाडला. भुवनेश्वर चार, हार्दिक तीन, अर्शदिप दोन व आवेशला एक बळी मिळाला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळेे पाकिस्तानला १४७ धावाच फलकावर चढवता आल्या. त्याही शेवटच्या टप्प्यात शहानवाझ दहानीने केलेल्या आक्रमक १६ धावांमुळे नाही तर पाकच्या यापेक्षाही कमी धावा झाल्या असत्या.
             भारताला १४८ धावांचे लक्ष गाठताना मोठा त्रास झाला. नोव्हेंबर २०२१ मध्ये न्युझिलंड विरुद्ध टि२० सामना खेळल्यानंतर दुखापत, फिटनेस व कोरोनामुळे एकही सामना न खेळणाऱ्या मानसिक व शारिरीक दृष्टया कमजोर केएल राहुलला थेट पाकिस्तान विरूद्धच्या महत्वाच्या सामन्यात खेळवून संघ व्यवस्थापनाने मोठा जुगार खेळला व तो संघाच्या अंगलटही आला. आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नसिम शहाने राहुलला डावाच्या दुसऱ्या व राहुलने खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करून भारताच्या गोटात घबराट उडविली. वास्तविक राहुलला न खेळवता रिषभ पंतला संघात ठेवायला हवे होते. शिवाय सुर्यकुमार यादवला सलामीला पाठवायला पाहिजे होते. 
          दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माही दबावात असल्याचे जाणवत होते. त्याच दाबावात एक बेजबाबदार फटका मारून तो बाद झाला. त्यामुळे संघावरचा दबाव वाढला. तर दुसऱ्या बाजूने फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीचा झेल डावाच्या सुरुवातीलाच स्लिप मधील इफ्तिखारने सोडल्याने कोहली बचावला. त्याने भले ३५ धावा केल्या असल्या तरी त्यामध्ये कोहलीच्या पूर्वीच्या दर्जाचा लवलेशही नव्हता. अखेर रोहित प्रमाणे कोहलीही बेजबाबर फटका मारून बाद झाला. कोहलीला बाद केल्यानंतर पाक गोलंदाजात वेगळाच उत्साह संचारला होता.  फॉर्मात असलेला सुर्यकुमार यायवही स्वस्तात परतल्याने भारताच्या गोटात तणाव निर्माण झाला होता.
            रविंद्र जडेजा (३३ धावा) व हार्दिक पांडया १७ चेंडूत नाबाद ३३ धावा यांनी परिस्थितीशी मिळते जुळते घेवून खेळ केल्याने दोन चेंडू व पाच गडी राखून भारताला विजय मिळाला. हार्दिक पांडयाने गोलंदाजीत ४ षटकात २९ धावात ३ बळी व संकटसमयी ३३ धावांची मॅच जिताऊ खेळी करून भारतासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. त्याचे फळ सामनावीर पुरस्काराने मिळाले.
            भारताने भले या सामन्यात विजय मिळवून दोन गुणांची कमाई केली. परंतु भारताकडून मागील काही दिवसात केलेली तयारी बघता सफाईदार खेळ व एकतर्फी विजयाची अपेक्षा होती. मात्र तसा खेळ खास करून मोठमोठे नावाच्या खेळाडूंकडून फलंदाजीत झाला नाही. त्यामुळे एक सोपा वाटणारा विजय शेवटच्या षटकात रडतखडत मिळाला.
            पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी कर्णधार रोहित शर्माला षटकांची गती राखण्यात अपयश आले. त्याचा फटका शेवटच्या तीन षटकात भारताला एक क्षेत्ररक्षक दंड म्हणून तीस यार्ड सर्कलच्या आतमध्येच ठेवावा लागला. याचा लाभ शेवटच्या टप्प्यात शहानवाझ दहानीने दोन षटकार व एक चौकार मारून उठविला. त्यामुळेच पाकला बऱ्यापैकी धावा रचता आल्या. षटकांची गती राखण्यासाठी कर्णधार रोहितने क्षेत्ररक्षकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिवाय गडी बाद झाल्यानंतर सेलीब्रेशनमध्ये जास्त वेळ वाया घालणे टाळले पाहिजे.
             त्याचबरोबर भारताचे क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे झाले. त्यातही सुधारणा होणे गरजेचे आहे. यजुवेंद्र चहलने स्वतःच्याच गोलंदाजीवर इफ्तिखारचा झेल सोडला. इफ्तिखारचाच आणखी एक झेल कर्णधार रोहितने टपकला. रविंद्र जडेजा सारख्या अव्वल क्षेत्ररक्षकाने मोहम्मद रिजवान ला धावबाद करण्याची संधी दवडली. याचा लाभ उठवित रिझवानने पाककडून सर्वाधिक ४३ धावा ठोकल्या. सुर्यकुमार यादवची स्टंप वरील नेमबाजीबरोबर नव्हती. तर बऱ्याच वेळा इतरही खेळाडूंची निशाणेबाजी चुकत होती. मैदानी क्षेत्ररक्षणातही बराच गलथानपणा झाल्याने तब्बल १६ चौकार पाकला गिफ्ट स्वरूपात मिळाले.
             भारताच्या ठिसूळ फलंदाजीमुळे शकल्यानेपाकिस्तान पुन्हा एकदा उलटफेर करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पाकचे हारिस रऊफ, नसिम शहा या प्रमुख गोलंदाजांच्या ऐनवेळी उद्भवलेल्या दुखापतीमुळे त्यांना भारतावर हल्लाबोल करण्यात अपयश आले. शिवाय पाक कर्णधार बाबर आझमही आपल्या गोलंदाजांवर, क्षेत्ररक्षकांवर नियत्रंण ठेवू न शकल्याने भारताप्रमाणेच पाकलाही तीन षटकात एक जास्त क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवण्याचा दंड झाला. परंतु भारतापेक्षा पाकला तो चांगलाच महागात पडला.
             एकंदर दोन्ही संघाच्या खेळावर एक नजर टाकली तर बेजबाबदार फलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण, कर्णधाराची हतबलता, ठोकलेले चौकार, षटकार जवळ जवळ सारखीच दिसली. फरक एवढाच होता की भारताचे नशिब बलवत्तर होते म्हणून विजय भारताच्या झोळीत पडला.
           भारताला चालू आशिया चषक व आगामी विश्वचषक जिंकायचा असेल तर आपल्या सर्व कमकुवत दुव्यांवर मोठे काम करावे लागेल. शिवाय संघ निवड करताना केवळ परिस्थिती व संघहित बघूनच करावी लागेल. एकमेकांचे हितसंबंध जपण्याच्या नादात मोठे नुकसान होऊ शकते.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close